इंद्रियांच्या स्वास्थ्याची काळजी जीभ

0
642

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

अति थंड, अति तिखट, अति गोड, अति खारट, अति उष्ण पदार्थ टाळावेत. सुपारीसारख्या तुरट चवींचे खाद्यपदार्थ टाळावेत, पण जिभेच्या आरोग्यासाठी तांबुलसेवन मात्र पथ्य आहे.

जीभ हे रसनेंद्रियाचे स्थान आहे. हे वागेंद्रियं व रसनेंद्रिय या दोघांचेही स्थान आहे. म्हणजे जिभेच्या ठिकाणी एक ज्ञानेंद्रियं आहे जे रसज्ञान करवते आणि एक कर्मेंद्रिय आहे जे बोलण्याचे काम करते.
कफशोणितमांसानां साराज्जिव्हा प्रजायते |
कफ, रक्त व मांस यांच्या प्रसादभागापासून जिव्हेची उत्पत्ती होते. जिव्हा ही मांसल, चापट व ३ अंगुली लांब असते. जिभेचा उद्गम मुखतलातील कण्ठिकास्थिपासून होतो. त्याठिकाणी जीभ ही जाड असते. जिभेचा अग्र भाग निमुळता होत जातो. त्याला जिव्हाग्र म्हणतात.
जिव्हा हे रसनेंद्रियाचे अधिष्ठान आहे. जिभेच्या आप महाभूताचे आधिक्य असल्याने ती आप महाभूतात्मक रसाचे ग्रहण करते. जिभेच्या ठिकाणी असणारा बोधक कफ रसनेंद्रियाला सहाय्य करतो. जिभेच्या अग्र भागाला मधुर रस, मागील भागाला कडू रस व कडेला आंबट रसाचे विशेष ज्ञान होते. मधुर, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट या सहा चवींची वेगवेगळी केंद्रे जिभेवर असतात.
जिभेचा प्राकृत आकार किंचित बाह्य वक्र असतो. प्राकृत जिभ ही आरक्त, गुळगुळीत, लांबट असते. जिभेच्या पृष्ठभागावर पातळ श्‍लेष्मल त्वचेचे आवरण असते. त्या आवरणाद्वारा तिला स्पर्शज्ञान होते. त्यामुळे घासामध्ये एखादा खडा किंवा केस आल्यास ती लगेच शोधून काढते. जिभेच्या ठिकाणी दोन धमन्या रसबोधनाचे कार्य करतात. त्याची टोके जिभेवर पसरलेली असतात. जेव्हा या धमनी अग्राचा अन्नाशी संबंध येतो तेव्हा त्या अन्नाची रुची समजते. हे रसज्ञान प्राणवायुमार्फत मनाकडे नेले जाते. आधुनिक शास्त्रानुसार रसग्रहण करण्याकरता जिभेवरील श्‍लेष्मल त्वचेमध्ये स्वादांकूर असतात ज्यामुळे जिभेला खडबडीतपणा येतो. मुखात टाकलेल्या पदार्थांच्या रसाचा संपर्क स्वादांकुरांतील केशाशी आल्यानंतर त्याची संवेदना नाडीद्वारे मस्तिष्कातील स्वादुकेंद्राकडे पोहोचविली जाते.
जिभेवर मळ साचला असल्यास पदार्थांच्या रसाचे योग्य ग्रहण होत नाही. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रानुसार दिनचर्येमध्ये जिव्हानिलेखन म्हणजेच जिभेची स्वच्छता करायला सांगितले आहे. कषाय, तिक्त, कडुरसात्मक द्रव्य.ांनी दात घासून, त्याच कुंचल्याचा वापर करून जीभही घासायला सांगितली आहे, जेणेकरून साचलेला मळ निघून जाईल.
जिव्हा हे वागेंद्रियाचेदेखील स्थान आहे. म्हणूनच जिव्हेला गोजिव्हा म्हणतात. जिव्हेच्या ठिकाणी ४ धमन्या असतात. त्यापैकी २ धमन्यांनी भाषणाची क्रिया केली जाते, तर २ धमन्यांनी घोषणाची क्रिया केली जाते. जिभेच्या खालच्या बाजूस एक सीवन असते. ती दशप्राणायतनापैकी एक आहे. शस्त्रकर्माचे वेळी हिचा छेद होणार नाही, याची काळजी घ्यावी. कण्ठातून निघालेल्या आवाजाला शब्दाचे स्वरूप मुखविवरामध्ये प्राप्त होते. मुखविवरामध्ये जिव्हा प्रामुख्याने हे कार्य करते म्हणून त्यास वागिंद्रिय म्हणतात.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे शब्दोत्पत्ती – आत्म्याचा मनाशी, मनाचा इंद्रियाशी व इंद्रियाचा त्याच्या विषयाशी संबंध जुळल्यावर ज्ञानोत्पत्ती होते. बोलण्याची इच्छा निर्माण झाल्यावर मन वायूला आज्ञा देतो, अर्थात उरःस्थित उदानवायुला कार्यप्रवृत्त जातो व तेथील स्वरवह स्रोतसामध्ये अवर्ण शब्दाची उत्पत्ती करतो. नंतर तो वायु कण्ठातून मुखामध्ये येतो व जिभेच्या संयोग वर्णात्मक स्वरूप प्राप्त करतो, अशा रीतीने जिभेचे ज्ञानेंद्रियात्मक व कर्मेंद्रियात्मक कार्य होते.
जिभेची काळजी
* गण्डूष किंवा कवलधारण हे विधी जिभेचे आरोग्य टिकविण्याकरता करावयाचे असतात. फक्त व्याधीपुरती हा विधी न करता याचा दिनचर्येमध्ये उपयोग करावा.
