इफ्फीचा आज पडदा पडणार

0
90

गेल्या २० रोजीपासून सुरू झालेल्या इफ्फीचा आज समारोप होणार असून स्पर्धा गटांतील विजेत्या चित्रपटांना सुवर्ण मयुर, रौप्य मयुर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराच्या स्पर्धेत ‘कच्चा लिंबू’ हा प्रसाद ओक दिग्दर्शित मराठी चित्रपटही आहे. यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार देऊन महानायक अमिताभ बच्चन यांचा गौरव समारोप सोहळ्यात करण्यात येणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्माया प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये समारोप सोहळा संपन्न होईल.

सलमान, कतरिना आकर्षण
समारोप सोहळ्याला सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेते सिध्दार्थ मल्होत्रा व बॉलिवूडमधील अन्य कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. समारोप सोहळ्यात अमिताभ बच्चन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याचे अमिताभ यांची पत्नी जया बच्चन, पुत्र अभिषेक बच्चन, स्नुषा ऐश्‍वर्या बच्चन आदी मंडळीही हजर राहणार आहेत. बच्चन यांना दिल्या जाणार्‍या विशेष पुरस्कारामुळे सर्वांचेच इफ्फीच्या समारोप सोहळ्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सिध्दार्थ मल्होत्राचा कार्यक्रम
समारोप सोहळ्यात अभिनेते सिध्दार्थ मल्होत्रा हे नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत. बॉलिवूडमधील काही गाजलेल्या गाण्यावर तो नृत्य करणार आहे. आपण इफ्फीनिमित्त प्रथमच गोव्यात येत असून त्यामुळे आपण खूपच आनंदी असल्याचे मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
‘थिंकिंग ऑफ हिम’ने समारोप
समारोप सोहळ्यानंतर ‘थिंकिंग ऑफ हिम’ हा पाब्लो सिझर यांचा चित्रपट कला अकादमीत दाखवण्यात येणार आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनाशी संबंधीत हा चित्रपट आहे.

एस. दुर्गाला होणारा विरोध गैरसमजातून ः शशिधरन

सध्या वादग्रस्त ठरलेल्या ‘एस. दुर्गा’ ह्या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक सनल शशीधरन यांची मुलाखत

  • विशेष मुलाखत ः बबन भगत

आपला एस. दुर्गा हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आहे? आणि त्याला एवढा विरोध का होतोय?
एस. दुर्गा हा चित्रपट एका गावातील महिलेवर आहे. त्या चित्रपटाचे मूळ नाव ‘सेक्सी दुर्गा’ असे होते, पण त्याला विरोध होऊ लागल्यानंतर ते ‘एस. दुर्गा’ असे करण्यात आले आहे. दुर्गा हे केवळ देवीचेच नाव नाही, तर त्या नावाच्या अनेक मुली देशात आहेत हे चित्रपटाला विरोध करणार्‍यांनी समजून घेतले पाहिजे. एस. दुर्गा हा दुर्गादेवीवरील चित्रपट नव्हे. तो दुर्गा नावाच्या एका महिलेवरील चित्रपट आहे. समाज तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, हे ह्या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

तसे असेल तर या चित्रपटाला एवढा विरोध का होत आहे?
– माझ्या चित्रपटाला विरोध होत आहे तो गैरसमजातून. विरोध करणार्‍यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही.

चित्रपट न बघताच एखाद्या चित्रपटाला विरोध कसा काय होऊ शकतो?
विरोधकांना आपले काय सांगणे आहे?
– जेव्हा आपण स्त्रीला देवी मानून तिची पूजा करतो, तेव्हा एखाद्या महिलेची सार्वजनिक ठिकाणी छेड कशी काढली जाते? हा दांभिकपणा बदलायला हवा. जशी आपण देवीची पूजा करतो, तसा स्त्रीचाही आदर व्हायला हवा. रात्री उशिरा घराबाहेर पडणार्‍या स्त्रीला वाईट नजरेने पाहिले जाते. चित्रपटाला विरोध करण्यापूर्वी एकदा तो चित्रपट पाहा असे मी विरोधकांना सांगू इच्छितो.

आतापर्यंत हा चित्रपट कुठे कुठे प्रदर्शित झाला?
– आजवर तो पन्नास चित्रपट महोत्सवांत दाखवण्यात आलेला आहे आणि हे सर्व विदेशी आंतरराष्ट्रीय महोत्सव आहेत. ह्या चित्रपटाला आजवर दहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यात प्रतिष्ठेच्या जिनिव्हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार, मेक्सिकोमधील महोत्सवातील गुवानो जुवाटो पुरस्कार, आर्मेनिया चित्रपट महोत्सवातील गोल्डन ऍप्रिकॉट पुरस्कार, रॉटरडॅम मधील टायगर पुरस्कार यांचा त्यात समावेश आहे.

चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित करण्यात आला आहे काय?
– दुर्दैवाने हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेला नाही. मात्र, देशभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्या प्रदर्शनासाठी मी प्रयत्नशील आहे.

‘इफ्फी’तून हा चित्रपट ज्या प्रकारे गाळण्यात आला, त्याविषयी काय सांगाल?
– ज्या पद्धतीने सरकारने एकतर्फीपणे निर्णय घेऊन चित्रपट वगळला गेला ती पद्धत मला अजिबात आवडलेली नाही आणि म्हणूनच मी केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली.

केरळ उच्च न्यायालयाने ‘इफ्फी’त चित्रपट दाखवण्यास फर्मावले आहे. आता तो दाखविला जाईल असे आपल्याला वाटते?
– त्याचे उत्तर ‘इफ्फी’चे आयोजकच देऊ शकतील. कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हायला हवे असे मला वाटते. अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल.