उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार

0
253

>> ३२ दिवसांनंतर ३६ मंत्र्यांचा शपथविधी ः अजितदादा उपमुख्यमंत्री

अखेर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विस्तारीत मंत्रिमंडळाचा शपथविधी काल विधीमंडळ परिसरात पार पडला. सरकार स्थापनेच्या ३२ दिवसांनंतर ३६ मंत्र्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांच्यासह अजित पवार, अशोक चव्हाण या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ३६ मधील २६ कॅबिनेट मंत्री असून १० जण राज्यमंत्री आहेत.

दरम्यान, या मंत्र्यांचे खाते वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मंत्रिमंडळ विस्तारप्रकरणी सत्ताधारी गटात कोणतीही नाराजी नसल्याचा दावाही त्यांनी केला.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला अनपेक्षित वळण देणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकादा सत्तेचे वाटेकरी बनले आहेत. त्यांनी काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी केवळ दीड महिन्यात या पदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या चार दिवसांच्या अल्पजीवी मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

उद्धव ठाकरे यांच्या या मंत्रिमंडळ विस्तारात तीन महिला आमदारांना स्थान देण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर व राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. गायकवाड व ठाकूर यांना कॅबिनेट तर तटकरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे.

अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, सतेज उर्फ बंटी पाटील, दत्तात्रय भरणे, बच्चू कडू, विश्‍वजित कदम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांची मंत्रिपदासाठी निवड केली.

अजित पवार बनले
चौथ्यांदा उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अलीकडेच म्हणजे गेल्या २३ नोव्हेंबर रोजी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात तिसर्‍यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर काल त्यांनी चौथ्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर त्याआधी १९९९-२०१४ या कालावधीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युती सरकारात त्यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम सांभाळले होते.