उन्हाचे घुमट खांद्यावर

0
190

– माधव बोरकार

‘‘उन्हाचे घुमट खांद्यावर’’ या डॉ. अनुजा जोशी यांच्या दुसर्‍या कवितासंग्रहाचे प्रकाशन मा. सतीश काळसेकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते आणि वक्ते वीरधवल परब, गोविंद काजरेकर आणि अनिल सामंत यांच्या उपस्थितीत रविवार दि. २४ रोजी होत आहे. त्यानिमित्त …

आजची मराठी कविता बरीचशी ‘कंठाळी’ आणि बिनचेहर्‍याची वाटते असा तक्रारीवजा सूर ऐकू येतो. या सुरात काही बाबतीत तथ्य आहे हे सत्य नाकारता येत नाही. कदाचित आशयाच्या गरजेतून तिचा चढा सूर लागतो असं असू शकतं. स्त्रीवादी कविता किंवा विद्रोही कविता थोडी ‘लावड’ वाटते. तिच्यात भाव कमी व विचार जास्त असं एक चित्र उमटतं. काव्य व कलात्मकता हरवलेली कविता शुष्क व बटबटीत वाटते हे सत्य आहे. आजची बव्हंशी कविता या प्रकारात मोडते. अशा कविता अनुभवातून नव्हे तर केवळ चूस म्हणून लिहिली जाते.
या पार्श्‍वभूमीवर ‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ हा अनुजा जोशी यांचा नवा कवितासंग्रह एक वेगळी अनुभूती देऊन जातो. या संग्रहातल्या त्यांच्या कवितांना स्वतःचा चेहरामोहरा आहे व तो ठाशीव आहे. त्यांच्या पहिल्या संग्रहातल्या कविता परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या आपली स्वतंत्र वाट चोखाळण्याच्या प्रयत्नात होती. कवीला आपला स्वतःचा सूर सापडण्यास बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. पण अनुजा जोशी यांना आपलं स्वतःचं व्यक्तिमत्त्व व सूर सापडलेला आहे याचे प्रत्यंतर त्यांच्या या कवितासंग्रहात मिळते.
कविता सांगत नाही काहीच स्पष्टपणे
ती दाखवते फक्त
जगण्याच्या शक्यता
ठासून भरलेल्या …
या जगण्याच्या शक्यताच मानवी जीवनाला परिपूर्णतेकडे नेत असतात. हा ध्यास आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देत असतो. सगळंच काही कवितेनं सांगितलं पाहिजे का, असा प्रश्‍न या ओळी अत्यंत सूचकपणे व्यक्त करतात. समाजव्यवस्थेची मक्तेदारी कवितेने घ्यावी असा एक विचारप्रवाह साहित्यव्यवहारात होता आणि आजही त्याचे पडसाद उमटत असतात. अनुजा जोशी या विचारधारेच्या दावणीला आपल्या कवितेला बांधून ठेवत नाही. ती स्त्री मानसिक व शारीरिक दुःख व वेदना अत्यंत संयतपणे करते.
‘बाई’ म्हणून मिळणारे
ग्रेस मार्क्स नकोत मला
किंवा ‘बायको’ म्हणून होणारं
मायनस मार्किंगही नको
ही स्त्री आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेते. तिला आता कुठेच जोडून रहायचं नाही. तिला प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर आपणच द्यायचं आहे. स्वतःच्या विश्‍वासाच्या आधारानं तिला अचूक पर्याय निवडून बिनचूक उत्तराच्या दिशेनं जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा आहे. तिची आकांक्षा ही मानवी मूल्य परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे.
‘माणूस’ नावाचा
शिलालेख लिहून!
