उलटी होणे ः लक्षण की व्याधी?

0
1501
  •  डॉ. सुरज स. पाटलेकर
    (श्री व्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

आयुर्वेदाप्रमाणे उलटीचे दोषानुसार व इतरही अनेक प्रकार आहेत. उलटीतून अन्नपदार्थ जर बाहेर पडत असतील तर अशा वेळेस उपवास करणे केव्हाही चांगले. अजीर्णावस्थेच्या कारणाने उलटीचा त्रास जर असेल आणि यामध्ये आहार जर घेतला गेला तर परिस्थिती अजूनच बिघडेल.

छर्दी म्हणजेच वांती होणे म्हणजेच उलटी होणे हे फक्त लक्षण नसून व्याधीसुद्धा आहे. पोटातून (आमाशयातून) उत्क्लीष्ट झालेले दोष व अन्नपदार्थ पोटातून मुखामध्ये येऊन बाहेर पडतात आणि याचवेळी सर्व शरीरात व्यथा उत्पन्न होते. उलटी हे अधारणीय वेगांपैकी एक म्हणजेच ज्यांचे धारण करू नये, थांबवू नये असे. उलटी आल्यास ती करावी. जर ती थांबवली गेली तर कुष्ठरोग (त्वचेचा विकार), अम्लपित्त (ऍसिडीटी), डोकेदुखी इ.सारखे आजार होतात.

द्रव-द्रवरुपी पदार्थामुळे पोटावर अधिक ताण पडतो, स्निग्ध/गुळगुळीत पदार्थ- पचायला कठीण असल्याने अवरोध घडवितो, अपथ्यकर आहार, अहृद्य म्हणजे मनाला न आवडणारे, खारट (मीठ इत्यादी पित्त व कफ वाढवते) पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, चुकीच्या वेळी/अवेळी जेवणे (पचनास मदत करणार्‍या पाचक रसांचा स्राव त्यावेळी व्यवस्थित झालेला नसतो व यामुळे पचन नीट होत नाही), ज्यांची सवय नाही असे काहीतरी खाणे, फार भरभर जेवणे, अतिमात्रेत श्रम होणे, भिती वाटणे, एखाद्या गोष्टीचा शोक होणे, अजीर्ण झाल्याने, पोटात कृमी/जंत झाल्याने, गर्भिणी अवस्थेमध्ये, बीभत्स दर्शन म्हणजेच घृणा उत्पन्न होणार्‍या पदार्थांचे दर्शन घडणे, ऋतुबदल यांसारख्या अनेक कारणांनी उलटी होऊ शकते. तसेच काही लोकांना रक्ताच्या गंधाने किंवा रक्त बघितल्यानेसुद्धा उलटी होते. मनाला तिटकारा आणणारे, अपवित्र, विरुद्ध (गरम व थंड पदार्थ एकाचवेळी), कुजलेले, नासलेले, घाणेरडे, किळसवाण्या पदार्थाच्या सेवनाने किंवा त्यांच्या गंधाने किंवा नुसते नजरेसमोर आल्यानेही मन उद्विग्न होते. या प्रकारच्या केवळ स्मरणानेही वांती होते. ह्या सर्व कारणांमुळे पोटात विशिष्ट प्रकारची व्याकुळता(क्षोभ) निर्माण होते व त्याचे रूपांतर वांतीमध्ये होते.
शरीराचासुद्धा एक नियम असतो. जे शरीराला पचत नाही किंवा जे शरीराला हानिकारक आहे ते शरीर नेहमीच बाहेर टाकून देण्याचा प्रयत्न करेल. अतिमात्रेत वांती झाल्याने शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो (डिहायड्रेशन) व दोषांच्या आधिक्य/प्रकोपानुसार थकवा जाणवतो, चक्कर येते, तोंडाची चव जाते/अरुची (तोंडातील आंबट, कडवट, तुरट, खारट इतर चवीमुळे अन्नावरची वासना उडते), पोट भरल्याप्रमाणे जाणवणे, तोंडातून लाळ गळणे, डोकेदुखी, पोटात नाभीप्रदेशी, पाठीत व हृदयाच्या ठिकाणी टोचल्यासारखी वेदना होणे, तोंड कोरडे होणे, खोकला येणे, आवाज बदलणे (स्वरभेद), वांती ही उष्ण, फेसाळ, विविध वर्णांची (सफेद, काळपट, निळ्या, पिवळसर, हिरव्या रंगाची), जोरात उलटी होणे, पुनःपुनः वांतीचे वेग येणे व कष्टाने होणे, उलटीचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते, पूर्ण शरीरातील- घसा व पोटातील दाह/जळजळीमुळे/तहान जास्त लागणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, क्वचितवेळी उलटीतून रक्तसुद्धा पडते, ताप येणे, झोप/झापड येणे, अंगावर शहारे येणे, सूज येणे, श्वासोश्वासाला त्रास होणे, हृद्गती वाढणे, डोळे आत गेल्यासारखे वाटणे (थकवा आल्याने) पुनःपुनः थुंकावेसे वाटणे, कमी/धूसर दिसणे, लघवीला त्रास होणे/न होणे सारख्या तक्रारी कमीजास्त प्रमाणात असू असतात.

आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये उलटीला वॉमिटिंग व मळमळीला नॉशिया असे म्हणतात. वॉमिटिंगचे खूप सारे प्रकार आहेत जसे की ‘प्रॉजेक्टाईल वॉमिटिंग’ (अचानक कधीही सूचना नसताना प्रचंड जोराने उलटी बाहेर येते) व ‘पोसेटिंग वॉमिटिंग’ जे लहान बाळामध्ये होतात ज्यात खूप कमी प्रमाणात वांती होते(अन्नासहित) इत्यादी.
‘फुड पॉईझनिंग’मध्ये दूषित अन्न/पाणी (सडलेले, रासायनिक द्रव्य, विष, रोगजंतू इ.असू शकते) मिश्रित खाल्ल्यानंतर काही तासातच त्याची लक्षणे चालू होतात विशेषतः मळमळ, उलटी, पोटामध्ये पेटके (क्रॅम्प्स) येऊन दुखणे, अतिसार (शौचास/संडासला पातळ होणे) यांसारखी. शक्यतो १-२ दिवसात रोगी आपोआप बराही होतो पण जर लक्षणांची तीव्रता वाढत गेली तर मात्र उपचार करणे गरजेचेच. ‘व्हायरल गॅस्ट्रोऍंटरायटीस’ होणे हा याचाच परिणाम असू शकतो. यामध्ये आतड्यांना सूज येते व वरील उल्लेखीत फुड पॉईझनिंगची सर्व लक्षणे असतात. हा नोटोव्हायरसमुळे होतो व संसर्गज आहे.
कर्करोगासाठी देण्यात येणार्‍या ‘किमोथेरपी’ व ‘रेडिएशन थेरपी’मुळे मेंदूतील वॉमीटिंग सेंटर्स उत्तेजित व चालू होतात आणि यामुळे तेथून रसायन (केमिकल्स) पचनसंस्थेमध्ये येऊन संबंधित अवयवांना इजा पोहोचवते आणि मळमळ, वांती होण्यास भाग पाडते.
वांती झाल्यामुळे जर डोकेदुखी होऊ शकते तर डोकेदुखीमुळेसुद्धा वांती होऊ शकते. ‘मायग्रेन’ हे याचेच एक उत्तम उदाहरण. यात मळमळ, वांती तर असतेच पण त्यासोबत प्रकाश असहिष्णुता (लख्ख प्रकाशाचा त्रास होणे), डोक्याच्या फक्त एकाच बाजूला तीव्र टोचल्यासारख्या असह्य वेदना होतात, क्वचित वेळी त्याबाजूची दृष्टी थोडी कमी/धूसर होऊ शकते. तसेच इतरही व्याधी आहेत ज्यांच्यामुळे मेंदूचा ताण/ दाब (इंट्रा -क्रेनीयल प्रेशर) वाढतो व उलट्या होतात.

