उत्पलचे पदार्पण

0
266

शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला थेट निशाणा करीत उत्पल मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या राजकीय क्षितिजावर दमदार पदार्पण झाले आहे. राजकारणातील दुधाचे दात अजून पडलेले नसताना थेट पवारांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत त्यांनी दाखवली हे विस्मयकारक आहे. आपल्या दिवंगत पित्याच्या नावाने राजकारण करू नका असे त्यांनी पवारांना बजावले. वास्तविक, ‘राफेल करारातील बदलांशी सहमत नसल्याने पर्रीकर संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात परतले’ एवढेच पवार म्हणाले होते, परंतु उत्पल यांनी त्यांना दोन पानी खरमरीत पत्र लिहिले. आपल्या पित्याच्या नावे राजकीय खेळी खेळली जाऊ नये या स्वयंप्रेरणेने उत्पल यांनी हे पत्र लिहिले असेल तर ठीकच आहे, परंतु असे प्रत्युत्तर देण्यास त्यांना कोणी भावनिक मुद्द्यावर प्रवृत्त केले असेल तर मात्र अशा गोष्टींबाबत त्यांनी सावध राहणेच इश्ट ठरेल. राजकारणातील पदार्पणाच्या पायरीवरच उत्पल यांनी अशा प्रकारे वादाच्या कात्रीत न सापडणे त्यांच्याच हिताचे ठरेल. राजकारणात ते नवखे आहेत. त्यामुळे आपल्या नथीतून तीर मारले जाऊ नयेत आणि अकारण आपण लक्ष्य होऊ नये यासाठी त्यांनी सदैव दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. संरक्षणमंत्रिपद सोडून पर्रीकर गोव्यात परतले त्यामागे गोव्याविषयी व गोमंतकीयांविषयी प्रेम होते हे त्यांचे म्हणणे खरेच आहे, परंतु त्याच बरोबर संरक्षण मंत्रालयातील एकंदर व्यवहारांबाबत ते संतुष्ट नव्हते हेही वास्तव आहे. गोव्यातील संपादकांशी केलेल्या एका भोजनोत्तर वार्तालापात पर्रीकरांनी आपली ही खंत सूचकपणे बोलूनही दाखवली होती. ‘संरक्षण मंत्रालयातील दर तीन माणसांपैकी दोन दलाल असतात’ असे त्यांनी तेव्हा व्यथित होऊन सांगितले होते. राफेलच्या वाटाघाटी पर्रीकरांनी फ्रान्सच्या दूतांशी केल्या, परंतु ज्यावरून गदारोळ चालला आहे, त्या नंतरच्या घडामोडींशी त्यांचा काही संबंध नव्हता. त्यामुळे राफेलवरील टीका उत्पल यांनी एवढी जिव्हारी लावून घेण्याचे कारण नाही. राफेलचा एवढा मोठा गदारोळ देशभरात चालला आहे, परंतु पर्रीकर यांच्यावर किटाळ उसळलेले नाही. तशी कोणाची हिंमतही झालेली नाही याचा उत्पल यांना अभिमान जरूर असायला हवा. आपल्या दिवंगत पित्याच्या मृत्युपश्‍चात् त्याच्या नावावर गलीच्छ राजकारण खेळले जाऊ नये ही त्यांची भावना असेल तर तीही अगदी समजण्यासारखीच आहे, परंतु आपल्या राजकीय प्रवेशाच्या जोशात आपण आपल्या कक्षेबाहेरील गोष्टींचे नकळत समर्थन करीत कोणाच्या हातचे बाहुले बनणार नाही याची काळजीही त्यांनी जरूर घ्यावी. उत्पल हे आपल्या पित्यापश्‍चात् सध्या पक्षकार्यात सक्रिय झालेले आहेत. पणजी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीच्या रिंगणातही ते लवकरच उतरणार आहेत. पर्रीकर यांच्यासारख्या गोव्याच्या लाडक्या लोकनेत्याचा सुपुत्र या नात्याने गोव्याची आणि गोमंतकीयांची त्यांना उदंड सहानुभूती आहे, पण राजकारण हे फार क्रूर क्षेत्र आहे. येथे समोरून नव्हे, पाठीत खंजीर खुपसले जातात. त्यामुळे आपले प्रत्येक पाऊल मोजूनमापून आणि जपून टाकले तरच या क्षेत्रात त्यांच्यासारख्याचा निभाव लागू शकेल. ते पर्रीकरांचे पुत्र जरूर आहेत, परंतु पित्याची धडाडी त्यांच्यात उतरली आहे की नाही हे अजून कसाला लागलेले नाही. मनोहर पर्रीकर यांच्या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी कधीही घराणेशाही आणण्याचा प्रयत्न केला नव्हता. आपल्या मुलाला राजकारणात उतरवणे त्यांना कधीही शक्य होते, परंतु त्यांनी तसे जाणीवपूर्वक केले नाही. पर्रीकर यांच्या समस्त कुटुंबाचेही कौतुक करायला हवे. त्यांच्यापैकी कोणीही कधीही प्रकाशझोतात येण्याचा अट्टाहास बाळगला नाही. ते सदैव प्रसिद्धीपासून आणि सत्तेपासून दूर आपले खासगी जीवन जपत राहिले. पर्रीकरांचे बंधू असोत, भगिनी असोत; त्यांना आपल्या भावाचा प्रचंड अभिमान होता, प्रेम होते, परंतु आपल्यामुळे सत्तेचा फायदा घेण्याचा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. आज उत्पल राजकारणात उतरत आहेत, त्यामागेही सत्ताकांक्षेपेक्षाही आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचीच प्रेरणा आहे. त्यामुळे गोमंतकीय जनता त्यांच्याकडे आपुलकीने नजर लावून राहिली आहे. राजकारणातील कोरी पाटी हे जसे त्यांच्यासाठी बलस्थान आहे, तितकीच ती त्यांची त्रुटीही बनू शकते. पर्रीकरांपाशी जी स्वतंत्र प्रज्ञा होती, तशीच स्वतंत्र प्रज्ञा उत्पल यांनी दाखवावी अशी अपेक्षा आहे. त्यांनी आपले निर्णय स्वतः घ्यावेत व विचारपूर्वक घ्यावेत. आपल्या पित्याची सहानुभूती त्यांना नजीकच्या भविष्यात कदाचित हात देईल, परंतु राजकारणाच्या या क्षेत्रात टिकायचे असेल, वाढायचे असेल तर तेथे स्वतःची कर्तबगारीच लागेल. सहानुभूती काही काळापुरतीच मदतीला येऊ शकते, ती काही कायम उरणार नाही. पुढचा प्रवास स्वतःच्या हिंमतीवरच करावा लागणार आहे. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी राजकारणात शिकायचा पहिला धडा म्हणजे कमी बोलणे आणि जास्त काम करणे. उत्पलही तो शिकतील अशी अपेक्षा आहे!