आहुती स्मृति-सुमनांची!!

0
116
  • श्रीकृष्ण दामोदर केळकर

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक, राज्य पुरस्कार प्राप्त स्वातंत्र्य सैनिक व राज्य पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट कीर्तनकार दामोदर श्रीपाद केळकर स्मरणार्थ आज शिवस्मृती संकुल, साखळी येथे दोन दिवशीय कीर्तन व संगीत संमेलन आयोजित केले आहे. त्यांच्या अप्रकाशित ‘तुळाभार’ या चरित्रात्मक कादंबरीचे काही अंश…….

राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. पटवर्धनबुवा म्हापशाला कीर्तनज्ञानयज्ञासाठी आले होते. ओजस्वी वाणी, राष्ट्रीय महापुरुषांची आख्याने, मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व यामुळे अल्पावधीतच गोव्यात अतिशय लोकप्रिय झाले. सुब्राय नाटेकर नावाच्या सद्गृहस्थांनी ‘राममंदिर’ नावाचे सभागृह बांधले होते. तिथे त्यांच्या कीर्तनांना अलोट गर्दी व्हायची. त्यांची ती अमोघ वाणी, हातवारे करून वक्तृत्व करण्याची शैली, पोवाडे, ओव्या यांची भरपूर रेलचेल यामुळे बाबांना कीर्तने करण्याचा ध्यास लागला. त्याच ऊर्मीतून बाबांनी डॉ. पटवर्धन यांच्या पायांना हात लावून – चहा, विडी, सिगारेट, तंबाखू, दारू वगैरे कोणतेही व्यसन करणार नाही, समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी आजन्म झटेन… अशी भीष्मप्रतिज्ञा घेतली. त्या काळी घेतलेली प्रतिज्ञा जीवनाच्या शेवटपर्यंत पाळली. धन्य ते गुरु, धन्य ते शिष्य. ते अफाट जनसमुदायाला वीरश्रीने सांगत, ‘आपल्या मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करा, स्वातंत्र्यासाठी लढा’.. असा उपदेश करीत. जणुकाही या उपदेशांमधूनच बाबांच्या स्वातंत्र्यसैनिकाचा आणि कीर्तनकलेचा पाया रचला गेला असावा.

पुढील काही वर्षांत बाबा त्यांच्या साथसंगतीत राहिल्यानंतर डॉ. पटवर्धनबुवांच्या अनेक गुणांची पारख त्यांना झाली. त्यांच्यामधील कित्येक चांगले गुण आत्मसात करून आपल्या भावी कारकिर्दीची यशोमेढ त्यांनी रोवली. शिस्त, वक्तशीरपणा, निर्व्यसनीपणा, सेवाभावी वृत्ती, सचोटी, साधेपणा यांसारखे अनेक अलौकिक गुण आत्मसात केले.

एकदा वेळगावच्या वास्तव्यात डॉक्टरांच्या मनात एके दिवशी काय आले कुणास ठाऊक. कीर्तनसप्ताह झाल्यानंतर बाबांच्या पाठीवरून डोक्यावरून मायेने हात फिरवीत म्हणाले, ‘‘तुझे ५ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. आणखी शिक्षण घेऊन मॅट्रीक हो व नंतर माझ्याकडे ये.’’
वास्तविक डॉक्टर इंग्रजी शिक्षणाविरुद्ध. त्यांनी आपल्या मुलालासुद्धा इंग्रजी शिकविले नव्हते. पण बाबांच्या भाषेत सांगायचे तर, ‘‘ज्या शिक्षकी क्षेत्रात मी नावलौकिक मिळवला त्याचाच पाया डॉक्टर पटवर्धनांनी घातला असावा’’.

बेळगावहून बाबा परत गोव्याला आले. जूनमध्ये ६ वीत दाखल झाले. त्याच दरम्यान राम मनोहर लोहियांनी गोमंतकात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. शेकडो तरुण त्यात सामील झाले. मनात स्वातंत्र्याचा निखारा होताच. त्यावर लोहियांनी जोरदार फुंकर मारली. बाबांकडे उपजतच नेतृत्वगुण होते. वक्तृत्वात तर बाबांचा हातखंडा. सगळा तरुणवर्ग पोर्तुगीज सरकारविरुद्ध काम करायचा- दूरदूरच्या गावांमध्ये भित्तीपत्रके लावणे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची गावांमधून व्यवस्था करणे, लोकांना जमा करून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करून घेणे. आपली गोमंतभूमी मुक्त झाली पाहिजे या एकाच ध्यासापोटी पोर्तुगीज सरकारविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते सर्व काम हजारो तरुण कार्यकर्ते त्यावेळी करीत होते. दिवसा हायस्कूलमध्ये अभ्यास व रात्र झाली की स्वातंत्र्यसैनिकांच्या मावळ्यांबरोबर रात्रभर संचार. तहानभूक विसरून… रात्री तर कधी जेवलेच नसणार… स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपलाही काही खारीचा वाटा असावा!!
उपजतच वक्तृत्वाची देणगी असल्याने जमावासमोर भाषण करून ज्येष्ठांची वाहव्वा मिळवीत. त्यामुळे त्यांना अनेक सहकारी मिळाले. डॉ. गणबा दुभाषी, ऍड. पांडुरंग मुळगावकर, ऍड. गोपाळ कामत अशा अनेक प्रभृतींच्या खालोखाल बाबा स्वातंत्र्ययुद्धात उतरले.

