‘उपस्थ’ कर्मेंद्रियांची काळजी

0
283

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

आज या स्पर्धात्मक युगात पुरुष मोठ्‌ठ्या पॅकेजच्या नावाखाली- सर्व सोयींनी युक्त स्वतंत्र बंगला, उंची महागड्या गाड्या, ऐशआरामाचे जीवन जगण्याच्या नादात तणावाखाली जीवन जगतात. तसेच काही तरुण वर्गाच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे किंवा व्यसनाधीनतेमुळे उपस्थावर म्हणजेच शुक्रावर परिणाम होत आहे. अशा अवस्थेत सुदृढ भावी पिढी घडविण्याकरिता संतुलित आहार, व्यायाम व योगसाधनांची आवश्यकता आहे.

‘उपस्थ’ म्हणजे ‘जननेंद्रिय’. बहिर्मुख स्रोतसांपैकी एक आहे. प्रजननासाठी उपयुक्त असणारे कर्मेंद्रिय. स्त्रियांमध्ये त्र्यावर्ता योनी व पुरुषांमध्ये मेद्र म्हणजेच उपस्थ. स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधातून अपत्यनिर्मिती होणे एक स्वाभाविक अंग आहे. पुनरुत्पत्ती करणे हे सजिवांचे मुख्य लक्षण आहे. परिपूर्ण वीर्य असलेली पती-पत्नी, समुचित धातू आणि योग्य ऋतुकालात समागम या गोष्टी असल्यास दांपत्यजीवनात अपत्यनिर्मिती होणे ही सहज गोष्ट आहे. वास्तविक, अपत्यर्निर्मितीसाठी स्त्री व पुरुष निरोगी असणे, परस्परांवर प्रीती असणे, समागमाची इच्छा असणे या गोष्टी योग्य रीतीने केल्यास दांम्पत्य जीवन सुखकर होऊन अपत्यनिर्मिती होते. या सहज नैसर्गिक अपत्यनिर्मितीसाठी उपस्थांची काळजी घेणे खूपच महत्त्वाचे झाले आहे, वाढत्या वंध्यत्वाचा विचार करता या कमेंद्रियांची योग्य काळजी का घ्यावी? याचे महत्त्व लक्षात येते. आजच्या काळात सतत स्पर्धेमध्ये जगणारी स्त्री, अगदी बाल्यावस्थेपासूनच ताण-तणावामध्ये जीवन व्यतीत करीत असते. वयाच्या ९ व्या, १० व्या वर्षी येणारी पाळी आणि विशी-पंचविशीत होणारी लग्ने. यौवन लवकर येते व त्याला साथ टीव्ही-मोबाइलवरचे कार्यक्रम, अश्‍लील चित्रफिती, आहारामध्ये झालेला प्रचंड बदल, फास्ट फूड, चॉकलेट आईसक्रीम, स्पायसी फूड, चटपटीत खाद्य, फॅशनच्या नावाखाली सात्त्विक आहारासाठी नाक मुरडणे, ‘दोन मिनिटा’तले खाद्य पदार्थ आवडीचे झालेत. डबाबंद फ्लेवरचे ज्यूस, कोल्डड्रिंन्स प्यायला आवडतात पण फळे, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, उसाचा रस- ‘आऊट डेटेड’ या सगळ्यांचा थेट परिणाम उपस्थांवर होतो. नको तिथे मॅच्युरिटी येते… त्याचा परिणाम म्हणून विवाहापूर्वी शरीरसंबंध, अनेकांबरोबर शरीरसंबंध येतो व उपस्थांमध्ये दोष उत्पन्न होतात.

