उतावीळ शंकासूर

0
215

नववर्षाच्या पूर्वरात्री तटरक्षक दलाने अरबी समुद्रात केलेल्या कारवाईवर एका राष्ट्रीय वृत्तपत्राने लगेच प्रश्नचिन्हे उपस्थित केली. स्फोटांत उद्ध्वस्त झालेले ते जहाज दहशतवाद्यांचे नव्हते, तर छोटे तस्कर काही तरी माल घेऊन चालले होते असे भासवण्याच्या आणि तटरक्षक दलाच्या कारवाईविषयीच शंका व्यक्त करण्याच्या या प्रयत्नाला कोणत्याही पुराव्यांची जोड संबंधितास देता आलेली नाही. पण स्फोटाचे चे छायाचित्र संरक्षण मंत्रालयाने प्रसृत केले, त्यामध्ये आग भडकलेली असताना जहाजाचा सांगाडा सुस्थितीत दिसतो, स्फोटकांच्या स्फोटावेळी पांढर्‍या ज्योती दिसतात तशा दिसत नव्हत्या, हवामान खात्याने मच्छिमारांना खराब हवामानाचा इशारा दिलेला नव्हता यावरून तर्क लढवत या कारवाईलाच खोटे पाडण्याचा उतावीळ प्रयत्न झाला. या कारवाईसंदर्भात काही प्रश्न निश्‍चितपणे उपस्थित होऊ शकतात, परंतु त्यासाठी आधी उपलब्ध असलेल्या पुराव्यांचा विचार व्हायला हवा होता. एक म्हणजे हे जे संशयास्पद जहाज कराचीच्या केटी बंदरावरून निघाले, त्याच्या पंधरवडाभर आधीपासून गुप्तचर यंत्रणेला अशा प्रकारचे एक जहाज भारताच्या दिशेने निघणार असल्याचा सुगावा लागला होता. प्रत्यक्ष जहाजावरील खलाशांचे किनार्‍यावरील व्यक्तीशी सॅटेलाइट फोनवरून चाललेले संभाषण एनटीआरओच्या हाती लागले आणि त्यांनी तटरक्षक दलाला सतर्क केले. एकूण घटनाक्रम पाहिला, तर कराचीहून निघणार्‍या या जहाजाची पक्की खबर गुप्तचर यंत्रणेला लागली होती. तटरक्षक दलाने आपले डॉर्नियर विमान या जहाजाच्या शोधात पाठवले, त्याला दुपारी एकच्या सुमारास हे जहाज कुठे आहे याचा तपास लागला. ते भारतीय सागरी हद्दीत येईपर्यंत त्यावर पाळत ठेवून वाट पाहिली गेली आणि आयसीजी राजरतन ही तटरक्षक दलाची गस्तीनौका त्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. रात्री मग त्यापुढील कारवाई झाली. हे साध्या तस्करांचे जहाज असते, तर तटरक्षक दलाच्या जहाजाने थांबण्याचा इशारा करताच ते मुकाट शरण आले असते. जहाज थांबवले गेले नाही आणि पेटवून दिले गेले याचा अर्थ त्यावर काय आहे हे कोणत्याही परिस्थितीत भारताला कळता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांना असावेत. तस्कर असते तर त्यांनी असे आत्मघाती कृत्य केले नसते. शरणागती पत्करून मोकळे झाले असते. परंतु ते शरण आले नाहीत. प्रत्यक्षात हे सगळे नाट्य कसे घडले त्याचे केवळ छायाचित्रच नव्हे, तर संपूर्ण व्हिडिओ फुटेज राजरतन नौकेवरील कॅमेर्‍याने टिपलेले आहे. त्यामुळे या चित्रीकरणातून जहाजावर आग कशी लागली, तटरक्षक दलाने निष्कारण अतिरिक्त बळाचा वापर केला का, याबाबतचे शंकानिरसन होऊ शकेल. जहाज मच्छीमारीचे नव्हते, कारण त्यावर मच्छीमारीची जाळी नव्हती हेही त्यात दिसेल. आग तटरक्षक दलाने लावली नाही, तर खलाशांनीच ते पेटवून दिले हेही त्यातून स्पष्ट होऊ शकेल. जहाजावरील खलाशांचे सॅटेलाईट फोनवरचे संभाषण ध्वनिमुद्रित झालेले आहे. एक मध्यस्थ हे खलाशी आणि पाकिस्तानी स्त्रोतांशी व थायलंडमधील एका व्यक्तीच्या सतत संपर्कात होता असे या ध्वनिमुद्रणातून स्पष्ट झाले आहे. ही माहिती खरी असेल तर या संभाषणाच्या विश्लेषणातून सगळ्याचा पर्दाफाश होऊ शकतो. त्यामुळे या कारवाईसंदर्भातील सगळे पैलू समोर येण्यासाठी थोडी प्रतीक्षा आवश्यक ठरते. विविध यंत्रणांच्या हाती असलेले दुवे एकत्र जुळवल्यावरच या कहाणीचे सगळे पदर उलगडतील. पण हाती काहीही पुरावे नसताना ही कारवाईच खोटी ठरवण्याचा जो प्रयत्न झाला, तो संबंधितांच्या हेतूंविषयी शंका उत्पन्न करतो. निदान कॉंग्रेसने तरी त्याची री ओढत स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. या कारवाईसंदर्भातील सर्व तथ्ये समोर येईस्तोवर थोडी वाट पाहणे आवश्यक आहे. या कारवाईबाबत कोणाच्या काही शंका असतील, तर उपलब्ध पुराव्यांशी त्या ताडून पाहिल्यावरच स्वतःचा तर्क किती खरा आणि किती खोटा हे तपासता येईल. परंतु कोणतेही पुरावे नसताना कुठल्यातरी असंतुष्ट आत्म्यांचा हवाला देत या सार्‍या कारवाईला खोटे पाडणे हे आपल्या देशालाच दुबळे करणारे आहे. पाकिस्तानला अर्थातच या शंकांचा फायदा मिळाला आहे. या कारवाईचा खरेपणा सिद्ध करणारे दृक – श्राव्य पुरावे उपलब्ध आहेत. प्रश्न आहे तो ते जहाज कोणाचे होते, त्यावर काय होते हा. त्यावर काहीतरी गैर होते हे निश्‍चित, मग ती दारू असो वा स्फोटके.