इंद्रियांच्या स्वास्थ्याची काळजी भाग – २ ‘‘कान’’

0
838

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी म्हापसा)

अनेकदा उडणारे कीटक कानात गेल्याचे आढळते. कानातील मेनचट द्राव व्यवस्थित असेल तर त्याच्या वासानेच कीटक कानाकडे फिरकत नाहीत पण तरीही कीटक कानात गेल्यास कानात पाणी टाकू नये. बॅटरीचा उजेड कानासमोर धरावा. त्याने कीटक प्रकाशाकडे झेपावतो व कानातून बाहेर पडतो.

पंचज्ञानेंद्रियांपैकी श्रोत्रेद्रियांचे अधिष्ठान म्हणजे कान. तसेच पंचमहाभूतांपैकी आकाश तत्त्वाचा संबंध कानाशी आहे आणि जेथे जेथे आकाश म्हणजे पोकळी आहे, तेथे प्रत्येक ठिकाणी वायूचे साहचर्य असते. म्हणून कानाच्या आरोग्यासाठी कानात वातदोष वाढणार नाही याची दक्षता घ्यावी व तेल-तुपासारख्या स्नेहन द्रव्यांनी वाताचे शमन करावे.

कानाचे महत्त्व चटकन समजावे म्हणून की काय लहानपणीच कान टोचून कर्णभूषणे घालण्याची पद्धत रूढ झाली असावी. लहान मुलांचे रक्षण व्हावे म्हणून कान टोचले जात होते, या आशयाचा एक श्‍लोकही आयुर्वेदात आढळतो… ‘रक्षणभूषणनिमित्तं बालानां कर्णौ विध्येते|’’
मुळातच कान तसे आपल्या दृष्टीआड असणारे इंद्रिय, त्यामुळे त्याच्याकडे कानाडोळाच केला जातो. जोपर्यंत सहजपणे सारे काही ऐकू येण्याचे कार्य सुरळीत असते तोपर्यंत आपले कानाकडे फार लक्ष जात नाही. जसे ऐकू येण्याचे प्रमाण कमी होते.. तसे हाताचा कर्णा घेऊन ऐकण्याचा प्रयत्न करणे.. हेच आपल्या हाती राहते. स्त्रीवर्गासाठी तर वेगवेगळी फॅशनेबल इयरिंग्ज (कानातले डूल) घालण्यापुरतेच कानांचे महत्त्व आहे. पण आजकाल इयरिंग्ज न घालणे हीच फॅशन आहे. पण हो, अनेक तरुण-तरुणींच्या कानात इयरफोन घालण्यासाठी मात्र या श्रोत्रेंद्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. मग एवढे महत्त्व असलेल्या कानांची काळजी नको का घ्यायला??
कानाचा बाहेरील भाग म्हणजे कानाची पाळी. या ठिकाणी संपूर्ण शरीराचे मर्मबिंदू सापडतात. डोके खाली करून पाय पोटाशी घेऊन गर्भात असणार्‍या मुलाच्या आकारासारखा कानाच्या पाळीचा आकार असतो. विशिष्ट मर्मबिंदूवर टोचून (ऍक्युपंक्चर) किंवा दाब देऊन (ऍक्युप्रेशर) रोग बरे करणार्‍या शास्त्रात कानाच्या पाळीबद्दल सविस्तर अभ्यास केलेला सापडतो. कानाच्या पाळीला खालचा लटकणारा मऊ भाग मेंदूशी संबंधित असल्याने त्या ठिकाणी कान टोचणे व कर्णभूषणे घालणे ही पद्धत रूढ झाली. अस्थमा किंवा श्‍वसनाच्या रोगात आराम पडण्यासाठी एका विशिष्ट जागी कान टोचतात. तसेच पूर्वी वापरात असलेली पुरुषांची ‘भिकबाळी’ याच कारणास्तव असावी.

कानांच्या आरोग्याची काळजी –
आयुर्वेद शास्त्रात रोज एकदा कान, नाक, टाळू, डोळे व मुख याठिकाणी तैलाभ्यंग करून आरोग्यरक्षण करावे, असे सांगितले आहे. विशेष म्हणजे कानाचा संबंध आकाश तत्त्वाशी व जेथे आकाश तेथे वायूचे साहचर्य यानुसार वायूचे शमन हे स्नेहनानेच होत असल्याने कानात नियमित तेल टाकण्याची सवय लावावी. म्हणजे कर्णपूरण करणे हे दैनंदिन कार्यात समाविष्ट करणे. कर्णपूरण शक्य नसल्यास कानाला आतून तेलाचे बोट फिरवावे. कोमट तीळ तेल, खोबरेल तेल वापरण्यास हरकत नाही. मात्र आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले तेल सर्वांत श्रेष्ठ.
ध्वनी प्रदूषण, इअरफोन सतत वापरणे, सतत द्रुतगती संगीत ऐकणे, डॉल्बीसिस्टिमवर गाणी ऐकणे यामुळे कानाच्या ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होतो. इअरफोनची स्वच्छता नीट न केल्यास कानात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी आठवड्यातून एकदा नियमित कानांची स्वच्छता करावी व रोज तेलाने कर्णपूरण करावे.

