इंग्लंडकडून वेस्ट इंडीजचा फडशा

0
82

>> ज्यो रुटची अष्टपैलू चमक

>> आर्चर, वूडने टिपले तीन बळी

माजी कर्णधार ज्यो रुट याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने काल शुक्रवारी झालेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील १९व्या सामन्यात वेस्ट इंडीजचा ८ गडी व १०१ चेंडू राखून पराभव केला. विंडीजने विजयासाठी ठेवलेले २१३ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडने ३३.१ षटकांत गाठले. सलामीवीर रुटने सलामीला येत आपले सोळावे एकदिवसीय शतक झळकावले तसेच गोलंदाजीत दोन बळीदेखील घेतले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय इंग्लंडच्या वेगवान मार्‍याने सार्थ ठरवला. ख्रिस वोक्सने सुरुवातीलाच एविन लुईसचा वैयक्तिक २ धावांवर त्रिफळा उडवला. ख्रिस गेल व शेय होप यांनी दुसर्‍या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. लियाम प्लंकेटने गेलचा अडसर दूर करत संघाला दुसरे यश मिळवून दिले. गेल याने आश्वासक खेळ करत ५ चौकार आणि १ षटकार खेचताना ३६ धावा केल्या. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शेय होप याला वूडच्या वेगाने चकवा दिला. मैदानी पंच कुमार धर्मसेना यांनी पायचीतचे अपील फेटाळल्यानंतर इंग्लंडने रिव्ह्यूचा वापर करत त्याला बाद केले. होपने ११ धावा जमवल्या. विंडीजचा संघ यावेळी ३ बाद ५५ असा संकटात सापडला होता. निकोलस पूरन व शिमरॉन हेटमायर या डावखुर्‍या दुकलीने यानंतर संघाचा कोसळता डोलारा सावरला. या द्वयीने चौथ्या गड्यासाठी ८९ धावा रचल्या.

निकोलस पूरनने आपले पहिलेवहिले वनडे अर्धशतक ठोकताना त्याने ७८ चेंडूत ६३ धावांची खेळी साकारली. हेटमायर-पूरन जोडी धोकादायक ठरत असतानाच इंग्लंडच्या कर्णधाराने हेटमायरची फिरकी ही कमकुवत बाजू हेरताना कामचलाऊ फिरकीपटू ज्यो रुटकडे चेंडू सोपविला. रुटने भागीदारी फोडण्याचे काम करत हेटमायरचा स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेतला. रुटने याच पद्धतीने जेसन होल्डरलाही वैयक्तिक ९ धावांवर बाद केले. आंद्रे रसेलने २ षटकार आणि १ चौकार खेचत १६ चेंडूत २१ धावांची फटकेबाज खेळी केली. पण मोठी खेळी करण्यात त्यालाही अपयश आले. तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. इंग्लंडकडून मार्क वूडने १८ धावांत ३ तर आर्चरने ३० धावांत ३ बळी घेतले. ज्यो रुटने २ तर वोक्स आणि प्लंकेटने १ प्रत्येकी १ बळी घेतला.

धावफलक
वेस्ट इंडीज ः ख्रिस गेल झे. बॅअरस्टोव गो. प्लंकेट ३६, इविन लुईस त्रि. गो. वोक्स २, शेय होप पायचीत गो. वूड ११, निकोलस पूरन झे. बटलर गो. आर्चर ६३, शिमरॉन हेटमायर झे. व गो. रुट ३९, जेसन होल्डर झे. व गो. रुट ९, आंद्रे रसेल झे. वोक्स गो. वूड २१, कार्लोस ब्रेथवेट झे. बटलर गो. आर्चर १४, शेल्डन कॉटरेल पायचीत गो. आर्चर ०, ओशेन थॉमस नाबाद ०, शेन्नन गेब्रियल त्रि. गो. वूड ०, अवांतर १७, एकूण ४४.४ षटकांत सर्वबाद २१२

गोलंदाजी ः ख्रिस वोक्स ५-२-१६-१, जोफ्रा आर्चर ९-१-३०-३, लियाम प्लंकेट ५-०-३०-१, मार्क वूड ६.४-०-१८-३, बेन स्टोक्स ४-०-२५-०, आदिल रशीद १०-०-६१-०, ज्यो रुट ५-०-२७-२
इंग्लंड ः जॉनी बॅअरस्टोव झे. ब्रेथवेट गो. गेब्रियल ४५, ज्यो रुट नाबाद १००, ख्रिस वोक्स झे. ऍलन गो. गेब्रियल ४०, बेन स्टोक्स नाबाद १०, अवांतर १८, एकूण ३३.१ षटकांत २ बाद २१३
गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ३-०-१७-०, ओशेन थॉमस ६-०-४३-०, शेन्नन गेब्रियल ७-०-४९-२, आंद्रे रसेल २-०-१४-०, जेसन होल्डर ५.१-०-३१-०, कार्लोस ब्रेथवेट ५-०-३५-०, ख्रिस गेल ५-०-२२-०

गेलने टाकले संगकाराला मागे
इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये विंडीजच्या ख्रिस गेलने अव्वल स्थान मिळविले आहे. कालच्या ३६ धावांच्या खेळी दरम्यान त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकारा याला मागे टाकले. गेलने ३६ सामन्यांत १६३२ धावा केल्या आहेत. संगकाराच्या नावावर ४४ सामन्यांत १६२५ धावांची नोंद आहे.

रॉय, मॉर्गनला दुखापत
विंडीजची फलंदाजी सुरू असताना चेंडूचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयची ‘हॅमस्ट्रिंग’ दुखावल्याने त्याला डावातील आठव्या षटकात मैदान सोडावे लागले. उर्वरित लढतीत त्याने क्षेत्ररक्षण केले नाही. मैदानावरील अनुपस्थितीमुळे त्याला इंग्लंडच्या डावाची सुरुवातही करता आली नाही. विंडीजच्या डावातील चाळीस षटके झालेली असताना कर्णधार मॉर्गनने पाठदुखीमुळे मैदान सोडले. दोघांच्या दुखापतीची गंभीरतेबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.