उपराष्ट्रपतीपदासाठी आज संसदेत मतदान

0
110

भारताचे नवे उपराष्ट्रपती एनडीएचे व्यंकय्या नायडू की विरोधी पक्षांचे गोपालकृष्ण गांधी याचा फैसला आज संध्याकाळी होणार आहे. उपराष्ट्रपती निवडण्यासाठी लोकसभा व राज्यसभा खासदार आज संसदेत मतदान करणार आहेत. मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने कोणत्याही पक्षाला व्हिप काढता येणार नाही.
सत्ताधारी एनडीएचे लोकसभेत बहुमत असल्याने त्यांचे उमेदवार व्यंकय्या नायडू हेच उपराष्ट्रपती बनतील असे मानले जाते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार असलेल्या रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिलेले बिजू जनता दल व जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षांनी आता गांधी यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. जेडीयूने बिहारमधील महाआघाडीतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली असली तरी त्यांनी या निवडणुकीत प. बंगालचे माजी राज्यपाल असलेल्या गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. आज सकाळी १० ते ५ या वेळेत संसदेत हे मतदान होणार असून संध्याकाळी ७ वा. निकाल जाहीर होणार आहे. यासाठी खासदारांना खास पेनचा वापर करावा लागणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला पूर्ण होणार आहे.