इंग्लंड संघात सात नवे चेहरे

0
128

>> आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा

आयर्लंडविरुद्ध साऊथहॅम्पटन येथे होणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने २४ सदस्यीय संघ काल गुरुवारी जाहीर केला. ऑईन मॉर्गन याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत हे तीन सामने खेळेल.

वेस्ट इंडीज व पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेसाठी केवळ एका आठवड्याचा कालावधी असल्याने ज्यो रुट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मार्क वूड, ख्रिस वोक्स व जोफ्रा आर्चर यांना वनडे मालिकेत खेळता येणार नाही. कसोटी मालिकेसाठीचा राखीव खेळाजू साकिब मेहमूद, जॉनी बॅअरस्टोव व मोईन अली यांना दुसर्‍या ‘बायो सेक्युअर बबल’मध्ये हलविण्यात येणार आहे. मागील वर्षी विश्‍वचषक जिंकलेल्या संघतील आठ खेळाडूंचा या संघात समावेश असून सात खेळाडूंनी अजून इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही प्रकारात प्रतिनिधित्व केलेले नाही. एकही सामना न खेळलेल्यांमध्ये हेन्री ब्रूक्स, ब्रायडन कार्स, रिचर्ड ग्लीसन व टॉम हेल्म या जलदगती चौकडीचा समावेश आहे. रिस टॉपली याने २०१६च्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत अखेरच्या वेळी इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.

अन्य एक डावखुरा जलद मध्यमगती गोलंदाज डेव्हिड विली यालादेखील स्थान मिळाले आहे. फिल सॉल्ट, लॉरी इव्हान्स व सॅम हेन या तीन स्पेशालिस्ट फलंदाजांचा संघात समावेश आहे. हेन याच्या नावावर वॉर्विकशायर व इंग्लंड लायन्सकडून खेळताना ‘अ’ दर्जाच्या ५८ सामन्यांत ५९.७८च्या सरासरीने धावांची नोंद आहे. इंग्लंड संघात ज्यो रुट याच्या जागेचा तो प्रबळ दावेदार आहे.

दुखापतीमुळे पॅट ब्राऊन (पाठ), डेव्हिड मलान (पोटरी) व ख्रिस जॉर्डन (हात) यांचा विचार करण्यात आला नसल्याचे निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ यांनी सांगितले आहे. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड कसोटी संघासोबत राहणार असल्यामुळे दुसर्‍या बायो बबलमुळे वेगळ्या साहाय्यक पथकाची निवड करण्यात आली असून वनडे संघाचे हंगामी प्रशिक्षकपद पॉल कॉलिंगवूड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मार्कस ट्रेस्टोथिक व १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक जॉन लुईस त्यांचे साहाय्यक असतील. डरहॅमचे माजी मुख्य प्रशिक्षक व नुकतेच श्रीलंका संघातोबत काम केलेले जॉन लुईस, नील किलेन, क्लाऊड हँडरसन यांचा साहाय्यक पथकात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचा २४ सदस्यीय संघ ः ऑईन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बॅअरस्टोव, टॉम बँटन, सॅम बिलिंग्स, हेन्री ब्रूक्स, ब्रायडन कार्स, टॉम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, लॉरी इव्हान्स, रिचर्ड ग्लीसन, लुईस ग्रेगरी, सॅम हेन, टॉम हेल्म, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब मेहमूद, मॅथ्यू पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रिस टॉपली, जेम्स व्हिन्स व डेव्हिड विली.