इराणच्या इदानी पोवाला अजिंक्यपद

0
201

पणजी (क्री. प्र.)
इराणचा ग्रँडमास्टर इदानी पोवाने ८.५ गुणांसह पहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. गँ्रडमास्टर बाबुजियान लीवोनला उपविजेतेपद तर दीपन चक्रवर्तीला तृतीय स्थान प्राप्त झाले. स्पर्धेत आकर्षक कामगिरी केलेल्या नितिश बेलुरकरला २०व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत काल शेवटच्या दिवशी इदानीने कार्तिक वेंकटरमनला मात करीत जेतेपद निश्‍चित केले.
भारताच्या राहुल व्हीएस याने ग्रँडमास्टर नेवेरोव वालेरियवर मात करीत आपला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म प्राप्त केला. गोव्याच्या नितिश बेलुरकरने ग्रँडमास्टर बेर्नाडस्की विटालीला पराभवाचा धक्का देत ७ गुणांसह २०वे स्थान मिळविले. फिडे मास्टर अमये अवदी (३३वे स्थान) आणि रित्विज परब (३८वे स्थान) यांनी अव्वल ४०मध्ये स्थान मिळविले.
बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश काब्राल, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारत सिंह चौहान, खजिनदार किशोर बांदेकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.