योनिदोषांमध्ये विविध प्रकारचे योनीव्यापद उत्पन्न होतात.
– योनिदौर्बल्य, योनिर्दोर्गंध्य, योनिशुष्कता, योनिसंकुचितता याप्रकारची लक्षणे दिसतात.
– पाळीमध्ये अनियमितता, अतिरक्तस्राव, अल्परक्तस्त्राव, सकष्ट मासिक पाळी, योनिगत श्‍वेतस्राव.
– योनिमध्ये ग्रंथी, व्रण, अर्बुदसारखी लक्षणे दिसतात. या सगळ्याचा परिणाम अपत्यनिर्मितीच्या वेळी होतो व जेव्हा अपत्याची इच्छा होते तेव्हा समागमाची इच्छा नसते. म्हणूनच बाल्यावस्थेपासूनच योनीची काळजी घेणे आवश्यक आहे.
– त्यासाठी सुरुवात ही सात्त्विक आहारापासूनच करावी. घरचे ताजे अन्न खाण्याची सवय लावावी.
– आहारामध्ये दूध, तूप, लोणी असावे.
– आहारांमध्ये फळभाज्या, पालेभाज्या, वेगवेगळ्या डाळी, कडधान्याला मोड आणून केलेल्या उसळी, घरात बनवलेले लोणचे, फ्रेश तयार केलेल्या चटण्या, भात, चपात्या, भाकर्‍या अशा आहाराला प्रोत्साहन द्यावे.
– फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन, त्यामध्ये वेगवेगळे सॉस घालून, दही-क्रीम घालून… केळी, बटाटे, पपई अशी विचित्र गोष्टींचे ‘कॉम्बिनेशन्स’ करून तयार केलेले चटपटीत, झणझणीत चिकन खरंच पथ्यकर आहे का? त्यात भर म्हणून ‘रोस्टेड चिकन’, ‘डीप फ्राय चिकन’ यातील पोषकांशाचा विचार प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यास देण्याअगोदर नक्की करावा. मांससेवनास विरोध नाही. उलट कितीतरी व्याधींमध्ये बलरक्षणार्थ आयुर्वेदामध्ये ‘मांसरस’ चिकित्सा सांगितली आहे. आपण जी पद्धत स्वयंपाक करण्यासाठी वापरतो किंवा जे काही आपण बनवतो त्याने जिव्हा तृप्त होते पण शरीर स्वास्थ्य मिळत नाही.
– आहाराबरोबर व्यायामाला महत्त्व द्यावे. तणावरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. प्राणायाम, योगासने, मेडिटेशन याची सवय प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यास लावावी व त्याचबरोबर स्वतःसाठीही ही सवय लावून घ्यावी.
– योनीस्वच्छता पाळीच्या दिवसात व इतचर दिवसांत खूप महत्त्वाची आहे. आपमहाभूतांचा विशेष संबंध असल्याने योनिपिश्‍चिलता, योनिकंडूता ही लक्षणे आढळळ्यास कषाय द्रव्याने युक्त योनिडूश घ्यावे.
– महिलांसाठी योनीची काळजी घेताना योनि परिसेवन, योनिमध्ये तेलाचा, तूपाचा, काढ्याचा पिचु ठेवणे, प्रसुतीपश्चात किंवा विशिष्ट योनिव्यापदात किंवा स्वास्थ्य राखण्यास योनिप्रदेशी ‘धूपन’ घेणे. बस्ती र्पयोग, स्नेहन-स्वेदन हे उपक्रम योनीस्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात.
– शतावरी, अश्‍वगंधा, उथीर, चंदन, अशोक, लोध्र, शतपुष्पा, गोक्षुर, बला आदी औषधी द्रव्ये महिलांसाठी विशेष उपयुक्त आहेत.
मेद्र हे पुरुषांमधील उपस्थ याचे कार्य मूत्र व वीर्य यांचा उत्सर्ग आणि संभोगसमयी स्पर्शानंद हे आहे. दर दहा रुग्णांमध्ये एक रुग्ण पौरुषत्वासाठी औषधे न्यायला किंवा चिकित्सा घ्यायला येतो. का? त्याचेही कारण स्त्रियांप्रमाणे निकस आहार.
– अकाली – म्हणजे अत्यंत लहान वयात म्हणजे पंधरा-सोळा वर्षाच्या वयात समागम केल्यास, दिवसातून पाच-सहा वेळा केल्यास, लहान मुलाने वयाने मोठ्या असणार्‍या स्त्रीशी समागम केल्यास.
– अयोनौ – योनिभागी समागम न करता यासाठी मुख, गुद किंवा प्राण्यांचा वापर केल्यास शुक्रधातू दुष्ट होतो. हस्तमैथुनाचाही यात समावेश आहे.
– अतिव्यवायात् – अतिव्यवायामुळे शुक्र क्षीण होते. वातवृद्धी होते. सारभूत अशा शुक्राचा सतत स्राव होऊन र्‍हास झाल्याने गुणतः आणि कर्मतः हीनवीर्य होते.
– चिंता, भीति, शोक आणि व्यभिचार यांमुळेही शुक्रदोष निर्माण होतो.
– मेद्रजन्य मोठा रोग झाल्यास शुक्रदोष संभवतो. यामध्ये गळू, अंतर्विद्रधी असल्यास क्लैब संभवते.
उपस्थाचा स्वास्थ्यरक्षणार्थ …

