‘उद्बोधन’ महत्त्वाचे केवळ ‘ज्ञानदान’ नव्हे!!

0
1610

शालेय किंवा विश्वविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मूल जेव्हा समाजात आपल्या उपजीविकेसाठी हालचाल करु लागते तेव्हा कोणती जीवनावश्यक मूल्ये जोपासावीत हे प्रबोधन व त्या प्रबोधनातून जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिक्षक व पालक आपल्या भावी पिढीला देईल तर या कलियुगाचे सुवर्णयुग व्हायला वेळ लागणार नाही हे निश्‍चित!

आपल्या राष्ट्रात सर्वत्र ५ सप्टेंबर हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या स्वतंत्र राष्ट्राचे भूतपूर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा हा जन्मदिवस. ते एक उत्कृष्ट शिक्षक होते म्हणून या दिवसाला ‘शिक्षक दिन’ असे गोंडस नाव बहाल केले गेले. या दिवशी खेडेगाव ते शहर – अंगणवाडी ते महाविद्यापीठ यातील विद्यार्थी आपल्या सर्व शिक्षकांचा सन्मान करतात, त्यांच्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातात, त्यांना भेटवस्तू व फुले दिली जातात तर काही शाळांतून या दिवशी विद्यार्थीवर्गच शाळेचे त्या संपूर्ण दिवसाचे कामकाज स्वतः करतात व शिक्षकांना ‘आराम’ देतात – अगदी ‘शिपाई ते मुख्याध्यापक’ या सर्व जबाबदार्‍या विद्यार्थी आवडीने पार पाडतात. राज्य पातळीवर तर राज्य सरकार शिक्षणखात्यातर्फे शिक्षकांचे गुणगान करते – काही ‘विशेष कामगिरी’ करणार्‍या शिक्षकांचे कौतुक केले जाते, समारंभ आयोजित केले जातात, शिक्षकांना बक्षिसे, पुरस्कार दिले जातात… शिक्षकांच्या कार्याची राज्य व राष्ट्र पातळीवर दखल घेतली जाते, त्यांना गौरवान्वित केले जाते व त्यांच्या शिक्षकी पेशाची कारकीर्द अधिक दोन वर्षांनी वाढविली जाते!! हे सर्व कार्यक्रम स्तुत्यच आहेत फक्त यासाठी त्या शिक्षकाने, स्वतः आपल्या व इतर विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी ‘काय केले’ याची इत्थंभूत माहिती शिक्षणखात्याकडून आलेल्या ‘प्रश्‍नसूचित’ स्वहस्ते लिहून पाठवणे आवश्यक असते! थोडक्यात काय, सरकार दरबारी आपले कौतुक आपणच करून घ्यायचे!! शिक्षणखात्याला आपली माहिती आपणच पुरवायची अन् मिळवायचे काय….? – शाल, श्रीफळ, रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, दोन वर्षे वाढवलेला कार्यकाल, भरपूर टाळ्या, वर्तमानपत्रात फोटो इ.इ.इ. – ‘ज्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस राष्ट्रभरात साजरा केला जातो त्या ‘सर्वपल्ली’ आत्म्याला काय वाटत असेल?’ – असा विचार माझ्या मनात आला… म्हणून या दिवसाचे औचित्य साधून माझे काही विचार या लेखात मी मांडायचे धाडस करतेय…
‘आंतरभारती’चे स्वप्न रंगवणारे साने गुरुजी आणि ‘विश्‍वभारती’ची कल्पना साकारणारे रविंद्रनाथ टागोर हेही शिक्षकच होते! संस्कार व संस्कृती यांचा सुंदर समन्वय दोघांनाही साधला होता. आज त्यांची परंपरा फक्त ‘शिक्षक’ म्हणून चालवणार्‍या आपण शिक्षकांनी त्यांची कोणती मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवतोय याचा विचार करायला हवा!
