ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय पवारांनी केला रद्द

0
106

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणात ईडीने चौकशीसाठी ७० जणांना बोलावणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आपण स्वतःहून ईडी कार्यालयात काल दि. २७ रोजी जाणार असल्याची घोषणा केलेल्या शरद पवार यांनी तो निर्णय रद्द केला. हजारोंच्या संख्येने मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते जमणार असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पवार यांना ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केल्याने पवार यांनी आपला निर्णय रद्द केला. स्वतः पवार यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

दरम्यान, भाजपने या संदर्भात सांगितले की, या घोटाळाप्रकरणी चौकशी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ताकाळात सुरू झाली होती.
पवारांच्या वरील निर्णयानंतर ईडीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने रस्त्यावर येण्याच्या शक्यतेमुळे गुरुवारी ईडीचे कार्यालय असलेल्या भागात १४४ कलम पोलिसांनी लागू केले होते.
पवार यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले की, आवश्यकता भासेल त्यावेळी आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. मात्र ईडी किंवा अन्य कोणत्या यंत्रणेद्वारा कोणी आपल्याला घाबरवू पाहत असल्यास त्यात संबंधितांना यश येणार नाही.

आपल्याला कॉंग्रेस नेते राहुल गांधी, डॉ. मनमोहन सिंग तसेच शिवसेना व अन्य राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो असेही पवार म्हणाले.
पुढील महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने साधलेल्या या ‘टायमिंग’बद्दल पवार यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यामुळे विरोधी पक्षांच्या प्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याचा कट रचला जात असल्याचे आमचे मत झाले आहे असे पवार म्हणाले.