इंग्लंडची पकड ढिली

0
155

न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने आपला दुसरा डाव ९ बाद ३५२ धावांवर घोषित करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३८२ धावांचे लक्ष्य ठेवले. लेथम व रावल या किवी सलामीवीरांनी २३ षटके खेळून काढत ४२ धावा फलकावर लगावल्या असून इंग्लंडला बळी मिळविण्यात अपयश आल्याने सामना अनिर्णित राहण्याची शक्यता वाढली आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३०७ धावा केल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव २७८ धावांत संपला होता.

काल सामन्याच्या चौथ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे २५ पेक्षा जास्त षटकांचा खेळ वाया गेला. यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांचे फावले. त्यांनी इंग्लंडला यशापासून वंचित ठेवत त्यांचा घामटा काढला. तत्पूर्वी, तिसर्‍या दिवसअखेरच्या ३ बाद २०२ धावांवरून काल पुढे खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांनी समयोचित फलंदाजी केली. कर्णधार ज्यो रुटने ५४ धावा करत आपले ३९वे कसोटी अर्धशतक झळकावले तर डेव्हिड मलानने ५३ धावांचे योगदान देताना आपले सहावे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनीदेखील उपयुक्त धावा जमवत आघाडी फुगवण्याचे काम केले. न्यूझीलंडकडून मध्यमगती गोलंदाज कॉलिन डी ग्रँडहोमने ९४ धावांत ४ गडी बाद केले. डावखुर्‍या नील वॅगनर व ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ तर टिम साऊथीने १ गडी बाद केला. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लेथम (नाबाद २५) व जीत रावल (नाबाद १७) खेळपट्टीवर आहेत.