इंद्रिय स्वास्थ्याची काळजी ‘‘प्रसन्न मन’’

0
583

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

स्वैर, स्वच्छंदी जीवनशैलीमुळे मन चंचल झाले आहे ही वस्तुस्थिती आहे पण अभ्यासाने मनावर ताबा मिळविता येतो. मानसिक विकास उत्तम प्रकारे झाला तर त्याचे तेज माणसाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसते. मन हे त्रिगुणात्मक असते. सत्व हा मनाचा गुण असून तीच मनाची प्राकृत अवस्था आहे.

आजच्या या कॉर्पोरेट युगात ‘द बेस्ट’चे प्रत्येकालाच जणू व्यसन जडताना दिसत आहे. आजचे हे त्रिकोणी/चौकोनी कुटुंब यासाठी अनेक स्पर्धांची आव्हाने पेलत आहेत. ही आव्हाने पेलताना खरंच आपण आपला व आपल्या पाल्यांचा विकास करत आहोत का?… हा प्रश्‍न प्रत्येकानेच स्वतःला अंतर्मुख होऊन विचारावा. चौफेर दृष्टी फिरवल्यास आपल्या लक्षात येईल की मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. मनोरुग्ण म्हणजे ठार वेड लागणेच नव्हे तर मनोरुग्ण म्हणजे स्ट्रेसमध्ये जगणारे, अतिसंतापी, चिडचिड करणारे, सतत काळजीत असणारे, झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेणारे, कधीच समाधानी नसणारे असेच आज म्हणावे लागेल. चार-पाच वर्षांच्या वयापासून मुलांना चष्मे लागतात. पाठदुखी, कंबरदुखी ही दुखणी महाविद्यालयीन पीढीत दिसायला लागली. अगदी तिशीतल्या पीढीत हृदयविकाराने गेलेले ऐकण्यात येते. १०वी-१२वीच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल हे दिवस म्हणजे आत्महत्येचा हंगाम. यात मुख्यत्वे हुशार विद्यार्थ्यांचा भरणा जास्त!

आज आपण १००% सुशिक्षित देश तयार करण्याचे स्वप्न पाहत आहोत. पण शिक्षण म्हणजे नेमके काय? स्वामी विवेकानंदांच्या मते मन, मनगट आणि मेंदू यांचा संतुलित विकास म्हणजे शिक्षण. आज आपण शिक्षणामध्ये मेंदूचा प्रचंड विकास करत आहोत, पण मन आणि मनगट म्हणजे मनाचे आरोग्य व शरीराचे आरोग्य याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहोत. परिणामतः दुबळ्या शरीराची आणि रोगट मनाची विलक्षण बुद्धिमान प्रजा आपण तयार करीत आहोत.

पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी अकरा इंद्रिये आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली आहेत. स्वास्थ्याचा विचार केल्यास या दहाही इंद्रियांना काबूत ठेवणारे हे मन होय. त्यामुळे मनाच्या स्वास्थ्याची काळजी घेणे खूपच आवश्यक व महत्त्वाचे आहे. शरीर आणि आतला जीव किंवा आत्मा यांच्यामधला दुवा म्हणजे मन! ‘मननात् मनः’ म्हणजे मनन करणारे, विचार करणारे ते मन होय. मनावरूनच मानव शब्द आलेला आहे. विचार करण्याची क्षमता असणारा तो मानव. ज्ञान हे मनाच्या सहयोगानेच प्राप्त होते. आत्मा, इंद्रियं व इंद्रियांचे विषय (म्हणजे डोळे व डोळ्यांनी पाहणे, कान व कानांनी ऐकणे किंवा जिव्हा व जिव्हेने पदार्थांची चव घेणे वगैरे) यांचा संयोग झाला तरी त्याबरोबर जर मनाचा सहभाग असला तरच ज्ञान होते, अन्यथा ज्ञान होऊ शकत नाही. म्हणूनच ज्ञान होणे किंवा ज्ञान न होणे हे सर्वस्वी मनावरच अवलंबून आहे. नेमके हेच विद्यार्थ्यांमध्ये घडते. शिक्षक जे शिकवतात ते विद्यार्थी ऐकतात, पाहतात व मन मात्र भरकटत असते. घरी आज जेवण काय बनवलं असेल? नवीन सांगितलेली खेळणी आणली असतील काय? अशाप्रकारचे विचार जर मनात चालू असतील तर मग ज्ञान कसे होईल? म्हणूनच आयुर्वेदशास्त्रामध्ये ‘ब्राह्म मुहूर्तावर’ म्हणजे सकाळी ४.३० वा. उठायला सांगितले आहे. कारण ही वेळ सात्विक असते. ईशचिंतनाकरिता योग्य असते. आजकाल विद्यार्थी रात्री बारा-एक वाजेपर्यंत अभ्यास करतात पण सकाळी मात्र उठायला टाळतात. सकाळी उठून सूर्यनमस्कार घालून जप आणि ध्यान यांचा अभ्यास केल्यास जपध्यानाद्वारे मन बलशाली होते. मनाची एकाग्रता वाढल्याने मेंदूचा/बुद्धीचा विकास होतो. ध्यानाच्या अभावाने मन एकाग्र होत नाही. मन सतत चिंतातूर राहते व आत्महत्येसारखे गुन्हे घडत राहतात. अमेरिकेत भारतातील योग भारतापेक्षा लोकप्रिय झाला आहे,सध्या रामदेव बाबा यांचे ध्यान आणि प्राणायाम जगभर गाजत आहे. आजची व पुढची पिढी मानसिकदृष्ट्या सखक्त करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमातच याचा समावेश व्हायला हवाच. तरंच मनोरुग्णांचे प्रमाण तसेच आत्महत्येचे प्रमाण आटोक्यात येईल.

निसर्गातील प्रत्येक सजीव प्राणिमात्रास स्वतःच्या पिंडाप्रमाणे एक प्रवृत्ती असते. त्या प्रवृत्तीनुसार मनाला प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसणे, स्वैरपणे संचार करणे, उड्या मारणे, कल्पनेच्या पलीकडे अशी भ्रमंती करणे, चिंता करणे हा मनाचा स्वभाव आहे. त्यासाठी मनाला कोणत्याही गोष्टीमध्ये बुद्धीच्या माध्यमातून अडकू देऊ नये. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे आपल्या मनाचे वाहन असतात. ते मनाला माहिती पुरवितात. आपण बुद्धीचा उपयोग करून या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. प्रत्येक व्यक्ती ही परमेश्‍वराची अपूर्व निर्मिती आहे. जगात जे जे शोध लागलेत त्या सर्व संशोधकांचे मन एकाग्र झालेले होते.

मनावर नियंत्रण असल्यास मोठमोठी कामे पार पडू शकतात. मनावर आणि ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज साधना करणे गरजेचे आहे. या साधनेसाठी कमीत कमी एक तासाची बैठक असणे आवश्यक आहे. डोळे मिटून एका बिंदूवर मन केंद्रित करण्याचा सराव करू शकता. डोळे उघडे ठेवून भरकटणारे मन किंवा इंद्रियांचे विषय अंतर्मुख करण्याचा सराव करू शकता. डोळे उघडे ठेवून भरकटणारे मन किंवा इंद्रियांचे विषय अंतर्मुख करण्याचा सराव करू शकता. किंवा आपल्या श्‍वासांवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करू शकता. पण अशा प्रकारच्या अभ्यासामुळे मात्र विषय अंतर्मनावर ठसला पाहिजे. अंतरंगाला विषय चिकटला पाहिजे.

