‘इफ्फी’ पन्नाशीत!

0
140

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत असून गोव्यातील त्याचे आयोजन शानदार व्हावे यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने कंबर कसली आहे. नुकतेच जावडेकर यांनी या महोत्सवात यंदा काय असेल त्याचे सूतोवाच पत्रकार परिषदेत केले. जावडेकर यांच्यासारख्या अनुभवी, कुशल नेत्याने जातीने या महोत्सवात लक्ष घातले असल्याने आणि राज्य सरकारची त्यांना सक्रिय साथ राहणार असल्याने यंदाचा इफ्फी अधिक शिस्तीत व नेटकेपणाने होईल अशी अपेक्षा आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने हा महोत्सव शानदार व संस्मरणीय ठरला पाहिजे. आयोजक या नात्याने गोवा सरकार त्याच्या पाठीशी आपले बळ उभे करीलच, परंतु एकूणच या महोत्सवाला ‘कान’ किंवा ‘बर्लिन’ महोत्सवासारखी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देण्यात आपण अजूनही सफल ठरलेलो नसल्याने त्या दिशेने पावले पडणे गरजेचे आहे. गोव्यामध्ये २००४ पासून ‘इफ्फी’चे आयोजन दरवर्षी होते आहे, परंतु महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकांपासून आयोजनातील भोंगळपणा दरवर्षी पाहायला मिळत असतो. गोवा मनोरंजन संस्था ही या आयोजनातील एक महत्त्वाचा घटक, परंतु आजवर तेथे राजकारण्यांची आणि त्यांच्या बगलबच्च्यांचीच वर्णी लावली जात असल्याने विशिष्ट कोंडाळ्याच्या हातीच तिची सूत्रे राहिली. यामध्ये बदल अपेक्षित आहे. ‘इफ्फी’ चे गोवा हेच कायमस्वरूपी ठिकाण असल्याची ग्वाही केंद्रीय प्रसारण मंत्र्यांनी दिलेली असल्याने हा महोत्सव इतरत्र हलविला जाण्याची धास्ती गोव्याने ठेवण्याची जरूरी नाही हे जरी खरे असले, तरी आयोजनाची गुणवत्ता वाढली नाही, तर हा महोत्सव अन्यत्र हलविण्याची मागणी पुन्हा जोर धरू शकते हेही विसरून चालणार नाही. हा महोत्सव खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचा व प्रतिष्ठेचा बनवायचा असेल तर या महोत्सवाच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे. गोव्यातील ‘इफ्फी’ची दशकपूर्ती झाली तेव्हा उद्घाटन सोहळ्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्याचा पायंडा स्वागतार्ह पाडला गेला होता. ग्लॅमरपेक्षा गुणवत्तेला या महोत्सवात महत्त्व दिले गेलेच पाहिजे. त्याशिवाय चित्रपट क्षेत्रातील अनवट चेहरे या महोत्सवास उपस्थिती लावू शकणार नाहीत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे या महोत्सवाचे ब्रीदवाक्य आहे. भारतीय चित्रपट रसिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटक्षेत्रामध्ये कोणते नवनवे प्रवाह प्रवाहित झालेले आहेत याचे दर्शन घडविताना त्या सार्‍यांमधील मानवतेची समान सूत्रे अधोरेखित करणे हा या महोत्सवामागील खरा उद्देश आहे. चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे, ज्याद्वारे जीवनातील सकारात्मकतेचा व उदात्त मानवी मूल्यांचा पुरस्कार अपेक्षित आहे. सवंग करमणूकप्रधान चित्रपटांना अशा महोत्सवांत स्थान नसते आणि नसावेच. चित्रपट महोत्सव हे अत्यंत गांभीर्याने चित्रपटांचा आस्वाद घेण्याचे स्थान आहे. त्यामुळे शुल्क कमी करून उगाच हौशा गवशांची गर्दी खेचण्याचा प्रयत्न सरकारने यावेळी करू नये. राज्यात सर्वत्र या महोत्सवाच्या अनुषंगाने पूरक कार्यक्रम – उपक्रमांचे आयोजन जरूर व्हावे व त्यामध्ये आम जनतेला सामावून घेतले जावे, परंतु मुख्य महोत्सवाला गावजत्रेचे रूप मिळता कामा नये. ‘इफ्फी’ ने गोव्याची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवली पाहिजे आणि गोव्याने ‘इफ्फी’ची प्रतिष्ठा जपली पाहिजे. आजवरच्या इफ्फींच्या आयोजनाला अनेक वादांचे ग्रहण वेळोवेळी लागले. कधी महापालिकेने इफ्फीविरोधात संघर्षाची भूमिका घेतली, तर कधी मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षांनीच सरकारशी असहकार पुकारला. कधी केंद्र सरकारने महोत्सवातील चित्रपट परस्पर वगळल्याचे वादळ उठले, तर कधी भोंगळ आयोजनाचे गालबोट महोत्सवाला लागले. या सुवर्णमहोत्सवी ‘इफ्फी’ ला असे कोणतेही ग्रहण लागू नये यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली गेली पाहिजे. हा महोत्सव गोव्यासाठी अजूनही दहा दिवसांच्या गणपतीसारखाच राहिला आहे. या महोत्सवाच्या जोडीने गोव्यामध्ये चित्रपट संस्कृती रुजविण्यासाठी जे व्यापक प्रयत्न व्हायला हवे होते ते झालेले नाहीत. ज्या गोव्याच्या निसर्गसौंदर्याच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांची रीघ लागते, तेथे एखादी सुसज्ज चित्रनगरीही नसावी, हे खेदजनक आहे. गोवा ही आजवर कलेची खाण तर राहिली आहेच, शिवाय चित्रपटांशी संबंधित तंत्रज्ञानाला आत्मसात करून या क्षेत्रात कारकिर्द घडविलेल्या गोमंतकीय तंत्रज्ञांची मोठी नामावलीही आहे. आज चित्रपटांशी आनुषंगिक तंत्रज्ञान विकसित होत चालले आहे. व्यवसाय म्हणूनही त्यामध्ये मोठी संधी आहे. त्यामुळे चित्रीकरण स्टुडिओंपासून साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओंपर्यंत, ऍनिमेशनपासून व्हिज्युअल इफेक्टस्‌पर्यंत, पटकथालेखापासून सबटायटलिंगपर्यंत, स्पॉटबॉयपासून अभिनयापर्यंत अनेक प्रकारे गोव्याच्या तरुणाईला सुसंधी मिळवून देणारे चित्रपटविषयक रोजगार येथे रुजावेत यादृष्टीने सरकारने प्रयत्न केला पाहिजे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगारही निर्माण होऊ शकेल.