या संग्रहातील ‘दुख’ ही कविता स्त्री असण्याचा अचूक वेध घेते. कंबर दुखणं ही एक शारीरिक पीडा असते. बाईमाणसाची या व्याधीतून सुटका नसते. घर हा एकखांबी तंबू असतो व तिच्या अडचणीमुळे ‘कायच करूंक मेळना| धांदल जाल्या घरान’ अशी त्या घराची अवस्था होत असते.
‘अशी तक्रार घेऊन आलेल्या | सगळ्या कमरा तपासल्यानंतर | असं लक्षात आलं आहे की | दुखणार्‍या कमरांच्या पोकळीत | एकेक गर्भाशय आहे | आणि ‘दुख’ तिथेच आहे!’ ‘रोज नवी नवी बाई माझ्या डोळ्यादेखत’ या कवितेत बाईची होणारी कुतरओढ फार प्रभावीपणे व्यक्त होते. या स्त्रीच्या मनातली अढी हलता हलत नाही. ती या अढीच्या कोषातच गुमान कुढत बसते. हतबलपणे कुढत बसणे हे तिचं अटळ प्राक्तन. एक स्त्री या नात्यानं तिच्याही काही शारीरिक व मानसिक गरजा असतात पण त्याकडे आपलं संपूर्ण दुर्लक्ष होत असतं. ‘ती पुन्हा पुन्हा झुरत राहते | नव्या नव्या मरणासाठी |’ स्त्रीकेंद्रित कविता रूपकाच्या माध्यमातून व्यक्त होताना तिची सौंदर्यकळा अनेक अंगांनी फुलून येते. ‘पीक’ या कवितेत रूपक काव्यालंकाराचा प्रभावी वापर कवयित्री करते. मोगरीचा बहर येणे तिला ‘हुलपवतात’. तिला अशी होरपळवल्यानंतर ती हिरवीकंच पालवते आणि या प्रक्रियेनंतर ती अंगभर फुलून येते अवसर आल्यासारखी. या कवितेच्या शेवटच्या ओळी फारच अर्थपूर्ण आहेत.
तिच्या
फुलून येण्याचा
हा निसर्गनियम
नेमका
कळला
आहे,
त्याला!
कमीत कमी शब्दांतून खूप मोठा आशय सूचकतेनं इथे व्यक्त होतो. स्त्रीकेंद्री कविता तिचे दुःख व्यक्त करताना भडक होण्याची शक्यता असते. पण अनुजा जोशीच्या कवितेत हा भडक रंग कुठेच आढळत नाही. उलट ती एक तरल संवेदना व्यक्त करते. स्त्रीजीवनाविषयक प्रगल्भ जाणीव या कवितेत दिसून येते. या जाणिवा अभिव्यक्त होताना त्या कथनपर होतात व या कवितेत तीव्र संवेदनशीलता दिसून येते.
या संग्रहातील तीन कविता छंदोबद्ध आहेत. मुक्तछंदाइतकीच तिची छंदोबद्ध रचनेवर पकड आहे याची ग्वाही या कविता देतात. वेगळ्या आशयासाठी केलेली ही वेगळी मांडणी. या तिन्ही कविता आत्मनिष्ठ आहेत. उजेड आणि काळोख या दोन प्रतिमा प्रामुख्यानं या कवितेत येतात. ‘विस्मरला गर्भवास | बंदिवास हृदयाचा | स्मरला मी रोज पुन्हा | सूर्य एक उदयाचा.’ कवयित्रीला अर्धी उघडी खिडकी म्हणजे अर्धा उजेड आहे असं वाटतं. किंवा ‘चांदण्याचे तळे कुणी उचलून नेले | धुकाळ मळे कुणी आणून ठेवले |’ असा हा व्यक्त-अव्यक्ताच्या सीमारेषेवरचा अमूर्त अनुभव ः
पापणीत पुन्हा चंद्र सावली पडली
काळोखाची वेल दाराबाहेर ठेवली
‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ संग्रहातील शब्दकळा लक्षणीय आहेत. काही कवितांत कोंकणी शब्दांचा वापर चपखलपणे केलेला आहे. ही शब्दकळा केवळ अभिव्यक्तीपुरती नसून ती त्यांच्या कवितेच्या आशयाहून अभिन्न आहे. त्यामुळे ती उपरी बिलकूल वाटत नाही. उलट या कवितेत इथल्या मातीचा गंध येतो.
समाजवास्तव अथवा स्त्रीवादी कविता अखेरीस वक्तृत्वाच्या आहारी जाण्याचा फार मोठा धोका असतो. तो धोका विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक इथे टाळलेला दिसतो. एक समर्थ कवयित्री म्हणून अनुजा जोशी यांचे हे मोठे यश आहे. आपले वेगळेपण जपलेली ही कविता…