इंग्लंड १८१ धावांनी आघाडीवर

0
120

आयर्लंडविरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडने आपल्या दुसर्‍या डावात ९ बाद ३०३ धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडचा पहिला डाव ८५ धावांत गुंडाळल्यानंतर आयर्लंडने आपल्या पहिल्या डावात २०७ धावा करत १२२ धावांची आघाडी घेतली होती. ही आघाडी वजा करून इंग्लंडकडे १८१ धावांचे पाठबळ राहिले असून त्यांचा एक गडी शिल्लक आहे.

पहिल्या दिवसाच्या बिनबाद शून्यावरून काल पुढे खेळताना डावातील अकराव्या षटकात इंग्लंडने बर्न्सला गमावले. नाईट वॉचमन लिच व जेसन रॉय यांनी यानंतर दुसर्‍या गड्यासाठी १४५ धावांची भागीदारी करत आयर्लंडच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली. आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतकाकडे वाटचाल करत असलेल्या रॉयचा त्रिफळा उडवून थॉम्पसनने आयर्लंडला दुसरे यश मिळवून दिले. या विकेटनंतर इंग्लंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. नाईट वॉचमन लिच याला वैयक्तिक ९२ धावांवर बाद करत मुर्ताने संघाला तिसरी विकेट प्राप्त करून दिली. रसेल, हेमिंग, लारवूड व ट्युडर यांच्यानंतर नव्वदीत बाद होणारा तो इंग्लंडचा चौथा नाईटवॉचमन ठरला. १ बाद १७१ अशा भक्कम स्थितीतून इंग्लंडची ५ बाद १९४ अशी घसरगुंडी उडाली. यानंतरचे पुढील तीन गडीदेखील फारसे योगदान न देऊ शकल्याने यजमान संघ ८ बाद २४८ अशा स्थितीत सापडला होता. सॅम करन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी नवव्या गड्यासाठी ४५ धावांची मौल्यवान भागीदारी करत संघाला सुस्थितीत आणले. सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक असून इंग्लंडची आघाडी २०० पेक्षा कमी ठेवल्यास नवखा आयर्लंडचा संघ धक्कादायक निकालाची नोंद करू शकतो. अंधुक प्रकाशामुळे काल केवळ ७६.४ षटकांचा खेळ झाला.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद ८५
आयर्लंड पहिला डाव ः सर्वबाद २०७, इंग्लंड दुसरा डाव ः जॅक लिच झे. अडेर गो. मुर्ता ९२, रॉरी बर्न्स झे. विल्सन गो. रँकिन ६, जेसन रॉय त्रि. गो. थॉम्पसन ७२, ज्यो डेन्ली धावबाद १०, ज्यो रुट झे. विल्सन गो. अडेर ३१, जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. अडेर ०, मोईन अली झे. विल्सन गो. रँकिन ९, ख्रिस वोक्स झे. बालबिर्नी गो. अडेर १३, सॅम करन झे. मॅक्कोलम गो. थॉम्पसन ३७, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद २१, ओली स्टोन नाबाद ०, अवांतर १२, एकूण ७७.४ षटकांत ९ बाद ३०३
गोलंदाजी ः टिम मुर्ता १८-३-५२-१, मार्क अडेर २०-७-६६-३, बॉईड रँकिन १७-१-८६-२, स्टुअर्ट थॉम्पसन १२.४-०-४४-२, अँडी मॅकब्रिन १०-१-४७-०