उन्हाळी फळे आणि त्यांची उपयुक्तता

0
1725
  •  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

वास्तविक रणरणत्या उन्हामुळे सर्वत्र कोरडेपणा वाढत असताना कलिंगड, द्राक्षं, आंब्यासारखी रसरशीत फळे निसर्ग कसा बरे उत्पन्न करतो? हे एक नवलच आहे. पण उन्हाळ्यातील उष्णतेला आणि कोरडेपणाला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी निसर्गाची ही खास योजना समजावी.

आयुर्वेदशास्त्रानुसार दूध व फळे सेवन करण्याच्या वेळात सुमारे दोन तासांचे अंतर ठेवावे. दूध व फळे एकत्र करून कधीच खाऊ नये. दूध व फळे एकत्र करून सेवन केल्यास फुफ्फुसाचे वा त्वचेचे विकार होतात

दिवसेंदिवस सध्या उन्हाळा वाढत असल्याचे दिसते. उन्हाळ्याचा कालावधीही वाढताना दिसतो आहे. तापमानही बरेच वाढताना दिसते. अंग भाजून काढणार्‍या उन्हाळ्याचा अनुभव सध्या येत आहे. सारखा घसा कोरडा पडून तहान लागत आहे. पाणी तरी किती पिणार? रसक्षय होत असल्याने शरीराचे प्रीणन व्यवस्थित होत नाही त्यामुळे शोषाबरोबर सारखा थकवा जाणवतो आहे. उन्हाळ्यातल्या उष्णतेचे नियमन करण्यासाठी, घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश, पुन्हा भरून येण्यासाठी शरीराची पाण्याची किंवा काहीतरी थंड प्यायची ओढ रास्त असते. तसेच शरीराचे प्रीणन हे फळांनी किंवा फलरसातूनच होत असते. म्हणूनच ही ओढ पूर्ण करण्यासाठी निसर्ग उन्हाळ्यात रसाळ फळे भरभरून देत असतो.

वास्तविक रणरणत्या उन्हामुळे सर्वत्र कोरडेपणा वाढत असताना कलिंगड, द्राक्षं, आंब्यासारखी रसरशीत फळे निसर्ग कसा बरा उत्पन्न करतो? हे एक नवलच आहे. पण उन्हाळ्यातील उष्णतेला आणि कोरडेपणाला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी निसर्गाची ही खास योजना समजावी. अशा या उन्हाळ्याला सुसह्य करण्यासाठी आवश्यकता भासते ती फळांच्या रसांची व थंड पेयांची.

थंड पेये पिण्याची कितीही इच्छा झाली तरी शीत पेये मात्र पिण्याचे पूर्णपणे टाळावे. या शीत पेयांमध्ये भरपूर प्रमाणात रासायनिक साखर असते. त्यातही एरिएटेड पेये पचन कार्यामध्ये बाधा निर्माण करतात व शरीरास हानिकारक ठरतात. म्हणून थंड पेयांमध्ये विविध सरबतांचा व फलरसांचा उपयोग करावा.
सरबतांमध्ये लिंबू सरबत, कोकम, आवळा सरबते, कैरीचे पन्हे, ऊसाचा रस, चंदन वा गुलाबाचे सरबत अत्यंत उपयुक्त ठरते. याने तहान तर भागतेच पण त्याचबरोबर शरीराला एक प्रकारचा टवटवीतपणा येण्यालाही मदत होते. शरीर व मनही तृप्त होते.
* लिंबाच्या रसात पाणी, मीठ, साखर टाकून केलेले सरबत हे तहान भागवणारे व लगेच तृप्ती देणारे व रुची उत्पन्न करणारे होय.
* ऊसाचा रसही लगेच तृप्ती देणारा असतो. ऊसाच्या रसात शक्यतो फक्त आले-लिंबू टाकावे, साखर टाकू नये. तसेच ऊसाचा रस बर्फाशिवाय प्यावा. बाहेरच्या ऊसाच्या रसात घातलेला बर्फ कुठल्या पाण्याचा बनविलेला असेल हे सांगता येणे आवघड असते. त्यामुळे बर्फ टाकणे टाळावे.
* कैरीचे पन्हेसुद्धा अत्यंत उपयोगी पेय आहे. उकडलेल्या कैरीचा गर, साखर, गूळ, केशर थंड पाण्यात टाकून तयार केलेले पन्हे उन्हाळ्यात घेणे चांगले.
* उन्हाळ्यात सेवन करण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे चंदनाचे वा गुलाबाचे सरबत. गुलाबाचा वा चंदनाचा अर्क, साखर एकत्र करून बनविलेल्या सिरपमध्ये ऐन वेळी नुसते पाणी घालून सरबत करता येते.
* उन्हाळ्यात दूध पिणे उत्तम. दुधापासून तयार केलेले आईस्क्रीमही खाऊ शकतो. फक्त आईसक्रीम भेसळयुक्त असू नये. आईसक्रीम दुधापासूनच बनवलेले असावे. आयुर्वेदशास्त्रानुसार दूध व फळे सेवन करण्याच्या वेळात सुमारे दोन तासांचे अंतर ठेवावे. दूध व फळे एकत्र करून कधीच खाऊ नये. दूध व फळे एकत्र करून सेवन केल्यास फुफ्फुसाचे वा त्वचेचे विकार होतात हे नक्की. तसेच दूध जास्त प्रमाणात सेवन केल्यास जुलाब होऊ शकतात.
* गुलाब, काजू, बदाम वगैरे टाकून तयार केलेला मिल्कशेक घ्यायला हरकत नाही. पण फळे टाकलेला मिल्कशेक, चिक्कू मिल्कशेक, सिताफळ मिल्कशेक, आंबा मिल्कशेक, मिक्स फ्रूट मिल्कशेक वगैरे न घेणेच चांगले.
* शहाळे तसेच नारळ ही फळेही उन्हाळ्यात नित्य सेवन करण्यास उत्तम असतात.
‘बृहणस्निग्धशीतानि बल्याणि मधुराणि च|’

