आाफ्रिकेने केली कांगारूंची शिकार

0
61
South African team celebrates winning the fifth Test cricket match between South Africa and Australia and the Test Series against Australia for the first time since re admission at Wanderers cricket ground on April 3, 2018 in Johannesburg. / AFP PHOTO / GIANLUIGI GUERCIA

>> चौथा कसोटी सामना ४९२ धावांनी जिंकला

न्यू वॉंडरर्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कांगारूंवर ४९२ धावांनी मोठा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने कांगारूंना विजयासाठी ६१२ धावांचे डोंगराएवढे आव्हान दिले होते. मंगळवारी पाचव्या दिवशी आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजीपुढे कांगारूंचे फलंदाज तग धरू शकले आणि त्यांचा संपूर्ण डाव फक्त ११९ धावांमध्ये आटोपला. या विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय मिळवला. फिलेंडरला सामनावीर तर रबाडाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती ३ बाद ८८ अशी होती. पण फिलेंडरच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांची ९ बाद १०१ अशी दयनीय अवस्था झाली. पाचव्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर फिलेंडरने शॉन मार्शला माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. रबाडा व मॉर्कल पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर दबाव होता. फिलेंडरने पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

४८ वर्षांनी लोळवले
दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर खेळताना तब्बल ४८ वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा मालिका पराभव केला आहे. यापूर्वी १९६९-७० ला आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया ४-० असा धुव्वा उडवला होता. तर १९६६-६७ ला झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय मिळवला होता.

चौथा सर्वांत मोठा विजय
दक्षिण आफ्रिकेने कांगारुंचा ४९२ धावांनी पराभव केला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत हा चौथा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी इंग्लंडने १९२८ला ऑस्ट्रेलियावर ६७५ धावांनी विजय मिळवला होता. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांच्या विजयाचा विक्रम अद्यापही इंग्लंडच्या नावावर असून गेल्या ९० वर्षापासून अबाधित आहे.

धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ४८८, ऑस्ट्रेलिया पहिला डाव २२१, दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ः ६ बाद ३४४ घोषित
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः (३ बाद ८८ वरून) ः पीटर हँड्‌सकोंब त्रि. गो. फिलेंडर २४, शॉन मार्श झे. बवुमा गो. फिलंेंडर ७, मिचेल मार्श झे. डी कॉक गो. फिलेंडर ०, टिम पेन झे. डी कॉक गो. फिलेंडर ७, पॅट कमिन्स त्रि. गो. फिलेंडर १, नॅथन लायन धावबाद ९, चाड सेयर्स झे. एल्गार गो. फिलेंडर ०, जोश हेझलवूड नाबाद ९, अवांतर ८, एकूण ४६.४ षटकांत सर्वबाद ११९
गोलंदाजी ः कगिसो रबाडा ८-३-१६-०, व्हर्नोन फिलेंडर १३-५-२१-६, केशव महाराज १३-२-४७-१, मॉर्ने मॉर्कल १०.४-५-२८-२, ऐडन मारक्रम २-०-६-०

फिलेंडरचे २०० बळी पूर्ण
व्हर्नोन फिलेंडरने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा काल ओलांडला. त्याच्या नावावर ५४ कसोटींत २०४ बळींची नोंद झाली आहे. २१.४६च्या सरासरीने त्याने हे बळी घेतले आहेत. डावात पाच बळी घेण्याची कामगिरी त्याने १३वेळा केली आहे. कसोटींत २०० पेक्षा जास्त बळी घेणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला. शॉन पोलॉक (४२१), डेल स्टेन (४१९), मखाया एन्टिनी (३९०), ऍलन डोनाल्ड (३३०), मॉर्ने मॉर्कल (३०९), जॅक कॅलिस (२९१) यांनी द. आफ्रिकेकडून दोनशेपेक्षा जास्त बळी घेतले आहे.