उवा

0
931
  •  डॉ. अनुपमा कुडचडकर

आठवड्यातून एकदा तरी आईवडलांनी आपल्या मुला/मुलीचं डोकं तपासून बघायला हवं आणि उवा सापडल्या तर त्यावर उपचार करून शाळेत जावून शिक्षकांना कळवलं पाहिजे व शाळेत उवा असलेल्या इतर मुलामुलींनासुद्धा उपचार करण्यास सांगितलं पाहिजे.

उवा म्हणजे एक प्रकारचे किटाणूच असतात, जे माणसांच्या केसात सापडतात. जास्त करून लहान मुलांच्या डोक्यामध्ये उवा जास्त प्रमाणात होतात. शाळा सुरू झाली किंवा मूल शाळेत जायला लागलं की कित्येक माता आपल्या मुला/मुलींना घेऊन आमच्याकडे येतात. एकदा का शाळेत एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यात उवा झाल्या की त्या मग इतर मुलांच्या डोक्यांमध्ये पसरू लागतात. मुलं मग त्यांच्या घरी असलेल्या बाकीच्या सदस्यांच्या डोक्यांमध्ये पसरवतात. कधी कधी उवा शरीराच्या इतर केसाळ भागांवर पण पसरू शकतात. अंथरुणावर असलेल्या रुग्णांच्या डोक्यात पुष्कळदा उवा झालेल्या आढळतात.

उवा केसांमध्ये अंडी घालतात. ही अंडी केसांना घट्ट चिकटून असतात. उवांना सहा पाय असतात आणि या पायांनी त्या केसांना घट्ट पकडून डोक्यावर फिरत असतात. त्यांचे अन्न म्हणजे मनुष्याचे रक्त. आपल्या तोंडाने त्या डोक्यावरच्या त्वचेमधून रक्त शोषत असतात. केसांवर घातलेल्या अंड्यामधून नवीन उवा तयार होतात. एकदा डोक्यात उवा झाल्या की डोक्याला खाज सुटते. कधी कधी खाजवून खाजवून डोक्याच्या त्वचेवर पुरळ येतो. काही काही मुलं डोकं खाजवून खाजवून डोक्यावर घाव करतात. त्यामध्ये नंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन पू पण भरतो. डोक्यात झालेल्या इन्फेक्शनमुळे कानामागच्या व मानेच्या ग्रंथींना (लिम्फनोड्‌स) सूज येते व त्या दुखायला लागतात.
उवा झाल्याचं निदान- डोक्याला येणारी खाज, केसांमध्ये फिरणार्‍या उवा व केसांवर चिकटलेली अंडी यावरून करता येते. एकदा त्याचं निदान झालं की लगेच त्यावर उपचार केले पाहिजेत. कारण शाळेत जर एका मुला/मुलीच्या डोक्यात उवा झाल्या असल्या तर त्या उवांची लागण त्या वर्गातल्या इतर मुलांना होऊ शकते. काहींना उवांची लागण एवढी झालेली आढळते की त्यांच्या भुवयांमध्ये व पापण्यांच्या केसांमध्येपण उवा सापडतात.
उपचार ः- यांवर उपचार करण्यासाठी परमेथ्रीन, लिंडेन मेलाथायोन, गामा बेनझीन हेक्साक्लोराइड, आयव्हरमेक्टीन, यांसारखी औषधे मिळतात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावी लागतात.
– केसांवर चिकटलेली अंडी हातांनी हळुवार ओढून काढली पाहिजेत.
– केसांची व्यवस्थित निगा राखली पाहिजे.
– आठवड्यातून दोन वेळा केस शॅम्पू लावून धुतले पाहिजेत. नंतर सुकवले पाहिजेत.
– आठवड्यातून एकदा तरी आईवडलांनी आपल्या मुला/मुलीचं डोकं तपासून बघायला हवं आणि उवा सापडल्या तर त्यावर उपचार करून शाळेत जावून शिक्षकांना कळवलं पाहिजे व शाळेत उवा असलेल्या इतर मुलामुलींनासुद्धा उपचार करण्यास सांगितलं पाहिजे.