गरोदरपणाच्या पहिल्या ३ महिन्यात ७०-८० टक्के बायकांमध्ये ‘मॉर्निंग सिकनेस’ ही अवस्था असते. जवळपास सहाव्या आठवड्यात उलट्या व्हायला लागतात. यात होर्मोंस(एचसीजी)मध्ये जे बदल होतात त्यामुळे हृदयात/छातीमध्ये जळजळ, अपचन, गळ्यापाशी आंबट येणे आणि सोबतच मळमळ व वांती चालू होतात. हायपरईमेसीस ग्रेवीडॅरम होऊ शकते ज्यात दिवसात ३-४ वेळा किंवा त्यापेक्षाही अधिक उलट्या होऊन वजनसुद्धा कमी होताना दिसते.

‘मोशन सिकनेस’ही ह्याचाच एक प्रकार. यामध्ये प्रवासात गतीमुळे उलटी होते, चक्कर येते, घाम सुटतो. गती थांबवल्यास सगळ पुनः व्यवस्थित होते. काही लोक ते थांबवण्यासाठी (शमन करण्यासाठी)आधुनिक औषधे घेतात जे चुकीचे आहे. त्यासाठी योग्य चिकित्सा व उपचार करून घेणे महत्त्वाचे. अशावेळी लवंग चोखणे उपयुक्त ठरते.

अतिमात्रेत किंवा प्रमाणाबाहेर औषधांचे सेवन केल्याने (ओवरडोस) देखील मळमळते, उलट्या होतात, तंद्रा येते, डोकेदुखी होते, थकवा जाणवतो. हे अपघाती असू शकते, दुर्लक्षामुळे झालेले किंवा जाणून बुजून केलेले. यामध्ये ते औषध, त्याची मात्रा, त्या मनुष्याचे शारीरिक बल, प्रकृती व वैद्यकीय इतिहास हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते. संज्ञाहरण (ऍनास्थेशिया) मध्ये हे होऊ शकते.

‘जीईआरडी (गॅस्ट्रो-इसोफेजीयल-रिफ्लक्स डीसीज)’ मध्ये पोटातील पचनास मदत करणारे ऍसिड हे ‘लोवर इसोफेजीयल स्फिन्क्टर’च्या व्यवस्थित बंद न होण्याच्या असामर्थ्यामुळे (हा स्नायू इसोफेगस वा आमाशय यांच्यामध्ये असतो आणि काहीही खाल्ल्यानंतर- प्यायल्यानंतर ते पोटामध्ये पाठवून लगेच बंद होत असतो) पोटातून परत घशात येते. असे झाल्याने आंबट चवीचे ढेकर, मळमळ, उलट्या, जळजळ, श्वासोश्वास करण्यास अडथळा (रात्रीस त्रास वाढतो) इ. आणि हे त्रास पोटातील/शरीरातील पित्त वाढवणार्‍या पदार्थांचे सेवन केल्याने (चॉकलेट, कॉफी, लोणचे, तेलकट, तिखट, कडू, मद्यपान, कार्बोनेटेड पेय सारखे) अजूनच बळावतात. त्याव्यतिरिक्त असेही काही व्याधी आहेत ज्यात पोटातील पित्त वाढल्याने होतात जसे झोलिंगर ऍलिसन सिंड्रोम, इ. व त्यामुळे वरील लक्षणांसोबत अल्सर, संडासला पातळ होणे, वजन कमी होणे (दुखण्यामुळे मनुष्य कमी खातो) या तक्रारी असतात.
‘क्रॉन्स डीजीस’ हाही असा एक व्याधी ज्यात पोटामध्ये, आतड्यांना व गुद (रेक्टम) यात आतून सूज येते, व्रण (अल्सर) होतात ज्यामुळे रक्तस्राव होतो व छातीत, जांघेमध्ये, पोटात तीव्र वेदना होतात, मळमळ, उलट्या, अतिसार, थकवा, वजन कमी होणे, कुपोषण अशी लक्षणे असतात.

‘लॅक्टोस इन्टॉलरन्स’ (लॅक्टोस हे दुधातील एक घटक आहे) मुळे दुधाचीसुद्धा ऍलर्जी असू शकते आणि लॅक्टोसयुक्त अन्नपदार्थ किंवा पेय यांच्या सेवनानंतर ३०-१२० मिनिटांमध्ये मळमळ, उलट्या, अतिसार, पोटदुखी, पोटफुगणे/ पोटात वायू भरल्यासारखे वाटणे इ. ह्या तक्रारी असतात. लहान आतडे हे लॅक्टोसच्या (दुधातील साखर) पचनासाठी (ग्लुकोज व गॅलॅक्टोस तयार करण्यासाठी) लेक्टेस नावाचे एन्झाइम तयार करत असते आणि हे जेव्हा करण्यास असफल ठरते तेव्हा ही अवस्था उद्भवते.

