उंच उंच कडे .. उत्तुंग सुळके …

0
234

रोमिंग फ्री…

– भ्रमिष्ट

इथं स्त्री आणि पुरुष या व्यक्ती नाहीत तर वृत्तीप्रवृत्तींचं प्रतीक आहेत. दोन्हीही आवश्यक असतं. आपलं विश्‍व साकारताना नि शाकारताना बाहेरच्या विशाल विश्‍वाशी नातं घट्ट असायला हवं. घरट्याचं घरकुल नि घरकुलाचं घर करत राहिलं पाहिजे. नाहीतर सध्या येतो तो अनुभव येणं अनिवार्य असतं.
‘अवर् हाऊसेस आर् गेटिंग वेलएक्विप्ड अँड वेलफर्निश्ड; बट् अवर् होम्स आर् गेटिंग डिस्ट्रॉइड.’ वेळीच सावध झालं पाहिजे.

का कुणास ठाऊक पण काळा कातळ, उंच उंच कडे, भलेमोठे पाषाणखंड यांचं एक आदिम आकर्षण मनात लहानपणापासून आहे. सृष्टीच्या आरंभापासूनचे स्तब्ध साक्षीदार म्हणून असले खडक मनात घट्ट घर करून राहिलेयत. कधी सिंदबाद-गलीव्हर यांच्या कथातून तर कधी कवितांमधून एकदा भेटलेले हे दगड स्मृतीत रुतून राहिलेयत जसे ते शतकानुशतके पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाय रोवून उभे आहेत.

