इंग्लंड उपांत्य फेरीत

0
128

इंग्लंडने माजी विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजचा ४६ धावांनी पराभव करत महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळविले. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले १४४ धावांचे लक्ष्य विंडीजला पेलविले नाही. त्यांचा डाव १७.१ षटकांत ९७ धावांत संपला. या पराभवासह विंडीजला स्पर्धेेबाहेरचा रस्ता धरावा लागला आहे.
टॅमी ब्युमॉंट भोपळाही न फोडता बाद झाल्यानंतर डॅनी वायट व नॅट सिवर यांनी दुसर्‍या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी स्थिरावतेय असे वाटत असतानाच मोहम्मदने वायटला बाद केले. सिवरने अधिक धोका न पत्करता चेंडूगणिक धावा केल्या. आपल्या ५७ धावांमध्ये तिने ६ चौकार ठोकले. यष्टिरक्षक फलंदाज एमी जोन्सने १३ चेंडूंत नाबाद २३ व कॅथरिन ब्रंटने केवळ ४ चेंडूंत नाबाद १० धावा केल्याने इंग्लंडला निर्धारित २० षटकांत ५ बाद १४३ धावांपर्यंत पोहोचता आले.

धावांचा पाठलाग करण्यास उतरताना विंडीजने सलामी जोडीमध्ये बदल करताना डिअँड्रा डॉटिनला सलामीला उतरवले. ९ चेंडूंत ९ धावा करत ती बाद झाली. हेली मॅथ्यूजला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. २२ चेंडूंत केवळ १० धावा करून तिने तंबूची वाट धरली. गंभीर दुखापतीमुळे कर्णधार स्टेफानी टेलरला मैदान सोडावे लागले. धाव घेताना ती नॉन स्ट्राईकर एंडवर कोसळली. तिच्या पायाचा स्नायू तुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आली. यावेळी विंडीजचा संघ १ बाद ४१ अशा सुस्थितीत होता. काही वेळातच संघाची ४ बाद ४२ अशी दयनीय स्थिती झाली. डावखुरी फिरकीपटू सोफी एकलस्टनने ३.१ षटकांत केवळ ७ धावा देत ३ बळी घेतले. कूपर (१५), कर्बी (२०) व एलिन (१०) यांनी दुहेरी धावसंख्या गाठली. परंतु, यानंतरही विंडीजचा संघ शतकी वेस ओलांडू शकला नाही. इंग्लंडकडून एकलस्टन व्यतिरिक्त सारा ग्लेनने २, मॅडी व्हिलियर्स व ऍन्या श्रबसोल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.