उंबराचा रस ः पित्तशामक, श्रमहर

0
1534

– डॉ. पांडुरंग गावकर

 

सूज कमी करणारा, वेदनाशामक, पचायला जरा जड. तात्पर्य पोटातील अग्नी विझविणारा तसेच असह्य वेदना कमी करणारा म्हणून हा प्रसिद्ध आहे. आगीत होरपळल्यावर जळलेल्या त्वचेवर याच्या सालीचा लेप लावल्यास वेदना हमखास कमी होतात. खूप ताप आलेल्या रुग्णाच्या त्वचेवरही याचा लेप केल्यास ताप शीघ्र उतरण्यास मदत होते.

 

आपल्या भारतात अनेक प्रदेशात उत्पन्न होणारे उंबर किंवा औदुंबराचे फळ ज्याला आपण सर्वजण चांगल्या प्रकारे ओळखतो. आपल्याकडील धार्मिक कार्यांत, यज्ञात याला पवित्र समजले जाते. कर्नाटक-महाराष्ट्रातील भगवान दत्तात्रेयांचे नाव उंबराच्या वृक्षाशी म्हणजेच औदुंबराशी जोडले गेले आहे. भगवानांचा प्रत्यक्ष वास या वृक्षामध्ये असतो, अशी श्रद्धा असल्यामुळे या वृक्षाला तोडणे अधार्मिक कृत्य समजले जाते. यज्ञ वगळता इतर कारणांसाठी याची लाकडे तोडली जात नाहीत. हा वृक्ष अनेक वर्षे जगतो. याची उंची ३० ते ४० फूट इतकी असते. याच्या सालीचा रंग लाल व काही धुसर पाने भाल्यासमान टोकदार आणि फळे १-२ इंच व्यासाचे, गोल व फांद्यांना मोठमोठे गुच्छ येतात. कच्ची उंबरे हिरव्या रंगाची तर पिकल्यावर लाल, गुलाबी रंगाची बनतात. मार्च ते जून दरम्यान फळं येतात. झाडाखाली कितीतरी उंबरं गळून पडलेली असतात. उंबराच्या जवळ जर विहीर खोदली तर भरपूर पाणी लागते. याची फळे भरपूर मिळतात परंतु याची फुले मात्र अजूनपर्यंत दिसलेली नाहीत.
उपचारासाठी उंबराची साल, पाने, मुळ्या तसेच दुधासारखा निघणारा पांढर्‍या रंगाचा द्रव यांचा उपयोग केला जातो. हे चवीला तुरट आणि रुक्षपणा असलेले असते. शरीरातील कफ व पित्त दोषांचे हे संतुलन ठेवते. सूज कमी करणारा, वेदनाशामक, पचायला जरा जड. तात्पर्य पोटातील अग्नी विझविणारा तसेच असह्य वेदना कमी करणारा म्हणून हा प्रसिद्ध आहे. आगीत होरपळल्यावर जळलेल्या त्वचेवर याच्या सालीचा लेप लावल्यास वेदना हमखास कमी होतात. खूप ताप आलेल्या रुग्णाच्या त्वचेवरही याचा लेप केल्यास ताप शीघ्र उतरण्यास मदत होते. अत्यंत महत्त्वाचा उपयोग म्हणजे याच्या सालीचा काढा करून अधिक प्रमाणात उपयोगात आणल्यास महिलांना मासिक पाळीदरम्यान होणारा अति-रक्तस्राव कमी होण्यास खूप मदत होते. मूळव्याधीतून रक्तस्राव होत असल्यास पानांचा रस प्यायल्याने जरूर फायदा होतो. अस्थिभंग म्हणजेच हाड तुटल्यावर याचा रस प्यायल्याने हाडे लवकर जुळण्यास मदत मिळते. याच्या रसाने त्वचा तेजस्वी व गोरी होण्यास मदत मिळते. उंबराचे कच्चे फळ तुरट व वेदनाशामक असते. पिकलेले गोड फळ थंड, चवदार, पित्तशामक, श्रमहर, वेदनाहारक, तृष्णानाशक, बद्धकोष्ठ दूर करणारे तसेच पौष्टीक असते.
