इंद्रियांच्या स्वास्थ्याची काळजी भाग – १ ‘डोळे’

0
652

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी म्हापसा)

सध्या लहानपणापासूनच लागणारा चष्मा ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. चष्म्याचा नंबर असणार्‍यांनी नियमितपणे चष्मा वापरावा व डोळ्यांचे व्यायाम करावे. आयुर्वेदाच्या आधाराने विविध उपक्रम करून डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखावे व हे सुंदर डोळे मृत्यूपश्‍चात नेत्रदान करून नेहमी नेत्ररूपाने जिवंत ठेवावेत.

चक्षुः श्रोत्रं घ्राणं रसनं स्पर्शनम् इति पंचेन्द्रियाणि |
चक्षू म्हणजे डोळे, श्रोत्रं म्हणजे कान, घ्राणेंद्रिये म्हणजे नाक, रसना म्हणजे जीभ आणि स्पर्शेंद्रिय म्हणजे त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. या पाच ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला पाहण्याचे, ऐकण्याचे, गंधाचे. चवीचे व स्पर्शाचे ज्ञान होते. डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही या पाच ज्ञानेंद्रियांची अधिष्ठाने आहेत व सूक्ष्म इंद्रिये ही मस्तिष्कात आहेत. प्रत्येक इंद्रिय पंचभौतिक आहे. मात्र एकेका महाभूताचे आधिक्य आहे व त्यानुसार त्या त्या महाभूताच्या गुणांचेच, अर्थांचे ग्रहण संबंधित इंद्रिय करू शकतात. इंद्रियांची निगा राखणे स्वास्थ्यरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. इंद्रियं व अर्थ यांचा प्राकृत संबंध (सम्यक योग) हा स्वास्थ्यरक्षणार्थ अत्यावश्यक आहे. कारण ‘असात्म्य – इंद्रियार्थ संयोग’ हे व्याधीनिर्मितीचे एक महत्त्वाचे कारण आहे.
सध्याच्या काळात अति-मिथ्या योगाची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. उदा. ध्वनी प्रदूषण हे श्रोत्रेंद्रियांच्या व्याधीचे कारण आहे. फास्ट फूड हे रसनेंद्रियाच्या व्याधीचे कारण होय. बीभत्स पाहणे हे चक्षुरिंद्रियांच्या रोगांचे कारण, धूळ-धुराळ, केमिकल्सचा वापर हे स्पर्शेंद्रियांना तर वायुप्रदूषण घ्राणेंद्रियांच्या व्याधींना आमंत्रित करतात. अशा प्रकारच्या कारणांचा अतियोग किंवा मिथ्यायोग इंद्रियांशी आल्यास त्या त्या संबंधित इंद्रियाचे रोग उत्पन्न होतात. या गोष्टींचा केवळ हानिकारक परिणाम केवळ त्या त्या इंद्रियापुरताच मर्यादित राहत नाही तर त्याचे दुष्परिणाम सर्व शरीरभर व मनावरदेखील होतात. त्यामुळेच इंद्रियांच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी…
रूपग्रहण कार्यासाठी तेज महाभूतप्रधान चक्षुरेंद्रियांची योजना मानवी शरीरात केलेली आहे. मनुष्य इतर इंद्रियांपेक्षा या इंद्रियांवर ज्ञानार्जनासाठी अधिक अवलंबून असतो. इतर इंद्रियांकडे त्यांचे विषय जावे लागतात मगच ज्ञान होते. चवीसाठी पदार्थ जिभेवर ठेवावा लागतो. तसे नेत्राचे नसून आपणास डोळे उघडे असल्यास प्रत्यक्ष ज्ञान होतच असते. फक्त आपणास पाहायचे नसल्यास आपण डोळे मिटू शकतो किंवा नजर दुसरीकडे फिरवू शकतो.