* सकस संतुलित आहार
* मुत्रप्रवृत्तीनंतर इंद्रिय स्वच्छ करणे अन्यथा इंद्रियाच्या ठिकाणी दुर्गंधी येते. तसेच इंद्रिय म्हणजे शिस्न, वृषण, जघनभाग स्नानाच्या वेळी आणि मैथुनापूर्वी्र सुगंधी उटणे किंवा साबण लावून स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्गंधीमुळे मौथुनासहिष्णुता निर्माण होते.
* पुरुषांमध्ये उपस्थाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजेच शुक्राचेच स्वास्थ्य उत्तम असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रसायन, वाजीकरण ही औषधे आयुर्वेदाने सांगितली आहेत.
* प्रथम स्नेहन-स्वेदनाने शरीरशुद्धी उपक्रम करावे. स्नेहनासाठी शिरा तूप भरपूर घालून करणे, दुधात तूप घालून घेणे, खीर करताना तूप भरपूर घालणे, तूपभात, तूपपोळी, मांसाहारी लोकांसाठी मांसरस, ज्या शरीराला जे योग्य आहे तसे स्नेहन देऊन प्रथम शरीर स्निग्ध करावे नंतर स्वेदन देऊन प्रथम शरीर स्निग्ध करावे नंतर स्वेदन द्यावे. वमन, विरेचन, बस्ती यांचा वापर करून शरीरशुद्धी करावी.
* त्यानंतर रसायन व वृष्य औषधांचा उपयोग करावा. पाणी, दूध, मध व तूप प्रकृतीनुसार यांचा एकेरी किंवा मिश्र करून रसायन म्हणून उपयोग करावा. याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास तारुण्य कायम राहते.
* शुक्रजनक – म्हणजे शुक्र गुणांना वाढवणार्‍या औषधी…
आहार- तूप, मांस, बदाम, बेदाणे, अक्रोड, खजूर, खडीसाखर, जर्दाळु, ताजी फळे, दूध, खीरा, भुईकोहला, शतावरी, नागबला ही सर्व द्रव्ये उपयोगी पडतात.
* शुक्रप्रवर्तक – कपिकच्छू, विदारीगंधा, शतावरी, अश्‍वगंधा, उच्चटा चूर्ण, तूप आणि दूध
* जनकप्रवर्तक – गोघृत, उडीद, सर्व प्रकारची फळे, दूध ही सर्व द्रव्ये शरीराचे व मनाचे बळ वाढवतात. म्हणजे शुक्रधातुनिर्मिती व प्रवर्तनामध्ये शरीर व मनाला फार महत्त्व आहे.. असे लक्षात येते. म्हणून शरीर व मन यांचे बल जर योग्य असेल तर शुक्रधातूचे जनन व प्रवर्तन होते.
म्हणूनच आज या स्पर्धात्मक युगात पुरुष मोठ्‌ठ्या पॅकेजच्या नावाखाली – सर्व सोयींनी युक्त स्वतंत्र बंगला, उंची महागड्या गाड्या, ऐशआरामाचे जीवन जगण्याच्या नादात तणावाखाली जीवन जगतात. तसेच काही तरुण वर्ग चुकीच्या वर्तणुकीमुळे किंवा व्यसनाधीनतेमुळे उपस्थावर म्हणजेच शुक्रावर परिणाम होत आहे.
अशा अवस्थेत सुदृढ भावी पिढी घडविण्याकरिता संतुलित आहार, व्यायाम व योगसाधनांची आवश्यकता आहे.