इंग्लंडने वनडे मालिका ४-० अशी जिंकली

0
118

>> पाचव्या लढतीत पाकिस्तानवर ५४ धावांनी मात

जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गेन यांची दमदार अर्धशतके आणि ख्रिस वोक्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानवर ५४ धावांनी मात करीत पाच सामन्यांची वनडे मालिका ४-० अशी एकतर्फी जिंकली. ५ बळी मिळविलेल्या ख्रिस वोक्सची सामनावीर तर जेसन रॉयची मालिकावीर पुरस्कारसाठी निवड झाली.
इंग्लंडकडून मिळलेल्या ३५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४६.५ षट्कांत २९७ धावांवर गारद झाला. कर्णधार सर्फराज अहमदचे शतक केवळ ३ धावांनी हुकले. ७ चौकार व २ षट्‌कारांनिशी ८० चेंडूत ९७ धावांची खेळी केलेल्या सर्फराजने बाबर आझमच्या साथीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. बाबर ९ चौकार व १ षट्‌कारासह ८३ चेंडूत ८० धावांची खेळी करून धावचित झाला. इमाद वसिमने २५, मोहम्मद हसनैनने २८, आसिफ अलीने २२ धावांचे योगदान दिले. इंग्लंडतर्फे भेदक मारा करताना ख्रिस वोक्सने ५४ धावांत ५ तर आदिल रशिदने ५४ धावांत २ व डेव्हिड विलीने ५५ धावांत १ गडी बाद केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ९ गडी गमावत ३५१ अशी विशाल धावसंख्या उभारली. जेम्स विन्सने (३३) जॉनी बेअरस्टॉ (३२)च्या साथीत६३ धावांची सलामी दिली. त्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गेन यांनी तिसर्‍या विकेटसाठी ११७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत संघाला दोनशेच्या पार नेले. दोघांनीही दमदार अर्धशतकी खेळी केल्या. रूटने ९ चौकारांसह ७३ चेंडूत ८४ तर मॉर्गेनने ४ चौकार व ५ षट्‌कारांसह ७६ धावांची कर्णधारी खेळी केली.
जोस बटलरने ३४, बेन स्टोक्सने २१ तर टॉम कुर्रनने नाबाद २९ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानतर्फे शाहीन शाह आफ्रिदीने ४, इमाद वसिमने ३ तर हसन अली व मोहम्मद हुसेनने प्रत्येकी १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड, ५० षट्‌कांत ९ बाद ३५१, (जो रुट ८४, इयॉन मॉर्गेन ७६, जोस बटलर ३४, जेम विन्स ३३, जॉनी बेअरस्टॉ ३२, टॉम कुर्रन नाबाद २९, डेव्हिड विली ३४, ख्रिस वोक्स १३ धावा. शाहीन शाह आफ्रिदी ४-८२, इमाद वसिम ३-५३, हसन अली १-७०, मोहम्मद हसन १-६७ बळी) विजयी विरुद्ध पाकिस्तान, ४६.५ षट्‌कांत सर्वबाद २९७, (बाबर आझम ८०, सर्फराज अहमद ९७, इमाद वसिम २५, आसिफ अली २२, मोहम्मद हसन २८, शाहीन शाह आफ्रिदी नाबाद १९, हसन अली ११ धावा. ख्रिस वोक्स ५-५४, आदिल रशिद २-५४, डेव्हिड विली १-५५ बळी)