‘इबोला’ रोखण्यासाठी विमानतळावर व्यवस्था

0
100

इबोला या घातक रोगाची लागण झालेले रुग्ण गोव्यात येत आहेत की काय यावर दाबोळी विमानतळावर असलेल्या आरोग्य अधिकार्‍यांनी बारीक लक्ष ठेवलेले असून ज्या आफ्रिकी देशात हा जीवघेणा रोग पसरलेला आहे त्या नायजेरिया, लिबेरिया, गिनीया व सियारा लिऑन या देशांतून गोव्यात दाखल होणार्‍या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य खात्याचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल माहिती देताना सांगितले.
वरील देशातून येणार्‍या नागरिकांमध्ये इबोला रोगाची लक्षणे दिसत आहेत काय यावर आरोग्य अधिकारी बारीक लक्ष ठेवून असल्याचे व अजून तरी तशी लक्षणे असलेले नागरिक सापडले नसल्याचे डॉ. बेतोडकर यांनी स्पष्ट केले. चालू महिन्याच्या १४ तारखेपासून आरोग्य खात्याने वरील देशांतून येणार्‍या नागरिकांवर खास लक्ष ठेवले आहे. इबोलाची लक्षणे असलेला एखादा विदेशी रुग्ण जर विमानतळावर आढळला तर त्याला चिखली इस्पितळातील वेगळ्या वॉर्डात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. बेतोडकर यांनी स्पष्ट केले. एक-दोन वर्षांपूर्वी स्वाईन फ्लू चा उद्रेक झाला होता तेव्हा त्या रुग्णांना चिखली इस्पितळातील वरील वॉर्डात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नायजेरिया, लिबेरिया, गिनीया व सियारा लिऑन या देशांतून येणार्‍या नागरिकांना येथे आल्यापासून पुढील २१ दिवसपर्यंत प्रचंड संख्येने लोक उपस्थित असलेल्या कार्यक्रमांना न जाण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचेही डॉ. बेतोडकर यंानी सांगितले. दरम्यान, इबोलाची लक्षणे असलेला एखादा रुग्ण सापडला तर त्याला इबोला झालेला आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी आवश्यक ते ‘सॅम्पल्स’ नवी दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वरील देशांतील नागरिकांनी अन्य देशांत पर्यटन अथवा अन्य कामानिमित्त जाऊ नये अशी कोणतीही सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केलेली नसल्याने वरील देशांतून येणार्‍या नागरिकांना कुणीही अडवू शकत नसल्याचेही डॉ. बेतोडकर यांनी सांगितले.