इफ्फीसाठी गोवा परिपूर्ण स्थळ : आलिया

0
117
In Conversation with Actress Alia Bhatt and Sr. Editor, Times of India, Anshul Chaturvedi, during the 48th International Film Festival of India (IFFI-2017), in Panaji, Goa on November 27, 2017.
  • कालिका बापट

आपल्याला गोवा फार आवडतो. कामानिमित्त तर येतेच तसेच अधूनमधूनही गोव्यात येत असते. शाहरूख खान बरोबरच्या ‘डियर जिंदगी’च्या चित्रिकरणा दरम्यान आपण पंचेचाळीस दिवस गोव्यात होते. इथल्या समुद्र किनार्‍यांवर चित्रीकरण झाले, तेव्हा सुंदर अनुभव आले. निसर्गसंपन्न गोवा आपल्याला सदैव भुरळ घालतो. शांत, सुंदर, कला आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला गोवाच इफ्फीसाठी परिपूर्ण असल्याचे मत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.

माझ्यासाठी कथा महत्त्वाची…
कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहात काल आलिया भटचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार अंशुल चतुर्वेदी यांनी यावेळी तिची रंगतदार मुलाखत घेतली. तिने दिलखुलासपणे समर्पक उत्तरे देऊन श्रोत्यांकडून वाहव्वा मिळवली. बीग बॅनरचा किंवा छोट्या बॅनरचा चित्रपट अशी तुलना आपण भूमिका स्वीकारण्याच्या बाबतीत करत नाही. माझ्यासाठी कथा महत्त्वाची असते. कथा चांगली असेल आणि मनाला ती पटत असेल तरच आपण चित्रपट स्वीकारते, असे आलिया म्हणाली.

कामावर मनापासून प्रेम…
ती म्हणाली, आपण जेव्हा स्टुडंट ऑफ द इअर चित्रपट केला तेव्हा अवघी सोळा वर्षांची होते. हा चित्रपट कसा होईल, लोकांना आवडेल की नाही याकडे माझे लक्ष नव्हते. मला अभिनेत्री व्हायचे होते आणि संधी मिळताच ती मी स्वीकारली. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर भारावून गेले होते. त्यानंतर मी शानदार केला. तो सपशेल आपटला. खूप वाईट वाटलं. परंतु यावेळी आई वडिलांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. शानदार नंतर ठरवले सिनेसृष्टीत माझी वेगळी अशी ओळख निर्माण करायचीय. माझे वडील मला सतत सांगत असतात, काळ कुणाला थांबत नाही. परंतु आपण काळाच्या प्रवाहात चालत असताना समाजाला चांगले तेच द्यायचे. त्यामुळे मी आता सतर्क झाली असून कथेला अधिक महत्त्व देते. मला वाटते पटकथाकाराने आणि दिग्दर्शकाने परिपूर्ण असायला हवे, तरच चांगली फिल्म निर्मिती होऊ शकते.

चित्रपटांचे प्रकार : चांगला व वाईट…
चित्रपट निवडीविषयी ती म्हणाली, चित्रपट करताना तो केवळ कीर्ती, ग्लॅमरपुरता मर्यादित असूच शकत नाही. चित्रपटाच्या कथेत आत्मीयता वाटली पाहिजे. कथा मनात ठसली पाहिजे. त्यामुळे मी एक दोन असे ग्लॅमरस चित्रपट केल्यानंतर हायवे, उडता पंजाबसारखे चित्रपट करण्याचे ठरविले आहे. मी चित्रपटाची वेगळ्या वेगळ्या प्रकारे विभागणी करत नाही. माझ्यासाठी चांगला आणि वाईट असे दोनच चित्रपटांचे प्रकार असतात. त्यामुळे चित्रपटाकडे त्याच दृष्टीने पाहत असते.

कलाकार प्रेक्षकांना फसवू शकत नाही…
मला अभिनेत्री व्हायचे होते आणि मी झाले. अभिनयाशिवाय दुसरे काहीच केले नसते, असे सांगत कामावर प्रेम करते असे आलिया यावेळी म्हणाली. लहान मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात, त्याचा अतिशय आनंद वाटतो. जेव्हा निर्माते चित्रपटासाठी विचारायला येतात तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही. चित्रपट चांगला व्हावा यासाठी आपण खूप मेहनत घेते. कारण चांगल्या कामासाठीच तर प्रेक्षक पैसे खर्च करून येतात. ‘शानदार’ नंतर खूप काही शिकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्याला जेव्हा प्रेक्षक पसंत करतात, तेव्हा त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचे असते. तेव्हा कलाकाराला प्रेक्षकांना फसवून चालणार नाही, हे तत्त्व ती सांभाळत आले आहे, असे आलिया म्हणाली.

सर्व प्रकारच्या भूमिका करणार…
मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. त्यामुळे आनंदी, उत्साही, गंभीर, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या भूमिका करणार आहे, असे यावेळी आलिया म्हणाली. आता थांबणे नाही. मागे वळून स्वत:ला पडताळून आता चांगल्या भूमिका प्रेक्षकांसाठी द्यायच्या हे माझे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. यावेळी निवेदकांनी तिच्यावर होत असलेल्या विनोदाविषयी विचारले असता, आलियाने स्मार्टपणे उत्तरली – आपण बर्‍याच ठिकाणी जाते तेव्हा असे प्रसंग येतात. परंतु जर माझ्यामुळे कुणाच्या चेहर्‍यावर हसू खुलत असेल तर आय एम मोअर हॅप्पी!!!

आलिया, आलियाचा जल्लोष…
आलिया भट कला अकादमीत येणार हे समजल्यावर तरुणाईने कला अकादमीच्या आवारात तसेच बाहेर गर्दी केली होती. हिरे जडवलेल्या काळ्या पोषाखात ती दिमाखात येताच तरुणाईने आलिया आलिया म्हणत एकच जल्लोष केला. मुलाखतीवेळीही तिने मुला-मुलींच्या प्रश्‍नांना आनंदाने उत्तरे दिली. उपस्थितांमधून काहींनी स्वाक्षरी मागितल्यावरही तिने निवेदकाची प्रश्‍नपत्रिका फाडून कोर्‍या बाजूला स्वाक्षरी दिली. एका चाहतीच्या विनंतीवर तिने ‘मैं तेनू समझॉंवा…’ हे गीत सादर करून चाहत्यांकडून वाहव्वा मिळवली.