* गण्डूष ः औषधी द्रव्यांचे काढे किंवा स्नेह तोंडात काही काळ धरून ठेवणे- याला गंडूष (गुळण्या) म्हणतात. यामध्ये तोंडात द्रव इतका असावा की तो खुळखुळावून हलविता येऊ नये. स्नेहयुक्त गंडूषामध्ये ओठ फुटणे, खरखरीत होणे, दंतरोग, स्वरभेद यांपासून रक्षण होते.
* कवलधारण ः तोंडातील द्रव खुळखुळवता येईल इतका घेऊन त्याचे खुळखुळावून चुळा भरणे याला कवलधारण म्हणतात. गंडूषद्रव्यात स्नेह घालतात, परंतु कवलामध्ये स्नेह नसतो. खैर, वड, उंबर इत्यादी क्षीरिवृक्षांच्या सालींचा काढा करून त्याचे कवल धारण केल्यास अरुची, मुखदुर्गंधी, यांचा नाश होऊन तोंडाला हलकेपणा येतो.
* धूमपान ः धूमपान हा विधीदेखील वागेंद्रियांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचा आहे. यातील प्रायोगिक धूमपान हा प्रकार स्वस्थवृत्तासाठी आहे. मुस्ता, राळ, नागरमोथा, धूप, पांढरे कमळ, सावरी, तगर यांचे चूर्ण पाण्यात कालवून त्याचा बोरू किंवा वेताच्या आठ अंगुठे लांब काडीवर लेप द्यावा व मधली काडी काढून टाकावी. नंतर ही वर्ती तुपात बुडवून धूमयंत्रात ठेवून त्यावर निखारा ठेवावा व यंत्राचा नेत्र मुखाजवळ धरून तोंडाने धूर ओढावा. प्रायोगिक धूमपानाने हृदय. व कंठाची शुद्धी होते. डोके हलके वाटते. नाक व घशातील कफाचे शोधन होते. वाणी, मन, इंद्रिये प्रसन्न होतात. वाताचे शमन होते. केश, दाढी, मिश्या, बळकट होतात. मुखदुर्गंधी, कास, श्‍वास, अरुची, स्वरभेद, शिंका, निद्रा, सर्दी, मन्यास्तंभ व शिराभूल व इतर वातकफजरोग होत नाहीत. अगदी तान्ह्याबाळाची जिभदेखील वचाचूर्णाने घासावी जेणेकरून जिभेचे निर्लेपन दूर होते. पुढे बोलताना कष्ट होत नाहीत. वाणी स्पष्ट होते.
वागीन्द्रिय हे मस्तिष्कात असते. यावर प्राणवायूचा अधिकार चालतो. हे एक असून त्याचे दोन भाग असतात. एका भागाने शब्दोच्चार होतो तर दुसर्‍या भागाने शब्द ग्रहण होतात. या कारणाने ऐकण्याचे मूळ बोलणे होय. त्यामुळे वाग्भ्रंश झाल्यास कर्णभ्रंश होतो. यासाठी लहान बालकाशी आपण सतत बोलावे म्हणजे ती बोलावयास शिकतात.
वैखरी वाणी मुखात निर्माण होते. यामध्ये जीभ भाग घेते. नाभी व उरस्थानातून निघालेला उदानवायू वैखरीच्या प्रेरणेने विभिन्न स्वर, वर्ण, व्यंजन उच्चारतो. जीभ वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून वेगवेगळे शब्दोच्चार करते. शब्दांचे कंठ्य, मूर्धन्य, तालव्य, दंत्थ, ओष्टय व अनुनासिक असे प्रकार घडतात.
काही व्यक्तींमध्ये जिभेच्या खालची शिवण ही खालच्या जबड्याला दातामागे चिकटलेली असते. त्यामुळे शब्दउच्चारण नीट होत नाही. या समयी एक शस्त्रकर्म करून जीभ मोकळी करता येते. योग्य तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वागीन्द्रियाच्या आरोग्यासाठी ॐकाराचा जप, भ्रामरी प्राणायाम याचा फायदा होतो.
खजूर, दूध, ज्येष्ठमध, खडीसाखर यांच्या सेवनाने स्वरयंत्राची ताकद वाढते.
– व्यसनाधिनतेमुळे स्वरयंत्राला सूज येते व आवाज बदलतो, त्यामुळे व्यसने टाळावी.
– जिभेवर पांढरा थर साठणे म्हणजेच अपचन, अजीर्ण किंवा आमतेचे लक्षण आहे. त्यामुळे प्रथम आम नष्ट होण्यासाठी किंवा अजीर्णावर चिकित्सा करावी.
रोज कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर, जीभ सर्व दिशांनी दातांवरून फिरवावी. या व्यायामाने जिभेची वचनशक्ती सुधारते.
– जिभेच्या ठिकाणी कोरडेपणा येऊ नये याची काळजी घ्यावी. पाणी भरपूर प्यावे. फळांचा रस घ्यावा.
– अति थंड, अति तिखट, अति गोड, अति खारट, अति उष्ण पदार्थ टाळावेत. सुपारीसारख्या तुरट चवींचे खाद्यपदार्थ टाळावेत, पण जिभेच्या आरोग्यासाठी तांबुलसेवन मात्र पथ्य आहे.
अशाप्रकारे जिभेचा उपयोग दुसर्‍याच्या हितासाठीच करावा. कुणाला वावगे बोलून दुखवू नये.,अनावश्यक बोलणे टाळावे. दिवसातून किमान एक तास मौन पाळावे. दहा मिनिटे ईश्‍वर चिंतनात घालवावीत.