इम्रानकडे कमान

0
256

भारत इकडे कारगिल विजय दिवस साजरा करीत असताना तिकडे पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यावेळी अपेक्षेनुरुप एकेकाळचा क्रिकेटपटू इम्रान खानची बॅट या निवडणुकीत तळपली आहे आणि त्याचा पाकिस्तान तेहरिक ई इन्साफ पक्ष निर्विवाद बहुमत जरी मिळवू शकला नसला तरी सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. छोट्या पक्षांची आणि अपक्षांची मदत घेऊन तो सत्तारूढ होण्याची चिन्हे आहेत. इम्रान खानसारखा कडवा नेता पाकिस्तानच्या लष्करशहांच्या प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदतीने सत्तेच्या केंद्रस्थानी येणे ही भारतासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. विशेषतः इम्रान खानची अलीकडच्या काळातील भारतविरोधी वक्तव्ये, त्याने धार्मिक मूलतत्त्ववाद्यांची चालवलेली उघडउघड पाठराखण, त्याची कडवी धार्मिक मते हे सगळे पाहिले तर भविष्यामध्ये भारतासाठी नवे प्रश्न त्याची सत्ता निर्माण करू शकते. इम्रान आणि त्याच्या पक्षाचा पाकिस्तानच्या राजकीय क्षितिजावर यावेळी झालेला उदय हा काही सहजासहजी झालेला नाही. त्याला पाकिस्तानच्या राजकारणात सदैव लुडबूड करीत आलेल्या लष्करी यंत्रणेचा निश्‍चितपणे आतून पाठिंबा आहे. गेल्या निवडणूक प्रचारकाळात ते दिसूनही आले. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्या नेतृत्वाविरुद्ध लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप, न्यायालयांनी त्यांना दिलेली शिक्षा हे एकीकडे पाश आवळत असताना, दुसरीकडे आयएसआयने त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्याचे केलेले प्रयत्न, आणलेला दबाव, द्यायला लावलेले राजीनामे, करायला लावलेली बंडखोरी, माध्यमांची चाललेली गळचेपी, जिओ, जंग, डॉन आदी समूहांविरुद्ध चाललेली दडपशाही हेही चालले होते. आता प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप पीएमएल (नवाज) पक्षाने केलेला आहे. मतमोजणीवेळी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना सैनिकांनी हुसकावून लावले आणि हेराफेरी केल्याचा त्यांचा आरोप आहे. निकालांना लागलेल्या विलंबांमुळेही संशय उत्पन्न झाला आहे. लष्कर या निवडणुकीत सक्रिय होतेच. नवाज शरीफ यांच्या राजवटीने काही अंशी भारताशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. आपली सत्ता उलथवणार्‍या मुशर्रफ यांना त्यांनी धडा शिकवला, भारताच्या मैत्रीच्या हाकेला प्रतिसाद दिला, मोदींच्या शपथविधीलाही ते स्वतः उपस्थित राहिले. हे सगळे वातावरण निवळणे लष्कराला मानवणे शक्य नव्हते. मुशर्रफांविरुद्धची कारवाई, भारताशी चालवलेली हातमिळवणी याने अस्वस्थ झालेल्या लष्कराने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देशात सुरू झालेल्या जनतेच्या उठावाला छुपी साथ दिली होती. गेली काही वर्षे जे राजधानीवर मोर्चे निघत होते, त्यातूनच सत्ता उलथवली जाते की काय असे चित्र निर्माण झाले होते. भ्रष्टाचारविरोधाच्या या लाटेवर, धार्मिक मूलतत्त्ववादाच्या लाटेवर इम्रान खान स्वार झाला आणि इथवर पोहोचला. वास्तविक त्याचा पक्ष स्थापन झाला होता १९९६ साली. आयएसआयचा माजी प्रमुख जनरल हमीद गुलने इम्रानला राजकारणात यायला प्रेरित केले. २००२ च्या निवडणुकीत इम्रानचा पक्ष त्याची एक जागा जिंकू शकला. २००८ च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष उतरला नाही, पण २०१३ च्या निवडणुकीत खैबर पख्तुनवा प्रदेशामध्ये त्याच्या तेहरिक ई इन्साफने यश मिळवले. एकवरून त्या पक्षाचे देशात २८ सदस्य आले. तेव्हापासून इम्रानच्या घोड्यावर लष्कराने आपला पैसा लावला म्हणायला हरकत नाही. हक्कानींच्या मदरशाला त्याच्या पक्षाने केलेली मदत, अफगाणिस्तानमधील तालिबानचे त्याने केलेले समर्थन, द्रोन हल्ल्यांचा चालवलेला निषेध, धार्मिक मूलतत्त्ववाद्यांची चालवलेली पाठराखण, ईश्वरनिंदा कायद्याचे चालवलेले समर्थन, सातत्याने ओकलेला भारतविरोधी विखार, सर्जिकल स्ट्राईकचे प्रत्युत्तर देण्याची केलेली भाषा, ही सगळी लक्षणे लक्षात घेतली तर या बाळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. एक गोष्ट मात्र या निवडणुकीतही दिसून आली आहे ती म्हणजे अजूनही अन्य दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले बालेकिल्ले तसे राखले आहेत. नवाज व शाहबाज शरीफ यांच्या पंजाबने त्यांना अगदीच नाकारलेले नाही. भुत्तो – झरदारींना त्यांच्या सिंधने तारले आहे. खैबर पख्तुनवात अवामी नॅशनल पार्टीचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही. हाफीज सईदने या निवडणुकीत मिली मुस्लीम लीगतर्फे उमेदवार उतरवण्याचे प्रयत्न चालवले होते. त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे त्याने अल्ला हू अकबर तेहरिक या जुन्या नोंदणीकृत पक्षातर्फे ५० उमेदवार उतरवले, परंतु ते पराभूत झाले आहेत. तेहरिक ई लबैकलाही मतदारांनी नाकारले आहे. एकूण पाकिस्तानचा निकाल हा असा आहे. इम्रान खानने इस्लामी कल्याणकारी राज्य निर्मिण्याचा संकल्प जाहीर केला होता. अर्थव्यवस्था पूर्ण ढेपाळलेल्या पाकिस्तानचे तो कुठवर कल्याण करू शकेल हे तर दिसेलच. त्याच्या स्वप्नातला ‘नया पाकिस्तान’ मोदींच्या ‘न्यू इंडिया’च्या तुलनेत कसा असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.