एकाग्रतेसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शहरी भागात तर ध्वनी प्रदूषण ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे, अशावेळी आहे त्याचा स्वीकार करून आपली इच्छाशक्ती तीव्र करावयास पाहिजे. मन सतत जागरूक ठेवण्यासाठी ग्लानि येणारे अमली पदार्थ टाळावेत. इंद्रिय नेहमी स्वच्छ व जागृत ठेवावीत. स्वतःची स्वच्छता, परिसरीय स्वच्छता आणि वागण्यात नीटनेटकेपणा असेल तर मन प्रसन्न राहते. बहुतांश लोक इथेच दुर्लक्ष करतात.
प्रसन्न मनासाठी….
– चकाट्या पिटणे म्हणजे निष्फळ बडबड कमी करावी. यामुळे विनाकारण आपल्या शक्तीचा र्‍हास होतो. आपल्या मनात घाणेरड्या विचारांना थारा देता कामा नये. वेळेचे बंधन घालण्याचा निर्धार करावा. सुरुवातीला अवघड वाटेल पण सराव झाला म्हणजे त्रास होणार नाही. मनाच्या एकाग्रतेसाठी मनात रज आणि तम गुण वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी साधा सात्विक आहार घेणे गरजेचे आहे.
– माणसाचे मन सतत भरकटत असते. नको ते विचार मनात गोंधळ घालत असतात. रिकामे मन हे सैतानाचे घर असे म्हटले जाते. म्हणून मन सतत सकारात्मक विचारात कार्यरत ठेवावे. रचनात्मक चिंतनात गुंतवावे. असे कार्यरत मन तुमच्यातल्या क्षमतांचा चांगला उपयोग करून घेऊ शकते. त्यामुळे व्यक्ती कार्यकुशल बनते.

– आपल्या मनातील मत्सर, द्वेष या भावना फार काळ आपण लपवू शकत नाहीत. त्या नकळत शरीरावर प्रकट होत असतात. म्हणूनच संतुलित व्यक्तिमत्त्वासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे व अंतःकरण शुद्धीसाठी सात्विक आहार व मनाच्या सत्व गुणांवर विजय हवा.
– मन संघर्षाने पोखरलेले असेल, रोगग्रस्त असेल, खचले असेल तर त्याची छाया आपल्या देहबोलीवर पडते. आपल्या जीवनासंबंधीच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा अट्टाहास असतो. या अट्टाहासातूनच आसक्ती पक्की होत जाते आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर आपण अस्वस्थ तसेच असमाधानी होतो. असमाधान हा मानसिक रोग आहे. या रोगाला औषध म्हणजे फक्त ‘योग’ आणि ‘योगच’ होय. मनाच्या समतोलपणालाच योग असे म्हणतात.

– स्वैर, स्वच्छंदी जीवनशैलीमुळे मन चंचल झाले आहे ही वस्तुस्थिती आहे पण अभ्यासाने मनावर ताबा मिळविता येतो. मानसिक विकास उत्तम प्रकारे झाला तर त्याचे तेज माणसाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसते. मन हे त्रिगुणात्मक असते. सत्व हा मनाचा गुण असून तीच मनाची प्राकृत अवस्था आहे. रज आणि तम हे मनाचे दोष असून या दोन्हींच्या प्राबल्यानेच मानसिक व्याधींची निर्मिती होते. औषधी द्रव्यांमध्ये सर्पगंधा, जटामासी, अश्‍वगंधा, ब्राह्मी, खुरासनी ओवा, रौप्यभस्म, सुवर्णभस्म ही द्रव्ये विशेष उपयुक्त ठरतात. घृत किंवा तूप व दूध हे अत्यंत शीत असून मेधाशक्ती वाढविणारे आहे.
– लघु, जीवनीय, मधुर असे अन्नाचे सेवन करावे. शालिषष्टीक, मूग, पटोल, ब्राह्मी, वास्तुक यांच्या भाज्या, कुष्मांड, कुपित्थ, द्राक्षा आदी फळे, दूध व तूप हे विशेष पथ्यकर.
– विरुद्धाशन, मद्यपान, मांसाशन, वेगविधारण, अति-व्यायाम, उन्हात हिंडणे हे अपथ्यकर आहे.
– आहार-विहार, राहण्याची जागा, शय्यासन आदी मनोकुल असल्यास मन प्रसन्न राहते.