‘इफ्फी’ पाहण्यासाठी चीनी पथक येणार

0
94

यंदा इफ्फीत चीनमधील चित्रपटांवरील खास विभाग असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चिनी चित्रपटसृष्टीतील ३४ जणांचे एक खास पथक महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती ईएस्‌जीमधील सूत्रांनी दिली. चीनमध्ये बनणार्‍या कलात्मक चित्रपटांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी हा खास विभाग स्थापन करण्यात आला आहे. दरवर्षी इफ्फीत एका देशावरील कलात्मक चित्रपटांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी हा विभाग सुरू करण्यात आलेला आहे.दरवर्षीप्रमाणेच यंदाही इफ्फीत मास्टर क्लासेस, दिवंगत झालेल्या अभिनेत्यांच्या चित्रपटांचे खेळ, देश-विदेशातील चित्रपट कलाकारांसाठी रेड कार्पेट, सिनेमाविषयक संवाद-परिसंवाद, कलाकारांशी संवाद आदीचे आयोजन करण्यात येत असते. यंदा इफ्फीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीनी नोंदणी केलेली असून ती १० हजारांवर पोचल्याचे इफ्फीतील सूत्रांनी सांगितले. इफ्फीसाठीच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात असून ईएस्‌जी इमारतीतही आवश्यक ते बदल व दुरुस्ती करण्याचे काम चालू आहे. यंदा इफ्फीचे उद्घाटन महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होणार असल्याने व शतक महोत्सवी पुरस्कार दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांना जाहीर करण्यात आल्याने इफ्फीविषयीची उत्सुकता कधी नव्हे एवढी वाढली आहे. चित्रपट महोत्सव संचालनालय तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयामधील अधिकारी यानी यापूर्वीच गोव्यात येऊन इफ्फीच्या तयारीचा आढावा घेतला असून त्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचे ईएस्‌जीचे उपाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.