‘सतत विद्यार्थी राहतो तोच खरा शिक्षक’ असा सुविचार मी ‘शिक्षक प्रशिक्षण’ घेताना ऐकला होता! म्हणजे सर्वांत प्रथम, शिक्षकाने ‘विद्यार्थीपणाचे ब्रीद’ पाळले पाहिजे- आजच्या तरुण पिढीतील शिक्षक हे ब्रीद विसरला आहे असे जाणवते. भरपूर पगार, मुबलक सुट्‌ट्या व दिवसातील सहा तास विद्यार्थ्यांबरोबर घालवणे हे या पेशाचे स्वरूप समजून खुपसे तरुण या पेशाकडे वळतात पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसमवेत काही काळ घालविल्यानंतर … ‘उगीचच हा पेशा स्वीकारला’ असे त्यांना वाटू लागते… मग कसेतरी दिवस – वर्षे ढकलणे हा एकच मार्ग त्यांना सापडतो…
याउलट ‘खरा शिक्षक’ आपल्या कामाचे तास कधीच मोजत नाही. त्याच्या मनात कायम आपल्या विद्यार्थ्याविषयी तळमळ, आस्था, काळजी, अप्रूप, प्रेम, इ. सकारात्मक भाव अस्तित्वात असतात. समाजात ठिकठिकाणी सर्व क्षेत्रात चमकणारे विद्यार्थी हेच त्यांचे खरे वैभव असते! – काही वर्षांपूर्वी एक परिसंवाद रंगला होता – शिक्षक व गुरू यात श्रेष्ठ कोण? – मानवी इतिहासातील पहिला शिक्षक व पहिला गुरू कोण? – प्रश्‍न मोठे मार्मिक होते – बहुतेकांनी उत्तर दिले, ‘पहिला शिक्षक म्हणजे आई व पहिले गुरू महर्षी व्यास’ – ‘आई प्रपंच शिकवते व गुरू परमार्थ घडवतात!’ विद्यार्थ्याला दोघांची समान आवश्यकता असते- मला तर वाटते शिक्षक हा गुरूही असतो व गुरू हे शिक्षकही असतात म्हणूनच आपल्या संस्कृतीत ‘गुरूपौर्णिमे’इतकेच महत्त्व ‘शिक्षक दिना’लाही आहे आणि ते असलेच पाहिजे.
‘‘शिक्षण हे सतीचं वाण आहे. उद्बोधन महत्त्वाचं असतं. नुसतं ज्ञानदान नव्हे. उद्बोधनातूनच प्रबोधनाचा रस्ता जातो. शिक्षकाचं काम प्रबोधनकाराचं नसून प्रबोधनाचा मार्ग दाखवण्याचं, उजळवण्याचं असतं…!!’’- एका प्रथितयश शिक्षणतज्ज्ञाचे हे सुविचार!! खरंच आहे. शिक्षण हे ‘सतीचं वाण’ आहे. सती म्हणजे पार्वती, आदिशक्ती – ती चिरंजीव आहे. तिचे वाण हे चिरंजीवच असणार – ज्ञान हे कधीही नाशवंत नाही. मानवाच्या जन्माबरोबरच त्याची उत्पत्ती आहे व त्याच्या मृत्यूबरोबरच त्याच्या ठिकाणी या शिक्षणाचा लय आहे. असे असले तरी, मानवाने जीवनात मिळवलेले शिक्षणरुपी ज्ञान हे त्याच्या पुढच्या पिढीकडे प्रवाहित होतच असते म्हणूनच ते ‘चिरंजीव’ आहे. एकदा का ते स्वीकारले की त्यातून सुटका नाही! ज्ञान मिळविण्यासाठी चार भिंतींची चौकट असावीच असाही काही नियम नाही. कविवर्य ग. दि. माडगूळकर लिहितातच की ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु…!’ काहीही होवो, ज्ञानदेवीकडून मिळालेला हा वसा शिक्षकाने निश्‍चयाने व प्रेमाने पुढील पिढीच्या सुपूर्द केला पाहिजे – गुरूने दिला ज्ञानरुपी वसा! आम्ही चालवू हा पुढे वारसा!! असे झाले पाहिजे. शिक्षणात ‘उद्बोधन’ महत्त्वाचं असतं, नुसतं ज्ञानदान नव्हे – प्राप्त केलेल्या ज्ञानातून जनहितार्थ व स्वहितार्थ उत्तम उदात्त असा बोध होणे आवश्यक असते. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. नुसत्या बोटाच्या स्पर्शाने माहितीची कवाडं दिलखुलास उघडतात. विश्‍वातील कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान ‘एका बटणात’ सामावलेले आहे म्हणूनच ‘ज्ञान देणे’ हे कर्तव्य आता शिक्षकापुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षकाने विद्यार्थ्याचे ‘प्रबोधन’ करणे आवश्यक आहे. प्रबोधन करणे म्हणजे जागे करणे व प्रबोध म्हणजे यथार्थ ज्ञान व आपली दृष्टी यांच्यामध्ये एक अज्ञानाचा, भ्रमाचा पडदा आहे. फक्त तो दूर करण्याचे काम शिक्षकाला करावे लागते. विद्यार्थी जन्मतःच ज्ञानी असतो.