२८ ऑक्टोबर १९४६ हा अभूतपूर्व असा भाग्याचा दिवस उजाडला. हा दिवस बाबांच्या शब्दात- ‘‘कधी एकदा हा दिवस येतो असे आमच्या सर्वच मित्रांना वाटत होते. त्यासाठी आम्ही जवळजवळ १०-१५ दिवस भरपूर प्रयत्न करीत होतो. पंचक्रोशीतल्या सगळ्याच गावांनी- पर्रा, हडफडे, बस्तोडा, मयडे, बागोवा अशा अनेक गावांतील लोक तहान-भूक विसरून पत्रके लावीत होतो, घराघरांमध्ये देत होतो. आम्ही सगळेच रोमांचित होतो. कधीतरी उत्तररात्री घरी आलो. सकाळी लवकरच जाग आली. थोडासा व्यायाम करून शाळेत गेलो. नंतर दुपारी घरी येऊन, दोन घास कसेबसे तोंडात कोंबून तडक दत्तवाडीला स्मशानभूमीजवळ गेलो. माझ्या अगोदरच १०-१५ मित्र आलेले होते. थोड्या थोड्या वेळाने अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, युवक येऊ लागले. सगळ्यांच्या हातात झेंडे, फलक होते. हळुहळू बरीच संख्या वाढली. सगळ्यांसमोर जाऊन भाषण केले. सगळेजण बरेच प्रभावित झाले. दोन-तीन ज्येष्ठांनी पाठ थोपटली. सगळ्यांचे ध्येय एकच. प्राणप्रिय गोमंतकातून जुलमी, अत्याचारी धर्मांध पोर्तुगीजांची हकालपट्टी. मग हळुहळू हा भव्य मोर्चा कोर्टाकडून खाली येत तिथल्या छोट्या रस्त्याने अलंकार थिएटरकडे येऊन मुख्य रस्त्याने परत वर आलो. आवेशपूर्ण घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून जात होता. आमच्या एवढ्या दिवसांच्या प्रयत्नांना खरे स्वरूप आले. एवढे भव्य स्वरूप, उत्साही मर्दानी घोषणा पाहून निश्‍चितपणे पोर्तुगीज पोर्तुगालला पळून जातील. जमलेल्या नागरिकांना… आमच्यात सामील व्हा… असा संदेश देत होतो. एवढ्यात कोठूनतरी काळेकभिन्न आणि पांढरेशुभ्र पोलीस आले आणि आमच्यावर जोरदार लाठीहल्ला करायला सुरवात केली. आमच्या हातातील झेंडे काढून बेदम मारहाण करण्यात आली. मी अग्रेसर असल्याने मला खूपच बदडण्यात आले. पाय, कंबर, पाठ, डोकी काहीही शिल्लक ठेवले नाही. मी निपचित पडलेला असतानाच जीपमध्ये कोंबून चौकीवर नेले. परत जाग आल्यावर घोषणा दिली. आता मात्र ते जास्तच तुटून पडले. दुसर्‍या वर्षी आरोपपत्र ठेवून १ वर्ष सक्तमजुरी, दंड ठोकून रवानगी थेट रेईश मागूशच्या कैदखान्यात. सगळंच अतर्क्य!!

इकडे घरी सगळेच चिंतेत. त्यांनाही थोड्याच दिवसात कळले. एके दिवशी बाबा भेटायला आले. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. बाबांकडे पाहत मनमुराद रडलो. बाबा काहीही बोलले नाहीत. पण त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान प्रकर्षाने जाणवत होता. थोडा वेळ थांबले. मला धीर देऊन ते हळुहळू जायला निघाले. मी बराच वेळ त्यांच्या पाठमोर्‍या शरीराकडे पाहत हमसून हमसून रडत होतो… पण मला समजत नव्हते की भरपूर मार खाण्यामुळे माझे अंग दुखत होते म्हणून की बाबा माझ्यापासून दूर गेले म्हणून…’’

काही महिन्यांच्या सश्रम कारावासानंतर १६ जानेवारी १९४७ ला बाबांची सुटका झाली. बाबांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सगळ्यांनी खूप कौतुक केले.. एवढ्या लहान वयात एवढी परिपक्वता दाखवल्याबद्दल!
आता प्रश्‍न होता पुढील शिक्षणाचा. बाबा सत्याग्रही, म्हणून शाळेचे व्यवस्थापन शाळेत घ्यायला कां-कूं करत होते. बाबांपुढे यक्षप्रश्‍न उभा राहिला. परंतु निर्भिडांच्या, सत्याच्या पाठीशी देव सदैव उभा असतो. आपल्याला तो दिसत नाही, कारण आम्ही पाहतो त्याला निर्जीव मूर्तीत. देव नेहमी जिवमात्रांमध्येच असतो. फक्त त्याला ओळखण्याची ताकद आपल्यात हवी. त्याची प्रचिती आली. या कठीण समयी देव सजीव रुपाने आपल्या भक्ताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धावून आले.
वरील मजकूर हा माझ्या वडलांच्या ‘तुळाभार’ नावाच्या चरित्रात्मक कादंबरीमधील आहे. शनिवार दि. २३ व रविवार २४ रोजी साखळी येथे संमेलन आहे त्यानिमित्त ही आहुती सादर!!