उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती विरोधात कॉंग्रेस आव्हान देणार

0
102

>> आचारसंहिता उल्लंघनाचा दावा

गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू असताना गोवा सरकारने दोघा जणांची जी उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे त्या प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदवलेल्या तक्रारीवर आयोगाने आपला निवाडा दिला नाही तर कॉंग्रेस पक्ष पुढील ४८ तासांत उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. रोहित ब्रास डिसा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

डिसा म्हणाले की, वरील प्रकरणी आम्ही २१ मार्च रोजी येथील मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे तक्रार नोंदवली होती. त्याची प्रत भारतीय निवडणूक आयोगाकडेही पाठवण्यात आली होती. मात्र, आयोगाने वरील तक्रारीसंबंधी कोणताही निवाडा न दिल्याने आम्ही १ एप्रिल, ३ एप्रिल व ७ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला स्मरणपत्रे पाठवली. मात्र, प्रत्येक वेळी आम्हाला वरील प्रकरणी निवाडा झाला नसल्याचे कळवण्यात आले.

आम्ही सुमारे २० दिवस निवाड्याची वाट पाहिली. आता आणखी वाट पाहणे आम्हाला शक्य नाही. आम्ही आता २ दिवस वाट पाहणार असे डिसा म्हणाले.