उपवास की उपहास?

0
125

देशातील नरेंद्र मोदी सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सद्भावना उपोषण केले खरे, परंतु उपोषणाआधी दिल्लीतील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हॉटेलमध्ये छोले भटुर्‍यांवर ताव मारतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कॉंग्रेसची अब्रू गेली आहे. उपोषणासारख्या अहिंसक सत्याग्रहाच्या माध्यमातून एकेकाळी गांधीजींनी ब्रिटीश सरकारला नमवले. साधा पंचा नेसणार्‍या त्या फकिराने केवळ उपोषणाचे आत्मक्लेश सोसून देशभरामध्ये आपला विचार अत्यंत प्रभावीपणे पोहोचवला. आज मात्र उपोषणे आणि त्यातही तथाकथित ‘आमरण’ उपोषणे हा फार्स बनून राहिला आहे. कॉंग्रेसचे प्रस्तुत उपोषणही याच जातकुळीतले आहे. जे छायाचित्र व्हायरल झाले आहे ते भाजपाच्या नेत्यांनी जारी केले असले तरी ते खोटे नाही अशी कबुली त्यात दिसणार्‍या कॉंग्रेस नेत्यांनी दिली आहे. त्यांचे म्हणणे असे की, उपोषणाची वेळ होती सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडे चार. मग त्याआधी सकाळी आठ वाजता छोले भटुर्‍यांवर ताव मारला तर त्यात काय बिघडले? वा रे पठ्‌ठ्या! उपोषणाची वेळ पाहिली तर केवळ एक दिवस दुपारचे भोजन चुकवण्याएवढा ‘त्याग’ या मंडळींनी केला. किमान एक दिवसभराचे उपोषण तरी करायचे! उपोषणाची वेळ सहा तास, पण त्यासाठी शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून सकाळी भक्कम आहारावर ताव मारलेला! आणि हे म्हणे ‘उपोषण!’ कॉंग्रेस नेते तीन तासही ‘खाल्ल्या’ शिवाय राहू शकत नाहीत असे टोमणे मग ट्वीटरवर उमटल्यास नवल नाही! निदान एक संपूर्ण दिवस उपवास सोसला असता तर निदान देशातील असे दैनंदिन उपवास घडणार्‍या लाखो दीनदलितांच्या व्यथेप्रती किमान सहानुभूती तरी या नेत्यांनी व्यक्त केल्यासारखे झाले असते. परंतु हा उपोषणाचा देखावा निव्वळ फोटोंपुरता होता हे त्याची वेळ आणि तत्पूर्वीचे खानपान पाहता स्पष्ट होते. एकीकडे ही तर्‍हा, तर दुसरीकडे ज्या मंचावर पक्षाध्यक्ष राहुल गांधी उपोषण करायचे होते, तेथे ८४ च्या शीखविरोधी दंग्यांचे सूत्रधार जगदीश टायटलर विराजमान झालेले. शेवटी कोणाच्या तरी लक्षात ही विसंगती आली आणि त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. धरणी आणि उपोषणे आजकाल राजकारण्यांनी फार स्वस्त करून टाकली आहेत. एकेकाळी याच अहिंसक मार्गांनी देश जागविला होता. आपल्या हाती कोणतेही शस्त्र नसलेल्या आम जनतेला सत्याग्रहाचे केवढे प्रभावी शस्त्र गांधीजींनी दिले होते, परंतु आपल्या प्रसिद्धीलोलूप राजकारण्यांनी आणि सवंग राजकीय पक्षांनी ते पार बोथट करून टाकले आहे. अलीकडेच अभाअद्रमुकच्या उपोषणादरम्यान मधल्या वेळेत कार्यकर्ते बिर्याणीवर ताव मारतानाची छायाचित्रे उघड झाली होती. तोही असाच प्रकार. ज्यासाठी उपोषण आपण करतो आहोत त्या विषयाशी बांधिलकी आणि निष्ठा नसली की असेच व्हायचे. अलीकडेच आणखी एक उपोषण दिल्लीत झाले ते अण्णा हजारेंेचे. यापूर्वी त्यांच्या उपोषणांना मीडियाची प्रचंड प्रसिद्धी मिळत आलेली. साहजिकच अण्णांच्या वागण्या – बोलण्यात प्रति गांधी असल्याचा आव दिसत असल्याचे त्यांचे टीकाकार म्हणून लागलेले. अशातच अण्णांनी यंदा पुन्हा लोकपालसाठी उपोषण केले, परंतु माध्यमांनी यावेळी पूर्ण पाठ फिरवल्याने ते पार फसले. शेवटी भाजपच्या नेत्यांनी रदबदली करून त्यांना ते मागे घ्यायला लावले, परंतु त्यातून तेथे आशेने जमलेल्या शेतकर्‍यांच्या अपेक्षांना तडा गेला. त्यांना ते सगळे घडवून आणलेले नाटक वाटले आणि त्यांनी आयोजकांना जाबही विचारला. उपोषण असो वा धरणे आंदोलन असो, त्याची धार बोथट होऊ द्यायची नसेल तर अशा आंदोलनांचे मार्ग अवलंबिताना पुरेशा गांभीर्यानेच ते हाती घेतले गेले पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठी असले देखावे कराल तर त्याचे बिंग असेच फुटत राहील. ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या विरोधात देशाच्या अनेक राज्यांमध्ये दलितांनी हिंसक निदर्शने केली. जात हा आपल्या देशातील अतिशय संवेदनशील असा विषय आहे. मात्र, केवळ आपल्या राजकीय ईप्सितांना साध्य करण्यासाठी अशा संवेदनशील विषयांवर उपोषणांची असली नाटकबाजी करणे कितपत योग्य आहे? अशा स्फोटक विषयांना एवढ्या सवंग रीतीने हाताळण्याचे परिणाम देशभरामध्ये किती हिंसक प्रकारांत होऊ शकतात याची राहुल गांधींना कल्पना नसावी? राजकीय नेत्यांनी देश जोडायचा असतो. तो तोडणार्‍या गोष्टींना चिथावणी देणारे कृत्य तर अप्रत्यक्षपणे आपल्या हातून होणार नाही ना, याचा विचार किमान त्यांच्यासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी करायलाच हवा. उपोषणे, सत्याग्रह, धरणी, ही या देशाच्या राष्ट्रपित्याने या देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हाती सोपवलेली बिनखर्चाची, आत्मक्लेशाची सहज सोपी, परंतु अत्यंत अमोघ अशी हत्यारे आहेत. त्यांचा असा बाजार मांडला जाता कामा नये. त्यांची धार बोथट होत गेली तर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी हे हत्यार उपसण्याचा सामान्यांचा हक्क हिरावला जाईल त्याचे काय?