१) नारळ ः नारळ पौष्टिक, स्निग्ध गुणाचे, शीत वीर्याचे व गोड चवीचे असते. बल्य म्हणजे शरीरशक्ती वाढविणारे असते. शहाळ्याचे पाणी शरीरात चटकन शोषले जाते. तहान शमत नसल्यास उष्णतेने लघवीचा दाह असल्यास, शरीरात कोठेही जळजळ होत असल्यास शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी चहा-कॉफीऐवजी शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम होय. उन्हाळ्याच्या दिवसात नारळाचे दूध घालून तयार केलेली सोलकढी नियमित प्यावी. ओल्या नारळाचा स्वयंपाकात वापर तर आपण नियमित करतोच.

२) लिंबू ः लिंबू बाराही महिने मिळत असले तरी उन्हाळ्यात ते विशेष उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे, पचन मंदावणे, पित्त वाढल्याने जुलाब होणे वगैरे तक्रारी उद्भवू शकतात. लिंबू आंबट चवीचे असल्याने रुचकर असते. भूक वाढवते. दीपक, पाचक, अनुलोमक गुणाचे असल्याने पचन सुधारते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहारात लिंबाचा नियमित समावेश असू द्यावा. शिवाय साखर, मीठ, जिर्‍याची पूड टाकून केलेले लिंबाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीरातील जलांश टिकवून ठेवण्यास मदत करते.

३) कोकम ः लिंबाप्रमाणेच उन्हाळ्यात कोकम (रातांबा) हे फळही उपयुक्त असते. उन्हाळ्यात तयार होणार्‍या ओल्या, ताज्या फळाचे सरबत चवदार तर होतेच पण उष्णतेच्या त्रासाला प्रतिबंध होतो.

४) कलिंगड ः उन्हाळ्यामध्ये कलिंगडंही मोठ्या प्रमाणावर तयार होतात. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता उद्भवू नये म्हणून जणू निसर्गाने या फळाची योजना केलेली आहे. कलिंगडाचा गर लाल रंगाचा असतो. चवीला गोड व अतिशय रसाळ असतो. दुपारच्या वेळी जेव्हा उष्णतेचे प्रमाण वाढते अशा वेळी कलिंगडाच्या रसात थोडेसे काळे मीठ टाकून घोट घोट घेण्यानेही उन्हाळा सुसह्य व्हायला मदत होते.
कालिङ्ग शीतलं बल्यं मधुरं तृप्तिकारकम् |
गुरू पुष्टिकरं ज्ञेयं मलस्तम्भकरं तथा ॥
कलिंगड शीतल, बल्य, मधुर, तृप्ती देणारे, गुरू, पुष्टिकर, मलप्रवृत्ती बांधून करणारे व कफ वाढवणारे आहे. तसेच अतिसेवन केल्यास पित्त, दृष्टी व शुक्रधातूचा नाश करणारे आहे. तरीही उन्हाळ्यात कलिंगडे भरपूर खावीत कलिंगडाच्या बिया मात्र काढाव्यात. कलिंगडाच्या बिया वाळवून, सोलून, मीठ टाकून परतून खाता येतात. कलिंगडाची गोडी व गराचा लालभडकपणा वाढविण्यासाठी त्याला साखरेच्या पाकाची व लाल रंगाची इंजेक्शने देतात… अशा बातम्या व्हायरल होत असतात. त्यामुळे घरी आणलेले कलिंगड अति गोड व लाल वाटल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यास कार्यवाही होऊ शकते. असे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन मदत करणे आवश्यक आहे, जेणेकरून यातून होणार्‍या रोगांना प्रतिबंध घालता येईल. सध्या खूप पदार्थात भेसळ होताना दिसते पण अशा प्रकारची फळांमध्ये होणारी भेसळ सर्वांच्या मदतीने थांबविणे आवश्यक आहे.

५) खरबूज ः कलिंगडाप्रमाणे उन्हाळ्यात खरबूजही मिळते. हे रसाळ फळ कलिंगडापेक्षा गोड असते. खरबूज खाणे तर उन्हाळ्यात चांगले असतेच पण उन्हाच्या झळा लागल्यास खरबूजाच्या बिया वाटून डोक्यावर लावण्याचा व खरबूजाचा रस अंगाला लावल्याने फायदा होतो.

पक्वं तु खर्बुजं तृप्तिकारकं पौष्टिकं मतम् |
कफकृन्मूत्रलं बल्यं कोष्ठशुद्धिकरं गुरू ॥
स्निग्धं सुस्वादु शीतं च वृण्यं दाहश्रमापहम् |
वातं पित्तं तथोन्मादं नाशयेदिति च स्मतम् ॥

पिकलेले खरबूज तृप्तिकर, पौष्टिक, कफकारक, मूत्रल, बलदायक, कोष्ठाची शुद्धी करणारे व गुरू आहे.
खरबहूज स्निग्ध गुणाचे, मधुर रसाचे, शीत वीर्याचे असून वृष्य (शुक्रवर्धक), दाहशामक, श्रमनाशक, वात-पित्तशामक व उन्मादनाशक आहे. खरबूज हे फळ सर्वांगाने उत्तम आहे. पिकलेले खरबूज अत्यंत गोड असते. पण खरबुजावर थोडी पिठीसाखर घालूनही खाता येते.

६) डाळिंब ः उन्हाळ्यामध्ये मिळणारे अजून एक फळ म्हणजे डाळिंब.
पित्तनुत्तेषां पूर्वं दाडियमुत्तमम् |
गोड चवीचे डाळिंब पित्तशामक असते. उन्हाळ्यात गोड डाळिंबाचा रस तृप्तिकर तर असतोच, पण उष्णतेचे निवारण करण्यासाठीही उत्तम असतो. उन्हामुळे पित्त वाढून डोके दुखत असल्यास, मळमळत असल्यास, खडीसाखर डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. तहान फार लागत असल्यास व लघवी उष्ण होत असल्यासही डाळिंबाचा रस थोडा थोडा घेण्याने बरे वाटते.

७) द्राक्ष ः ‘उन्हाळ्यातील वरदान’ असे ज्याच्याबद्दल सांगता येईल ते फळ म्हणजे द्राक्ष होय. सर्व फळात उत्तम सांगितलेली द्राक्षे उन्हाळ्यात प्रत्येकाने अवश्य खावीत.
तृष्णादाहज्वरश्‍वासरक्तपित्तक्षतक्षान् |
वातपित्तमुदावर्तं स्वरभेदं मदात्ययम् ॥

पिकलेली गोड द्राक्षे वात-पित्त दोषांचे शमन करतात. उन्हाळ्यात लागणारी तहान शमवतात. उष्णतेमुळे होणारे दाह, ताप, रक्त-पित्त वगैरे त्रासांवर औषधाप्रमाणे उपयुक्त असतात, आवाजातील दोष दूर करतात, क्षत-क्षय वगैरे धातूंच्या अशक्ततेमुळे होणार्‍या रोगांना दूर करतात.
द्राक्षाचा रस उन्हाळ्यात उत्तम असतो. यामुळे उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ, तोंडाला पडणारा शोष, हातापायांची व डोळ्यांची आग वगैरे लक्षणे शमतात.
बिया विरहित द्राक्षांपेक्षा बीजयुक्त द्राक्षे शुक्रधातूसाठी विशेषत्वाने हितकर असतात.
काळ्या मनुकाही शुक्रधातूसाठी उत्तम असतात. दहा-बारा मनुका रात्री अर्धी वाटी पाण्यात भिजत घालून सकाळी ती त्याच पाण्यात कुस्करून पाण्यासह खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
द्राक्षे मीठ विरघळवलेल्या पाण्यात सुमारे एक तास भिजत घालावीत. नंतर वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवावीत. मगच वापरावीत.

८) अंजीर ः अंजीर हे फळही उन्हाळ्यात तयार होते. चवीने गोड व वीर्याने शीत असणारे अंजीर शरीरपोषक असते. हिमोग्लोबीन वाढण्यास मदत करते.
उष्णतेपाठोपाठ येणार्‍या कोरडेपणामुळे शरीरातील रसधातू क्षीण होणे स्वाभाविक असते. क्षीण रसधातुमुळे जिभ सुकते, तोंड कोरडे पडते. काही करू नये असे वाटते. अशा वेळी अंजीर खाण्याचा चांगला उपयोग होतो.