उंबराचा पांढरा द्रवही शरीरातून बाहेर पडणार्‍या अनेक स्रावांना रोखतो. जसे रक्त, मल-मूत्र आदी. याच्या फळांचे सेवन केल्याने पुरुषाचे वीर्य व शक्ती वाढते. तसेच मन सदैव प्रसन्न राहते. फोडं-मुरुमावर याचा रस लावल्यास ते लवकर पिकतात. याच्या मुळांचा रस शरीराची आग शांत करतो. रक्तस्राव रोखणारा तसेच नियमित सेवन केल्यास क्षयरोग व मधुमेह सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
उंबराचे घरगुती उपयोग ः
* नाकातून रक्तस्राव होऊ लागला तर उंबराच्या पिकलेल्या फळाचा रस त्यात गूळ किंवा मध घालून प्यावा. हाच उपाय मासिक पाळीत अधिक रक्तस्राव असल्यासही हेच प्रमाण घ्यावे.
* ग्रीष्म ऋतूतील गरमी किंवा आग उत्पन्न करणारे विकार तसेच देवीच्या आजारासारख्या विकारात फोड आल्यावर पिकलेल्या फळाचा रस त्यात साखर टाकून तयार केलेलं सरबत प्यावे.
* मधुमेह झाल्यास उंबराच्या कोवळ्या पानांचा रस त्यात २० मिली. मध घालून प्रत्येक दिवशी २-३ वेळा प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागत नाही. तसेच लघवीतील साखरेचे प्रमाण सामान्य होण्यास मदत होते.
* याच्या सालीचा काढा करून त्याने स्त्रियांनी योनाीमार्ग धुतल्यास योनीमार्गाचे सर्व विकार दूर होतात. या विधीला आयुर्वेदात उत्तर बस्ती म्हणतात. हे तज्ज्ञ वैद्याकडून घेणे योग्य.
* जिभेला फोडं येणे, चट्टे पडणे, हिरड्यांतून रक्त वाहणे, दातदुखी, दात हलणे, आदी विकारांवर याची साल किंवा पानांचा काढा तयार करून तो तोंडात ठेवावा. १५ दिवसांपर्यंत हा प्रयोग केल्यास निश्‍चितच फायदा होतो. हाता-पायांची त्वचा फाटल्यास किंवा पायांच्या तळव्यांना कात्रे पडल्यास होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी उंबराच्या पांढर्‍या द्रव्याचा लेप लावल्याने जखम भरून सामान्य होण्यास मदत होते.
* डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळ्यांची जळजळ आदी लक्षणं उत्पन्न झाल्यास उंबराच्या पानांचा काढा करून स्वच्छ कपड्याने गाळून घ्यावा व थंड झाल्यावर डोळ्यांत त्याचे २-२ थेंब दिवसातून ४ वेळा टाकावे. नेत्रज्योती तेज होते.
* लहान मुलांना पातळ शौचास होत असेल तर उंबराच्या रसात साखर घालून ते सेवन करावे.
* शरीरातील रक्त व पितत दूषित होऊन अंगाची जळजळ झाल्यास उंबराच्या सालीचा काढा पोटात घ्यावा. एकसारखी तहान लागत असल्यासही हाच काढा घेतल्यास फायदा होतो. तसेच नाक, तोंड व गुदद्वारातून रक्त पडले तर हाच काढा उपयुक्त आहे.
* त्वचाविकारात त्वचेचा रंग बिघडला तर उंबराच्या फांदीला येणारे कोंब वाटून तो लेप त्वचेला लावावा.
* स्त्रियांच्या श्‍वेतप्रदर, रक्तप्रदर या व्याधींमध्येही हा काढा उपयुक्त आहे. उंबराची पिकलेली फळं खाल्ली तर गर्भाशयाच्या मांसपेशींना बळ मिळते आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.