हल्ली प्रत्येकजण मोबाइलची स्क्रीन पाहत डोळे उघडतो व मोबाइल स्क्रीन किंवा टीव्ही स्क्रीनकडे पाहत डोळे बंद करतो. तसेच संगणकावर, लॅपटॉपवर काम करत असल्यामुळे सतत पाहत राहिल्याने डोळे अतिश्रमाने थकतात. तसेच टीव्ही हा मनोरंजनासाठी कमी पाहिला जातो पण त्यातील बीभत्स दर्शन, लैंगिक दृश्ये, भीतिदायक दृश्ये (हॉरर) यांसारख्या कार्यक्रमांना जास्त पसंती मिळाल्याने चक्षुरेंद्रियांचा मिथ्यायोग होतो. त्याचा थेट परिणाम मनावर होतो व विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक रोग होतात. यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही विशिष्ट उपक्रम प्रत्येक इंद्रियासाठी दिनचर्येमध्ये सांगितलेले आहे.
डोळे उघडता क्षणी हात एकमेकांवर चोळून थोडे गरम करावे व डोळ्यांवर पोकळ धरावे. त्या पोकळीत डोळ्यांची उघडझाप करावी. मग हात उघडे धरून ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ असे ईशचिंतन करावे. किमान पाच मिनिटे तरी मन एकाग्र करून आपल्या इष्टदेवतेचे चिंतन किंवा आत्मचिंतन करीत शेवटी तळहात एकमेकांवर चोळून.. गरम करून.. ते डोळ्यांवर ठेवून डोळे शेकावे.
आयुर्वेद शास्त्रामध्ये दररोज सौवीरांजन, आठवड्यातून एकदा रसांजन प्रयोग व डोळ्यांचे व्यायाम असे विविध उपक्रम डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी सांगितले आहे. तसेच नेत्रतर्पण विधी, अंजन विधी, पुटपाक विधी, बिडालक विधी, अशा विविध उपचारपद्धती डोळ्यांच्या निरामय आरोग्यासाठी वापरल्या जातात.
अंजन-सौवीरांजन (काळे काजळ किंवा सुरमा) दररोज डोळ्यात घालावे. त्याने डोळे सुंदर होतात. दृष्टी सूक्ष्म होते व नेत्रमंडले स्वच्छ होतात. पापण्या मुलायम व दाट होतात.
* सौवीरांजन – सौवीर हे काळ्या रंगाच्या खनिज-खड्याळ आकारात मिळते. त्याची पूड करून तिला माक्याच्या रसाच्या भावना दिल्याने सौवीरांजन किंवा सुरमा तयार होतो.
* काजळ – एरंडतेलाची वात चांदीच्या निरांजनात ठेवून त्या ज्योतीवर तांब्याचे ताह्मण धरून काजळी जमा करतात. ही क्रिया शक्यतो दिवाळीतील अमावास्येला (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी) करतात. तयार झालेली काजळी पूड करून साजूक तुपात खलून ते काजळ वापरतात. या काजळाचे अंजन घातल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
* रसांजन – दारुहळदीचा शेळीच्या दुधात काढा करून तो घट्ट होईपर्यंत आटवल्याने रसांजन तयार होते. डोळा हा तेजतत्त्वाचा (पित्तप्रधान) असल्याने कफदोषाची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून आठवड्यातून एकदा रसांजन वापरावे. रसांजनामुळे संचित कफाचा स्राव होऊन जातो व डोळे स्वच्छ होतात. मात्र रसांजन तीक्ष्ण असल्याने त्याचा प्रयोग रात्री करावा.
* कांद्याचा रस – प्रखर सूर्यकिरण व उष्णता यामुळेही डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. कारण हे तेजतत्त्वाचे इंद्रिय आहे. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात पांढर्‍या कांद्याचा रस डोळ्यांत घातल्यास नेत्रदाह, थकवा निघून जातो.
* त्रिफळा चूर्णाचा काढा – त्रिफळा चूर्णाचा काढा करून तो वस्त्रगाळ करावा. या काढ्याने नियमित डोळे धुतल्यास डोळ्यांच्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. त्रिफळा घृताने नेत्रतर्पणविधी केल्यासही लाभ होतो. चष्म्याचा नंबरही कमी होतो.
