इंग्लंड अंतिम सोळा संघात दाखल

0
124

इंग्लंडने अटीतटीच्या लढतीत मेक्सिकोचा ३-२ असा पराभव करत फिफा अंडर १७ फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. ‘एफ’ गटातील हा सामना विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगणावर काल बुधवारी झाला. सलामीच्या लढतीत चिलीवर ४-० असा विशाल विजय मिळविलेला दोनवेळचा अंडर १७ विश्‍वविजेता इंग्लंडचा संघ ३-० असा आघाडीवर होता. परंतु, दिएगो लायनेझ याने सात मिनिटांत दोन गोल नोंदवून रंगत निर्माण केली.

पहिल्या सत्रातील एकमेव गोल रियान ब्रिवस्टर याने ३९व्या मिनिटाला नोंदविला. २५ यार्ड अंतरावरून त्याने मारलेली फ्री किक मेक्सिकन बचावफळी भेदण्यात पुरेशी ठरली. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत लिव्हरपूलच्या या स्ट्रायकरने खुली गोलसंधी वाया घालवली होती. त्यामुळे त्याच्यावर दबाव होता. मध्यंतरानंतर ४८व्या मिनिटाला जेडन सांचो याच्या पासवर फिलिप फोदेन याने बॉक्सबाहेरून गोलजाळीचा अचूक वेध घेतला. मेक्सिकोचा कर्णधार कार्लोस रोबल्स याने आपल्याच बॉक्समध्ये चेंडू अवैधरित्या हाताळल्यामुळे मिळालेल्या पेनल्टीवर सांचोने गोल करत इंग्लंडची आघाडी ३-० अशी फुगवली. दिएगो लायनेझ पहिल्या गोलच्या बाबतीत सुदैवी ठरला. ६५व्या मिनिटाला त्याने लगावलेला फटका जोएल लाटीबिडिएरे याला चाटून गोलजाळीत विसावल्याने मेक्सिकोला आघाडी कमी करता आली. ७२व्या मिनिटाला गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. खेळाडूंचा योग्य अंदाज घेत डाव्या पायाने त्याने लगावलेला क्रॉस इंग्लंडचा गोलरक्षक कर्टीस अँडरसनला चकवून गोलजाळीत विसावला.

अंतिम क्षणात कोलकामधील प्रेक्षकांनी मेक्सिकोच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या नावाचा घोष सुरू केला. यामुळे त्यांच्या खेळाडूंना स्फुरण चढले. रॉबर्टो दी ला रोसा याने इंग्लंडचा बचावाला खिंडार पाडत गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने लगावलेला हेडर क्रॉसबारवरून गेल्याने मेक्सिकोला बरोबरी साधणे शक्य झाले नाही. इंग्लंडचा शेवटचा गट सामना इराकशी होणार आहे. तर मेक्सिकोला चिलीशी दोन हात करावे लागतील.