९) फणस ः फणससुद्धा उन्हाळ्यात येणारे फळ होय. चवीला गोड व शीत वीर्याचा फणस शरीरपोषक असतो.

स्वादूनि सकषायाणि स्निग्धशीतगुरुणि च|

अतिरिक्त उष्णतेमुळे शरीराची शक्ती कमी होणे स्वाभाविक असते. अशा वेळी फणसाचे गरे खाण्याचा उपयोग होतो. मात्र फणस पचायला जड असल्यामुळे अग्नी व पचनशक्तीचा विचार करूनच खावे.

१०) मोसंबी ः गोड मोसंबीचा रस वीर्याने शीत तसेच सत्वर तृप्ती देणारा असतो. उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येऊन शरीरातील जलांश कमी होतो. याचा परिणाम रसधातुवर होऊन थकवा, निरुत्साह जाणवू शकतो. अशा वेळी मोसंबीचा रस घेणे उत्तम असते. विशेषतः दुपारच्या वेळी चहा-कॉफीसारखे गरम पेय घेण्याऐवजी मोसंबीचा रस घेणे उत्तम होय.

११) ऊस ः उन्हाळ्यात शीत पेय पिण्यापेक्षा ऊसाचा रस पिण्याने आश्‍चर्यकारक फायदा होतो.

वृश्यः शीतः रसः स्निग्धो बृहणो मधुरो रसः|
श्‍लेष्मलो भक्षितस्य इक्षोर्यात्रिकस्तु विद्ह्यते ॥

ऊस चवीला गोड, वीर्याने शीत, गुणाने स्निग्ध, पौष्टिक, शुक्रवर्धक व कफवर्धक असतो. या सर्व गुणांमुळे उन्हाळ्यातील उष्णतेचे निवारण करण्यासाठी तसेच शरीरशक्ती टिकविण्यासाठी ऊस दातांनी चावून खाणे सर्वांत चांगले. ऊसाचा रस काढायचा असला तर ऊसाचे मूळ, शेंडा, साल वगैरे बाजूला करून, ऊस स्वच्छ धुवून मगच चरकात टाकून रस काढावा. ऊसाच्या पेरांवर असलेले कडक आवरण काढल्याशिवाय किंवा नीट स्वच्छता न ठेवता काढलेला रस मात्र विदाही म्हणजे दाह करणारा ठरू शकतो.

१२) आंबा ः उन्हाळ्यात येणारे सर्वांत लोकप्रिय फळ म्हणजे आंबा.
‘फळांचा राजा’ ही उपाधी लाभलेल्या या फळामुळे उन्हाळा सुसह्य तर होतोच, शिवाय उन्हाळ्यातील उष्णता आंबा पचविण्यास मदत करते.
पक्वमात्रं जयेद्वायुं मांसशुक्रबलप्रदम् |
पिकलेला आंबा वातदोषाला जिंकतो, मांसधातू तसेच शुक्र धातूची ताकद वाढवितो. शरीरशक्ती वाढवतो.

पिकलेला आंबा तास-दोन तास साध्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर त्याचा रस काढून दोन चमचे साजूक तूप, एक-दोन चिमूट मिर्‍याची पूड, सुंठीचे चूर्ण टाकून दुपारच्या जेवणात घ्यावा. यामुळे उन्हाळ्यामुळे वाढणारी रूक्षता आटोक्यात राहते. रक्तादी धातूंचे पोषण होते.

उन्हाळ्यामुळे कोमेजलेल्या चित्तवृत्ती पुन्हा उल्हसित होतात. मधुमेहाच्या रुग्णांनी, वजन जास्त असलेल्या व्यक्तींनी मात्र वैद्याच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये.
तसेच आंबा हा उष्ण गुणाचा असतो, त्यामुळे लहान मुलांनी आंबे खाल्ल्यावर त्यांना नको त्या ठिकाणी गळवे आलेली दिसतात. आंब्याचा त्रास टाळण्यासाठी आंबा पाण्यात भिजत घालून तूप टाकून खावे.
बर्‍याच लोकांना आंबा मानवतो, त्यामुळे शरीर पुष्ट होते, वजन वाढते, शरीरातील वीर्यधातू वाढतो.

आंबा पचायला हवा असेल तर, आंब्याचा दोष न लागता त्यातील अमृतत्व मिळवायचे असेल तर आंब्याचा रस तूप टाकून खावा.
अशा प्रकारे उन्हाळ्यात निसर्गाने भरभरून दिलेल्या फळरूपी वरदानाचा युक्तिपूर्वक वापर करून घेतला तर त्यामुळे उन्हाळा सुसह्य होतोच. शिवाय आरोग्यही टिकून राहण्यास हातभार लागतो.