* तळपायांना तेल किंवा तूप लावून ते काशाच्या वाटीने चोळल्यास डोळ्यांमधील उष्णता कमी होते.
* कचरा, केस डोळ्यांत गेला तर पाण्यात डोळ्यांची उघडझाप करावी.
संतुलित आहाराचे सेवन करावे. आहारात दूध, दही, तूप, हिरव्या पालेभाज्या, काकडी, दोडका, भेंडी, भोपळा, केळी, सफरचंद, संत्री, मोसंबी, बदाम, खारीक यांचा जास्त वापर करावा.
* डोळे लाल झाल्यास व डोळ्यातून सारखे पाणी येत असल्यास गुलाबपाण्याच्या डोळ्यांवर घड्या ठेवाव्यात.
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागल्यास सरसोच्या तेलाने डोळ्यांभोवती मालीश करावी. काकडी किंवा बटाट्याच्या चकत्या डोळ्यांवर ठेवाव्या.
* डोळ्यांच्या आरोग्याकरता भरपूर पाणी पिणेही आवश्यक आहे.
आजकाल लॅपटॉप, कॉम्प्युटर हे गरजेचे झाले असल्याने सतत काम करून डोळे थकतात. त्यासाठी काम करताना मध्येमध्ये डोळ्यांना विश्रांती द्यावी. डोळ्यांची उघड-झाप करावी. रात्री झोपताना डोळ्यांच्या पापण्यांना वर व खाली एरंडतेल लावावे.
* काम करताना रूमचे तापमान कमीत कमी असावे. रूममध्ये थोडा ओलावा असावा. म्हणजे डोळे कोरडे होत नाहीत.
* डोळे कोरडे होणे, जळजळ, खाज येणे अशा बारीक-सारीक वाटणार्‍या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* रात्री चांगली झोप डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रात्री लवकर झोपण्याने डोळ्यांना विश्रांती मिळते.
डोळ्यांचा व्यायाम –
१. तळहातात पाणी घेऊन ते डोळ्यांवर दाबून मान वर करावी व त्या पाण्यात डोळ्यांची उघडझाप करावी.
२. डोळे किलकिले करून कोवळ्या उन्हात ५-१० मिनिटे सूर्याकडे पहावे व नंतर डोळ्यांवर हात धरून सूर्याकडे पाठ करून पाच मिनिटे डोळ्यांची जोराने उघडझाप करावी.
३. रात्री चंद्राकडे १५ मिनिटे टक लावून पहावे.
४. मान न हलविता चारही कोपर्‍यात क्रमाने बुब्बुळे वाटोळी फिरवावीत.
५. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करून बसावे. याने डोळ्यांमध्ये शक्ती येते.
डोळ्यांची विशेष काळजी –
– टीव्ही, चित्रपट, हलणार्‍या वस्तू सतत टक लावून व दीर्घकाळ पाहू नयेत. किमान दहा फूट अंतरावरून पहावे.
– वाहनावरून जाताना साधा किंवा उन्हाचा चष्मा वापरावा.
– संपूर्ण खोलीभर सारखा प्रकाश असावा. तो झगझगीत किंवा अति मंद नसावा. लिहिताना किंवा वाचताना प्रकाश पाठीमागून किंवा एका बाजूने यावा.
– नेहमी सूक्ष्म, चंचल, अप्रिय, अप्रशांत, मूत्र, विष्ठा इ. बीभत्स पदार्थ (मिथ्या योग), अतिप्रखर तेज पाहणे (अतिभोग) टाळावे.
सध्या लहानपणापासूनच लागणारा चष्मा ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे डोळ्यांची म्हणजेच चक्षुरिंद्रियांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. चष्म्याचा नंबर असणार्‍यांनी नियमितपणे चष्मा वापरावा व डोळ्यांचे व्यायाम करावे. आयुर्वेद शास्त्राच्या आधाराने विविध उपक्रम करून डोळ्यांचे उत्तम आरोग्य राखावे व हे सुंदर डोळे मृत्यूपश्‍चात नेत्रदान करून नेहमी नेत्ररूपाने जिवंत ठेवावेत.
क्रमशः