इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ल्यात २५० ठार

0
97

इजिप्तच्या उत्तर सिनाई प्रांतातील मशिदीवर शुक्रवारचे नमाज पठन चालू असल्यावेळी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात २५० हून अधिक भाविक ठार झाले असून १०० हून अधिकजण जखमी झाले. अल-अरिश शहरातील सदर मशीदीत या घटनेवेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. बॉम्बहल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी चार वाहनांमधून अंदाधुंद गोळीबारही केला. या घटनेनंतर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सी यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली. इजिप्त सरकारने या हल्ल्यानंतर देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

उत्तर सिनाई हा प्रदेश इजिप्तमधील एक अशांत प्रदेश म्हणून परिचित आहे. तेथून ४० कि. मी. अंतरावर असलेल्या रवाडा मशिदीत नमाज पठन सुरू असतानाच हा निर्घृण हल्ला झाला असल्याची माहिती अल-हराय या सरकारी वृत्तपत्राच्या वेबसाईटने दिली आहे. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

इजिप्तचे सैन्य
सिनाई प्रांतात
इसिस या दहशतवादी संघटनेविरुध्द जोरदार कारवाई करत असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या प्रदेशात याआधी दहशतवाद्यांनी शेकडो पोलिस तसेच सैनिकांच्या हत्या केल्या आहेत. तसेच प्रशासनाला सहकार्य करणार्‍या नागरिकांनाही त्यांनी मोठ्या संख्येने ठार मारले आहे.
मशिदीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर नजीकच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या चार वाहनांमधून दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्यानेही अनेकजण ठार झाले.

याआधीचे इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांची सत्ता उलथवल्यानंतर जानेवारी २०११ पासून सिनाय प्रांतात दहशतवाद्यांनी सैनिक व नागरिकांवर अनेक हिंसक हल्ले केले आहेत. तसेच २०१३ साली तत्कालीन अध्यक्ष महम्मद मोर्सी सत्ताच्युत झाल्यानंतर या हल्ल्यांमध्ये आणखी वाढ झाली होती. आतापर्यंत अशा हल्ल्यांमुळे ६०० हन अधिक सुरक्षा दलांचे जवान मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार तेथील लष्कराने दहशतवाद्यांविरुध्द सातत्यपूर्ण मोहिम राबवल्या आहेत.