उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आज ७३ जागांसाठी मतदान

0
111

>> पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी कडेकोट सुरक्षा

 

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज १५ जिल्ह्यांतील सर्व ७३ जागांसाठी मतदान होत असून निवडणूक आयोगाने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. एकूण १४,५१४ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होईल. सुमारे २.५९ कोटी मतदार आज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करतील.
धार्मिकरित्या संवेदनशील असलेल्या मुज्जफ्फराबाद, शामली, मिरत, गाझियाबाद, अलिगड, बुलंदर, इटाह आणि आग्रा जिल्ह्यात खास सुरक्षा उपाययोजना करण्यात आली आहे. दोन लाखांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या ४०० तुकड्या, स्थानिक पोलिसांच्या १०० तुकड्या व गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्ताची जबाबदारी पाहतील. चॉपर व ड्रोन कॅमेर्‍यांद्वारेही अवकाशातून कायदा सुव्यवस्थेवर सक्त नजर ठेवली जाणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी टी. व्यंकटेश यांनी सांगितले.
आज होणार्‍या पहिल्या टप्प्यातील ७३ जागांसाठी एकूण ८३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांपैकी २० टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असले असून ३६ टक्के करोडपती आहेत. ही निवडणूक सपा-कॉंग्रेस युती, भाजप व बसप या पक्षांसाठी सत्त्वपरीक्षा आहे. पहिल्या टप्प्यात भाजप व बसप उमेदवारांमध्ये सरळ लढती असून काही ठिकाणी सपा-कॉंग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे.
या होणार्‍या निवडणुकीत नोयडातून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह, यूपीचे पूर्व मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे पुत्र संदीप सिंह, कॉंग्रेसचे तीन वेळा मथुरा मतदारसंघातून विजयी झालेले प्रदीप माथूर, लालू प्रसाद यादव यांचे जावई राहुल यादव (सिकंदराबाद), यूपीचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी (मिरत) आदी व्हीव्हीआयपी रिंगणात आहेत.