हे आठवायचं कारण त्या दिवशी ज्या भागात भ्रमंती सुरू होती तो खडकाळ प्रदेश होता. काही सुळके तर आकाशभेदी वाटावेत असे उभे होते. प्रचंड वारा त्या उंच उंच कड्यांमधून वाहताना भीषण आवाज करत होता. त्या आवाजातसुद्धा आत्तापर्यंत न अनुभवलेला थरार होता. वार्‍याचं ते रौद्र रूप एकाच वेळी भय व विस्मय निर्माण करत होतं. चढून वर जावं असा विचार मनात आला. पण फक्त विचारच. त्या सुळक्यांच्या माथ्यावर एखादा गिर्यारोहकच पोचू शकला असता.
थोडंसं विसावावं म्हणून खालच्या गवतात बूड टेकलं. डोक्यावरची टोपी वर बघताना खाली पडावी अशी उंची होती त्या कड्यांची. क्षणभर स्तिमित होऊन डोळे मिटले. अशीच अवस्था झाली होती श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीची भव्य प्रतिमा पाहताना. काही वेळ त्या उंच कड्यांमुळे कापलं गेलेलं आकाश नि व्यापलं गेलेलं अवकाश अनुभवलं. नंतर नजर स्थिर करून वर – अगदी वर – पाहिलं तर काय एक गरुड दिसला. तोच तो कवितेतला – ‘क्लास्पिंग द क्रॅग विथ् हिज् क्रुकेड हँडस्’ आपल्या वेड्यावाकड्या पण मर्दानी पंजांनी त्या कड्याला घट्ट धरून बसलेला तो गरूड. त्याला कड्याचा आधार नको होता कारण पंखांनी पैसावत आसमान पार करणं हा त्याचा स्वभाव होता. पण त्यावेळी त्याचा दिमाख नि रूबाबच असा होता की त्यानं त्या कड्याला आधार दिलाय.
आपल्या तीक्ष्णतम दृष्टीनं सारा आसमंत न्याहाळत होता तो पक्षिराज. त्या पहाण्यातही एक आक्रमक वृत्ती होती. माथ्यावरचा सूर्य सोडला तर त्याला अस्पर्श्य असं काहीही नव्हतं. एखादी पृथ्वीवरची बारकी वळवळसुद्धा त्याच्या नजरेतून सुटत नव्हती. पण त्याला वळवळी-चळवळीत बिलकुल रस नव्हता. कारण तो अचानक पंखावर स्वार झाला स्वतःच्याच नि झेपावला खाली, क्षणात वरती आला तेव्हा जिवाच्या भयानं आर्त आवाज काढणारा एक पक्षी त्याच्या पंजात घट्ट पकडलेला होता. त्या पक्ष्यासाठी प्रार्थना करण्याखेरीज आपल्याकडे काय होतं?
पण प्रार्थना करायची की सृष्टिचक्राचं कौतुक करायचं? सृष्टी ही माता आहे ना सार्‍या जीवजंतूंची. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा मंत्र आहे ना इथला? मग ‘भूता परस्परें पडो मैत्र जीवांचे’ हे पसायदान वस्तुस्थिती कधी होणार आहे का? प्रत्यक्षात जमीनीवर मोठा जीव लहान जीवाला मारत राहणारच आहे ना?
मनात विचारचक्र गरगरत असताना आतलं शहाणं मन म्हणालं, ‘वेड्या, पसायदान, प्रार्थना, पश्चात्ताप, पाप-पुण्य या गोष्टी बुद्धी असलेल्या मानवासाठी असतात. कारण बुद्धीचा विकास विवेकशक्तीत होण्याची गरज माणसालाच असते. माणुसकीनं वागून आपल्या जीवनाला अर्थ माणसालाच द्यायचा नसतो का?’
खरंच आहे, ‘जनावरं (ऍनिमल्स)’ नावाच्या कवितेत आरंभीच प्रश्‍न विचारलाय- ‘तुम्ही कधी कोणत्याही जनावराला गुडघे टेकून प्रार्थना करताना पाहिलंय?’ शक्यच नाही कारण ते कधी पाप करतच नाहीत. त्यांना कधी पश्चात्ताप करावाच लागत नाही.
पाखरांचं कुतुहल वाटतं कधी कधी. काही घरंदाज असतात. आपापल्या शैलीत घरटी बांधतात. काही मनमुक्त भटकी पाखरं असतात. हजारो मैलांचं अंतर कापून ऋतू बदलला की आपला आशियाना बदलतात. अर्थात त्यांचा बंदिस्त आशियाना नसतोच. पण दूर अंतरावरून येताना त्यांना रात्रीच्या वेळी दिशा कशा कळतात? तार्‍यांची साक्ष काढत येतात असं म्हणतात. पण एवढ्याशा पंखात एवढा विस्तीर्ण महासागर विनाविश्रांती पार करण्याची शक्ती कुठून मिळते त्यांना? शारीरिक क्षमतेपेक्षा निराळी अशी शक्ती त्यांच्याकडे असते का? ऋतूंच्या चक्रनेमि क्रमानुसार म्हणजे एकामागून एक अशा बदलणार्‍या ऋतूंनुसार त्यांचं परिभ्रमण सुरू राहतं. यात केवळ जगण्याची प्रवृत्ती (सर्व्हायव्हल् इन्स्टिंक्ट) आहे? काहीही असो पण ही पाखरं निसर्गातलं एक गोड गुलाबी गुपित आहेत निश्चित.
आता गवताच्या गालिच्यावर निजून आकाशात उद्दामपणे घुसलेले ते सुळके पाहत होतो. त्या विलक्षण अशा भव्य पार्श्‍वभूमीवर स्वतःला अगदी तृणतुच्छ, क्षुल्लक वाटत होतं. पुन्हा स्मृतीच्या आकाशात काही पक्षी भिरभिरत गेले. आकाशावर आजवर उडालेल्या असंख्य पक्ष्यांचा एकही ओरखडा उठलेला वा उरलेला नाही. ना चोचीचा, ना पंजांचा, ना पंख्यांचा ओरखडा! स्थितप्रज्ञतेचं, दिव्यतेचं, साक्षात् देवत्वाचं उदाहरण हे आकाशच नाही का?
खूप पूर्वी एक सुभाषित मनात ठसलं होतं. ‘घराच्या चार भिंतीत स्वर्ग निर्माण करणं हे स्त्रीचं स्वप्न असावं. तर घराच्या भिंती पार क्षितिजापलीकडे विस्तारत नेणं हे पुरुषाचं ध्येय असावं!’ इथं स्त्री आणि पुरुष या व्यक्ती नाहीत तर वृत्तीप्रवृत्तींचं प्रतीक आहेत. दोन्हीही आवश्यक असतं. आपलं विश्‍व साकारताना नि शाकारताना बाहेरच्या विशाल विश्‍वाशी नातं घट्ट असायला हवं. घरट्याचं घरकुल नि घरकुलाचं घर करत राहिलं पाहिजे. नाहीतर सध्या येतो तो अनुभव येणं अनिवार्य असतं.
‘अवर् हाऊसेस आर् गेटिंग वेलएक्विप्ड अँड वेलफर्निश्ड; बट् अवर् होम्स आर् गेटिंग डिस्ट्रॉइड.’ वेळीच सावध झालं पाहिजे.
आता सगळीकडे संधिप्रकाशाचं साम्राज्य पसरू लागलं होतं. ते उंच उंच सुळते त्यांच्या रेखाकृतीमुळे अधिक रोमँटिक वाटत होते. पण घरी तर परतायचंच होतं. काही वर्षांपूर्वी खूप लोकप्रिय झालेली कविता मनात रुंजी घालत राहिली.
‘घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती |
तिथं असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती ॥
या घरातल्या पाखरांनी आकाशात कितीही उड्डाणं केली.. कितीही घिरट्या मारल्या तरी त्या सर्वांना एक अट मात्र आहे … घराच्या उंबरठ्यावर प्रीती ठेवण्याची! किती गरजेचं आहे नाही? …या विचारातच परत फिरलो घराच्या उंबरठ्याकडे…