‘मेनिंजायटीस’ (इनफेक्शनमुळे मस्तिष्कावरणाला आलेली सूज), ‘युटीआय’ (युरीनरि ट्रॅक इन्फेक्शन- वृक्क व मूत्रमार्ग), ‘ओटायटीस मीडिया’ (मध्यकर्णातील सूज व इन्फेक्शन-तीव्र वा जुनाट), न्युमोनिया (जंतूमुळे झालेले फुफ्फुसातील इन्फेक्शन), ‘पायलॉरिक स्टेनोसीस’ (आमाशय व लहान आतड्याचा पहिला भाग यांना जोडणारा जो भाग आहे तो अरुंद होणे), मासिकपाळीच्या वेळी (प्रोस्टाग्लँन्डींसच्या आधिक्यामुळे) इत्यादी अशा कित्येक अवस्था व रोग आहेत ज्यामध्ये वांती किंवा उलटी हे लक्षण असू शकते.

रोगाचे निदान होणे महत्त्वाचे आहे. मग त्यासाठी तज्ञ वैद्यांचा सल्ला आवश्यक घ्यावा. एँडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, अल्ट्रासाऊंड, सिटी-एमआरआय स्कॅनसारख्या डायग्नॉस्टिक टेस्टची गरज भासू शकते. ज्या गोष्टींमुळे त्रास होतो त्या खाणे, पिणे, करणे थांबवावे. फक्त लक्षणांची चिकित्सा न करता, आजाराची चिकित्सा होणे गरजेचे असते व ते वैद्यच योग्यप्रकारे करू शकतो. कित्येक वेळी अधिक प्रमाणात उलटी झाल्याने शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो आणि त्यावेळी सलाईनची आवश्यकता ही भासेल. असे असल्यास साधे पाणी किंवा साखरेचे पाणी प्यायल्याने थोडा तरतरीतपणा येतो.
आयुर्वेदाप्रमाणे उलटीचे दोषानुसार व इतरही अनेक प्रकार आहेत. उलटीतून अन्नपदार्थ जर बाहेर पडत असतील तर अशा वेळेस उपवास करणे केव्हाही चांगले (वातज प्रकारची अवस्था अपवाद व हे वैद्यांनी ठरवावे). अजीर्णावस्थेच्या कारणाने उलटीचा त्रास जर असेल आणि यामध्ये आहार जर घेतला गेला तर परिस्थिती अजूनच बिघडेल. कारण ते पचवण्याची आपल्यात शक्ती नसते. वमन (औषधी देऊन जाणीवपूर्वक वांत्या/उलट्या आणल्या जातात- दोषांच्या शोधनासाठी व हा उपक्रम वांतीपासून अगदीच वेगळा आहे), विरेचन ह्या पंचकर्मातील उपक्रमांचा उपयोग होतो. अर्थातच व्याधी, दोषांची, रोग्याची अवस्था, बल पाहूनच व योग्य प्रमाणात दिले गेले तरच. अतियोग घातक ठरू शकतो. विश्रांती महत्वाची. व्यायाम, शारीरिक कसरत करणे टाळावे.

मनोभिघातात (मनावर आघात झालेला असताना) .. मनाला आनंद होईल अशी अनुकूल आश्वासन चिकित्सासुद्धा गुणकारी ठरते. बाकी औषधी चिकित्सा तर आहेच. सुगंधी द्रव्ये उपयोगी पडतात. चंदन, वाळा, सुंठ, इलायची, लवंग, पिंपळी, मिरी अवस्थेनुसार फायदेशीर ठरतात. मूग-कुळीथ यांचे कढण, लाह्या (सर्वोत्तम सांगितल्या आहेत), डाळिंब, द्राक्षे, उसाचा रस ह्या उपयुक्त आहेत.