इंग्लंड पराभवाच्या दारात

0
55

इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकून ‘ऍशेस’ मालिका आपल्या खिशात घालण्याच्या उंबरठ्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. पहिल्या डावाच्या आधारे २५९ धावांची आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी इंग्लंडची दुसर्‍या डावात ४ बाद १३२ अशी दयनीय स्थिती केली आहे.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४०३ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने काल आपला पहिला डाव ९ बाद ६६२ धावांवर घोषित केला. तिसर्‍या दिवशी २२९ धावांवर नाबाद राहिलेल्या स्टीव स्मिथने काल आपल्या धावसंख्येत अजून दहा धावांची भर घातली तर शॉन मार्श (१८१) त्याच धावसंख्येवर बाद झाला.
टिम पेन (नाबाद ४९) व पॅट कमिन्स (४१) यांच्या जोरावर चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला डाव लांबविण्याचे काम केले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ११६ धावांत ४, क्रेग ओव्हर्टनने ११० धावांत २, मोईन अलीने १२० धावांत १ व ख्रिस वोक्सने १२८ धावांत १ गडी बाद केला. पहिल्या डावाप्रमाणे दुसर्‍या डावातही इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मार्क स्टोनमन (३), ऍलिस्टर कूक (१४) व ज्यो रुट (१४) यांनी निराशा केली. संघाच्या साठ धावा फलकावर लागेपर्यंत हे त्रिकुट माघारी परतले होते.
जेम्स व्हिन्स (५५) व डेव्हिड मलान (नाबाद २८) यांनी चौथ्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी रचली. संघाचे शतक नुकतेच पूर्ण झालेले असताना स्टार्कने व्हिन्सचा त्रिफळा उडविला. अखेरच्या सत्रात पावसाच्या आगमनामुळे सुमारे दीड तासाचा खेळ वाया गेला. आज देखील पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला वरुणराजाला साकडे घालावे लागणार आहे.