कानाशी संबंधित अगदी सर्वसाधारण तक्रार म्हणजे कानात साचणारा मळ. खरे तर बाह्यकर्णनलिकेत बाहेरून काही पदार्थ शिरू नयेत आणि कानाचे रक्षण व्हावे यासाठी मेनचट (थोडा चिकट व ऑइली) द्रव पाझरण्याची नैसर्गिक यंत्रणा कानात कार्यरत असते. त्यामुळे कानांना फार त्रास देऊ नये. उगीचच मळ कोरत राहिल्यास तो तयार होण्याचे प्रमाणही वाढत राहते आणि मग तो कानात साचत जातो. यासाठी कानात तेलाचे बोट फिरवणे व साध्याशा मऊ फडक्याने कानाचा बाहेरून दिसणारा सर्व भाग नुसता पुसला तरी मळ साठण्याची तक्रार दूर होते.

‘कानात वारा जाणं’ अशीही तक्रार असते. म्हणूनच की काय लहान मुले, गरोदर स्त्रिया, बाळंतीण स्त्रिया यांच्या कानावरून घट्ट टोपरी बांधण्याची प्रथा आपल्याकडे असावी. कानाची रचना समजून घेतल्यास कान हा अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचा अवयव असून बाह्यकर्णावरील त्वचेचे तापमान गालावरील त्वचेपेक्षाही अधिक असते. त्यामुळे त्यावर बाहेरील वातावरणाच्या तापमानाचा परिणाम लगेच होतो. त्याचमुळे खूप थंड वातावरणातही कान झाकून घेतले की उबेची जाणीव होते. कदाचित यामुळेच आपल्याकडेही ही कान झाकून घेण्याची प्रथा पडली असावी.

रेल्वे, बस प्रवासात खिडकीशेजारी बसल्यास कान झाकावे. प्रवास करताना कापूर तुकडे घालून तयार केलेल्या कापसाचा बोळा कानामध्ये ठेवावा. कापरामुळे चेहर्‍याभोवती विषाणूविरोधी वातावरण तयार होते. कापूर हे संप्लवनशील आहे.
नियमित गुळण्या केल्यास कानाजवळचे स्नायू बळकट होतात. गुळण्या केल्यावर तोंडामध्ये कोमट तेल व पाणी यांचे मिश्रण धरून ठेवावे. कानांजवळचे स्नायुसंधी दुखायला लागले की थुंकावे. याने चेहरा, गाल व कान सुदृढ राहतात.
अतिक्षीण आवाज ऐकणे किंवा अति मोठे आवाज ऐकणे हे कटाक्षाने टाळावे. मनाला दुःख देईल असे कर्णकटू ऐकणेही टाळावे.
– कानात काहीतरी बाहेरची वस्तू जाणे अशीही तक्रार असते. लहान मुले खडू, पेन्सिल अशा वस्तू कानात घालतात. ते मोठ्यांचे अनुकरण करतात म्हणून मोठ्यांनीही कधीही कानात काडी, पेन, रिफील अशा वस्तू घालून खाजवण्याची सवय असल्यास ती मोडावी. त्यामुळे कानात जंतुसंसर्ग होतो व कानाच्या पडद्याला इजा होते.
– अनेकदा उडणारे कीटक कानात गेल्याचे आढळते. कानातील मेनचट द्राव व्यवस्थित असेल तर त्याच्या वासानेच कीटक कानाकडे फिरकत नाहीत पण तरीही कीटक कानात गेल्यास कानात पाणी टाकू नये. बॅटरीचा उजेड कानासमोर धरावा. त्याने कीटक प्रकाशाकडे झेपावतो व कानातून बाहेर पडतो. पण तसे न घडल्यास सरळ डॉक्टरांकडे जावे.
– कानाला दडे बसले असल्यास कान दुखत असल्यास एक चमचा खोबरेल तेल एक लसणीच्या पाकळीबरोबर गरम करावे, कोमट झाल्यावर या तेलाचे तीन-चार थेंब कानात घालावे.
– जुनाट सर्दीमुळे कानाला ठणका लागल्यास कापसामध्ये हिंगाचा खडा गुंडाळून कानात ठेवावा.
– बदामाच्या तेलाच्या नियमित वापराने कानाचे आरोग्य टिकून राहते.
तीळ तेल, खोबरेल तेल किंवा आयुर्वेद औषधांनी सिद्ध केलेले तेल कानात नियमित घातल्यास श्रवणशक्ती टिकून राहते व कानाचे कोणतेही आजार होत नाहीत.
– कानातून पाणी किंवा पू येत असल्यास कानात तेल टाकू नये. तसेच तेल टाकण्यापूर्वी कानाच्या पडद्याला भोक नसल्याची वा कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग नसल्याची खात्री करावी. याशिवाय निखार्‍यावर वावडिंगाचे दाणे टाकून धुरीवर कान धरावा, याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ करावे.
– वयानुरूप ऐकायला कमी येणे, कानातून आवाज येणे वगैरे तक्रारींवर कानात तेल टाकावे व बरोबरीने जेवणानंतर दोन चमचे साजूक तूप खावे.
श्रोत्रेंद्रिये हे मेंदूच्या जास्त जवळ असल्याने कानात संसर्ग झाल्यास त्याचा संसर्ग मेंदूलाही होण्याची शक्यता असते म्हणूनच कानांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
क्रमशः