उदयोन्मुख कलाकारांसाठी कला दालन उभारणार

0
225

>> कला-संस्कृती मंत्र्यांची ग्वाही

>> राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन- बक्षीस वितरण

कलाकारांना कोणतीच कमतरता भासता कामा नये याची खबरदारी घेतली जाईल असे सांगून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी उदयोन्मुख कलाकारांसाठी कला दालन उभारण्याचे आपले स्वप्न आहे असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल सांगितले.

कला अकादमी गोवा आयोजित ४३व्या राज्य कला प्रदर्शनाचे (चित्रकार विभाग) अकादमीच्या कला दालनात उद्घाटन केल्यानंतर श्री. गावडे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. उद्घाटनसमयी कला अकादीमचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर, ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र आमोणकर, राजीव शिंदे, सतीश गवस, ज्येष्ठ चित्रकार सदाशिव परब उपस्थित होते. कलाकार हा समाजाचा आरसा असतो असे नमूद करून गावडे यांनी कलाकार जीवन सुफल करण्याचा मार्ग दाखवतो असे सांगितले.

४३ व्या राज्य कला प्रदर्शनातील विजेत्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कला इतिहास अभ्यासक डॉ. नितीन हडप (पुणे) यांचे यावेळी ‘मोबाइलक्रांतीपूर्वीची सेल्फ पोर्टेट’ या विषयावर स्लाईड शोच्या आधारे व्याख्यान झाले. त्यांनी यासंदर्भात अनेक मान्यवरांची ‘सेल्फ पोर्टेट’ स्लाईड शोद्वारे दाखवून त्यांची वैशिष्ट्ये सांगितली. त्यात मनू पारिख, दिलीप रानडे, अतुल दोडिया, अनिश कपूर, कोली, फ्रिडा, सुधीर पटवर्धन, हेमा उपाध्याय, मिथु सेन आदींचा समावेश होता. राज्य कला प्रदर्शनातील चित्रकृतींचा ६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत रसिक आस्वाद घेऊ शकतील.