इंग्लंड संघात विली, टॉपलीचे पुनरागमन

0
128

>> आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका

आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने काल सोमवारी आपला १४ सदस्यीय संघ जाहीर केला. डावखुरा मध्यमगती गोलंदाज रिस टॉपली तब्बल ४ वर्षांनंतर संघात परतला आहे. गुरुवारपासून सुरू होणार्‍या या मालिकेसाठी संघाचे नेतृत्व ऑईन मॉर्गन करणार आहे. उपकर्णधारपद मोईन अली याच्याकडे सोपविण्यात आले आहे. मालिकेतील दुसरा सामना १ ऑगस्ट रोजी व तिसरा सामना ४ ऑगस्ट रोजी होईल.

प्रमुख संघासोबतच तीन राखीव खेळाडूंचीदेखील निवड करण्यात आली आहे. २६ वर्षीय टॉपली याच्या नावावर १० एकदिवसीय सामन्यांत १६ बळींची नोंद आहे. २०१६ साली झालेल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत त्याने अखेरच्या वेळी इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होेते. यानंतर पाठदुखीमुळे क्रिकेटपासून त्याला दूर रहावे लागले होते. २०१८ साली त्याच्यावर शस्त्रक्रियादेेेखील झाली आहे. मागील वर्षी झालेल्या ब्लास्ट स्पर्धेत ससेक्सकडून सर्वाधिक बळी घेत त्याने लक्ष वेधून घेतले होते.

जैव सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांविना होणार्‍या या मालिकेसाठी सॅम बिलिंग्स, लियाम डॉसन व डेव्हिड विली यांनी देखील पुनरागमन केले आहे. बिलिंग्स तब्बल दोन वर्षांनंतर खेळणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला विश्‍वचषक स्पर्धेत खेळता आले नव्हते. दुसरीकडे विली याच्या जागी जोफ्रा आर्चर याला इंग्लंडने विश्‍वचषकासाठी पसंती दिली होती. रिचर्ड ग्लीसन, लुईस ग्रेगरी व लियाम लिव्हिंगस्टोन या नवोदितांना राखीव खेळाडूंत स्थान मिळाले आहे.

इंग्लंड एकदिवसीय संघ ः ऑईन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बॅअरस्टोव, टॉम बँटन, सॅम बिलिंग्स, टॉम करन, लियाम डॉसन, ज्यो डेन्ली, साकिब महमूद, आदिल रशीद, जेसन रॉय, रिस टॉपली, जेम्स व्हिन्स व डेव्हिड विली.

वर्ल्डकप सुपर लीगला सुरुवात
या मालिकेद्वारे वर्ल्डकप सुपर लीगला प्रारंभ होणार आहे. आयसीसी क्रमवारीतील आघाडीचे १२ व नेदरलँडस् असे १३ देश या स्पर्धेचा भाग आहेत. आयसीसी वर्ल्ड क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ ही स्पर्धा जिंकून नेदरलँडस्‌चा संघ यापूर्वीच वर्ल्डकप २०२३ साठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ मायदेशात व विदेशात ३ सामन्यांच्या प्रत्येकी चार मालिका खेळणार आहे. यजमान असल्याने भारत या विश्‍वचषकासाठी थेट पात्र ठरला आहे. त्यामुळे उर्वरित सात जागांसाठी ही स्पर्धा असेल. विजयासाठी १०, बरोबरीसाठी ५ गुण मिळणार आहेत. सामना रद्द झाल्यास, पूर्ण होऊ न शकल्यास किंवा पराभवासाठी एकही गुण दिला जाणार नाही. सुपर लीगद्वारे पात्र ठरण्यास अपयशी ठरलेले पाच संघ पाच सहयोगी देशांसह ‘वर्ल्डकप क्वॉलिफायर २०२३’ ही स्पर्धा खेळतील. यातील केवळ दोनच संघ वर्ल्डकपसाठी पात्र होतील.