इफ्फी काळात वाहतूक व्यवस्थेत बदल

0
100

वाहतूक पोलिसांनी ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी खास वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. इतर कार्यक्रम कांपाल येथील कला अकादमी, आयनॉक्सच्या परिसरात होणार आहेत. आल्तिनो पणजी येथील जॉगर्स पार्कमध्ये काही कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

ताळगाव येथे चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यात सहभागी होणार्‍या उत्तर व दक्षिण गोव्यातील (पणजी वगळून) नागरिकांनी वाहतुकीसाठी महामार्ग एनएच १७ चा वापर करावा. बांबोळी येथे जीएमसीकडे पोहोचल्यानंतर गोवा विद्यापीठाकडे येणार्‍या रस्त्यावरून कार्यक्रम स्थळी यावे असे सूचित करण्यात आले आहे. पणजी शहरातून कार्यक्रम स्थळी उपस्थित राहणार्‍यांनी ताळगाव किंवा दोनापावल या भागातून यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

आयनॉक्स रोड ९ दिवस बंद
आयनॉक्स लेन रोड मार्केटजवळ वाहतुकीसाठी ९ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ईएसजीकडून कार पासेसचे वितरण केले जाणार आहे. उद्घाटन आणि समारोप सोहळ्यासाठी पार्किंग जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. विभाग ए आणि ए -१- स्टेडियमच्या आतमध्ये पार्किंग (गेट ३), विभाग बी – स्टेडियमच्या जवळील जीएमसीच्या बाजूची जागा आणि विभाग सी – स्टेडियमच्या जवळील क्रिकेट मैदान असेल. कला अकादमीमध्ये सिनेमांच्या स्क्रिनिंगच्यावेळी विभाग ‘ए’मध्ये पासेस असलेल्या वाहनांना पार्किंग दिले जाणार आहे. इतर वाहने कांपाल येथील बांदोडकर मैदानावर वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. इतर दिवशी महोत्सवाच्या काळात कार पास असलेल्या वाहनांना कला अकादमीच्या पार्किंग जागेत आणि आयनॉक्सच्या सर्व्हिस लाइनमध्ये पार्क करण्यास मान्यता दिली जाईल. इतर वाहनांना बांदोडकर मैदानावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. महोत्सवाच्या काळात डी. बी. बी. मार्गावर वाहने पार्क करण्यास मान्यता दिली जाणार नाही. दुचाकी वाहन चालकांनी वाहतूक व्यवस्थेसंबंधी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपअधीक्षक डी. जी. पी. आंगले यांनी केले आहे.