उत्तर गोव्यातील ८० जुन्या पुलांचा आढावा ः सुदिन

0
215

सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील पोर्तुगीजकालीन जुन्या पुलांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले असून उत्तर गोव्यातील सुमारे ८० जुन्या पुलांचा आढावा घेण्यात आला आहे. जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

गतवर्षी सावर्डे येथे एक जुना पूल कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील पुलांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. बांधकाम खात्याच्या खास विभागाकडून जुन्या पुलांची तपासणी करून आढावा घेतला जात आहे. उत्तर गोव्यातील तीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालेले लहान पूल, साकवांची तपासणी केली जात आहे. दक्षिण गोव्यातील पुलांच्या तपासणीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. जुन्या कमकुवत पुलांची दुरुस्ती केली जाईल किंवा नवीन उभारण्याबाबत सरकारी पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

सासष्टी तालुक्यातील वेस्टर्न बायपासच्या कामात काही राजकीय नेत्यांकडून अडथळा आणला जात आहे. वेस्टर्न बायपासच्या कामाला नाहक विरोध केला जात आहे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी राजकीय नेते, नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. वेस्टर्न बायपासमुळे निर्माण होणार्‍या समस्येवर योग्य तोडगा काढण्याचे काम केले जात आहे. केवळ विरोधामुळे गेली दोन वर्षे बगल रस्त्याचे काम प्रलंबित आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.