आजच्या नवीन बालकांकडे पाहिले की कळते आपण शिक्षक व पालक किती अपूर्ण आहोत. आजही आपल्या देशात जुन्या पद्धतीनेच शाळेत ‘शिकवणे’ चालू असते. मुलाला स्वतः शिकण्यासाठी, त्याच्या जिज्ञासेची भूक मिटवण्यासाठी किती शिक्षक परिश्रम घेतात? आधी ‘घोकंपट्टी’ व नंतर ‘ओकंपट्टी’ हीच सोळाव्या शतकातली आपली शिक्षणपद्धती अजूनही एकविसाव्या शतकात चालू आहे… काळ बदलला, सत्ता बदलल्या, शिक्षणाधिकारी बदलले… परन्तु शिक्षक व शिक्षणप्रणाली मात्र अजूनही तीच आहे. पाठ्यपुस्तके बदलली असतीलही परन्तु त्यातील ‘विषयवस्तू’ काही बदलल्या नाहीत. जीवनावश्यक मूल्ये शिकण्यासाठी मुलांना पाठ्यपुस्तकांची मदत घ्यावी लागते कारण शिक्षक आपल्या नित्याचरणातून त्यांना ही मूल्ये देण्यात अयशस्वी ठरतोय. पालकांनी बालकांचे हट्ट पुरविण्यासाठी आणलेल्या वस्तूंच्या किंमती मुलांना कळतीलही पण त्या वस्तूंचा वापर कसा केला पाहिजे हे मूल्य पालक आपल्या बालकांना शिकवतात का? आपण गाडीत पेट्रोल भरतो. पेट्रोलची किंमत रु ६०/- प्रति लीटर हे मुलाला कळले तरी ते पेट्रोल ज्या मातीतून खणून काढले त्या कामगारापासून आपल्या गाडीच्या टाकीत ते भरण्यापर्यंत ज्या ज्या लोकांनी श्रम केले त्या श्रमाचे मूल्य मुलाला शिकवणे आवश्यक आहे. आपण नित्य आहारात जे अन्नपदार्थ सेवन करतो ते पिकवण्यासाठी जे शेतकरी कष्ट करतात त्यांच्यापासून ते आपल्या ताटात सुग्रास अन्न वाढण्याचे काम जी कोणी गृहिणी करते त्या सर्व व्यक्तिंच्या कष्टाचे मोल करणे आपण मुलांना शिकवले का? शाळेत ज्या पाठ्यपुस्तकांचा, वह्यांचा उपयोग गुण मिळविण्यासाठी मुले करतात ती पाठ्यपुस्तके, वह्या तयार करण्यासाठी किती झाडांची कत्तल झाली आहे याचे मूल्य केवळ ‘किंमत’ देऊन करायचे का?- ही वृत्ती शिक्षकांनी विद्यार्थ्यांत कशी रुजवली हे महत्त्वाचे आहे. शालेय किंवा विश्वविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मूल जेव्हा समाजात आपल्या उपजीविकेसाठी हालचाल करु लागते तेव्हा कोणती जीवनावश्यक मूल्ये जोपासावीत हे प्रबोधन व त्या प्रबोधनातून जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिक्षक व पालक आपल्या भावी पिढीला देईल तर या कलियुगाचे सुवर्णयुग व्हायला वेळ लागणार नाही हे निश्‍चित! ‘ज्ञानार्जन पूर्णपणे यशस्वी झाले’ असे छापील प्रमाणपत्र मिरवण्याने, एखाद्या विषयाची ‘डिग्री’ मिळवणे म्हणजे ‘शिक्षण’ नव्हे तर त्या डिग्रीला योग्य न्याय देऊन धर्माचरण करणे हेच मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे असे सर्वश्रेष्ठ गुरू भगवान श्रीकृष्णांनी आपल्या शिष्याला भगवद्गीतेतून उद्बोधित केले. दुर्दैवाने ही श्रीकृष्णाची भगवद्गीता आज ‘हिंदू धर्मग्रंथ’ म्हणून नजरकैदेत आहे! त्यातून शिक्षणाची मूल्ये आपण आपल्या जीवनात रुजवायचे विसरलो आहोत. आपले भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या दिव्य गीता ग्रंथाचे मूल्य जाणले व प्रत्यक्ष तसे जगले…. अजूनही वेळ गेलेली नाही… अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली…
काही शैक्षणिक संस्था, काही शिक्षक अशा मशाली पेटवून विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला प्रबोधनाचा मार्ग दाखवण्याचे, उजळवण्याचे उत्स्फूर्त कार्य करतच आहेत… परन्तु हा सेतू बांधायला ‘सेने’ची गरज आहे… एकटी खारुटी काय करेल? ‘जगावेगळं’ बनायचं असेल तर थोडं ‘वेगळं जगणं आवश्यक आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम एक उत्कृष्ट शिक्षकही होते – त्यांनी ‘प्रज्वलीत मनाने’ असीम अवकाशात उडण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘अग्निपंख’ दिले… आपणही नव्या पिढीला नवी उभारी देऊन हा ‘शिक्षक दिन’ समर्थपणे नव्याने साजरा करुया!!