आहारातील त्रिदोष-त्रिगुण विचार

0
493

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

आहार सेवन करताना फक्त प्रोटीन्स, फॅट्‌स, कॅलरीज, व्हिटामिन्स यांचाच विचार न करता आयुर्वेदाने सांगितलेल्या व्यापक दृष्टी ध्यानात ठेवून आहाराची निवड केल्यास हा आहार स्वास्थ्यरक्षणार्थ उपयोगी येईल. आहारामध्ये त्रिदोषांचा, त्रिगुणांचा, लोकपुरुष सिद्धांताचाही विचार व्हायला पाहिजे.

उत्तम आहार तोच ज्याने मनुष्य स्वस्थ राहील. शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच खर्‍या अर्थाने पूर्ण आरोग्य. उत्तम पोषण होण्यासाठी योग्य गुणकर्माचे प्राणिज व वनस्पतिज पदार्थांचे पुरेसे उत्पादन, त्यांची चांगली साठवण, योग्य वितरण आणि सर्वांना परवडेल अशा किमतीत हे पदार्थ घेणे शक्य झाले पाहिजे. अन्नामध्ये योग्य ती सर्व घटनद्रव्ये व क्षारपदार्थ शक्यतो नैसर्गिक स्वरूपात असावीत आणि ते वीर्यवान असावे. त्याचप्रमाणे त्याच कोणतीही भेसळ नसावी. आजकाल धान्यपिकांना भरपूर कृत्रिम खतं घालण्यात येतात, त्यावर कीटक व जंतुनाशकांचे रासायनिक फवारे मारण्यात येतात. तसेच धान्यदाणे मोठे व सुंदर दिसावेत म्हणून हायब्रीड धान्ये किंवा ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात पिकणारी धान्येही तयार केली जातात. हे सर्वच प्रकार अयोग्य आहेत.
हायब्रीड धान्ये आकृतीने त्याच प्रकारच्या नैसर्गिक धान्यांपेक्षा खूप मोठी असतात परंतु त्यांचे संहनन चांगले नसते. अशी धान्ये सेवन केल्याने शरीरातील सर्वच धातूंचे संहनन प्राकृत राहत नाही. हीच गोष्ट संकरित प्राण्यांबाबतही आहे. तसेच या प्रकारच्या धान्य सेवनाने शरीर गुबगुबीत-मोठे दिसते पण समसंहननयुक्त किंवा कणखर होत नाही. म्हणून अशी धान्ये सेवन करू नये.
अर्वाचीन वैद्यक व आहारशास्त्रज्ञांनी आहाराचा अनेक अंगोपांगांनी विचार मांडलेला आहे. त्यामध्ये आहारघटकांमधील उष्मांक व प्रॉक्झिमल प्रिन्सिपल्स (अत्यावश्यक घटक) या गोष्टींना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे.
प्रॉक्झिमल प्रिन्सिपल्स म्हणजे शरीरासाठी उपयुक्त ठरणारे प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजद्रव्ये व पाणी हे सहा घटक आहेत. हा दृष्टिकोन ध्यानात घेऊन त्यांनी प्रत्येक द्रव्याचे पृथक्करण करून
त्यामध्ये यांपैकी कोणकोणते घटक किती प्रमाणात मिळतात व ते द्रव्य शरीरात किती उष्मांक (कॅलरीज) निर्माण करते याची निश्‍चिती केली जाते व त्यानुसार कोणत्या प्रकारच्या द्रव्यांचे आहारात किती प्रमाण असावे, हे व्यक्तीचे वय, व्यवसाय इत्यादी. गोष्टींचा विचार ध्यानात घेऊन ठरविले जाते.
अशा प्रकारचे आहारीय द्रव्यांचे ज्ञान असणे हे निश्‍चितच उपयोगाचे आहे. मात्र असे असले तरी आयुर्वेदाने मांडलेल्या आहारद्रव्यांबाबतचा विचार लक्षात न घेता केवळ एवढाच आहार विचार लक्षात घेणे हे अपुरे आहे.

आयुर्वेदामध्ये द्रव्यांचा विचार करताना त्यामधील रस, वीर्य, विपाक, प्रभाव कोणते आहेत व त्यानुसार ते द्रव्य शरीरातील दोष, धातुमल या घटकांवर कोणते परिणाम करील याचा सूक्ष्म विचार केलेला आहे. औषधी द्रव्यांबरोबर आहारीय द्रव्यांचाही विचार याचप्रमाणे मांडलेला आहे. म्हणून फक्त प्रोटीन, व्हिटामिन्सवर अवलंबून न राहता आहारीय द्रव्यांचा या प्रकारेही विचार व्हायला पाहिजे. रक्तविपाक सिद्धांताबरोबर द्रव्यांमधील गुरू, लघू, स्निग्ध, रूक्ष आदी पंचभौतिक गुणानुसार शरीरातील विशिष्ट भावपदार्थांची वाढ किंवा र्‍हास कारणीभूत होत असतात. म्हणून आहारद्रव्यांचा विचार करताना गुणांचा विचारही दुर्लक्षून चालत नाही.
आहाराचा विचार करताना अमुक काम करणारी, अमुक वजनाची, अमुक वयाची म्हणजे तिला इतके उष्मांक व प्रॉक्झिमल प्रिन्सिपल्स असणारा आहार हवा असा केवळ ढोबळ विचार करून चालणार नाही. त्रिदोषांनुसार व्यक्तीमध्ये पडणारे प्रकृतीभेद, त्यानुसार असणारे अग्निबल तसेच देश व कालपरिणामांमुळे होणारा जठराग्नीमधील बदल, तसेच आजाराचे पचन झाले तरी आहाररसापासून विशिष्ट शरीरघटक बनविण्यासाठी लागणारे धात्वाग्नींचे बल याही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

तसेच व्यक्तिपरत्वे बदलणारे सात्म्यासात्म्यही विचारात घ्यावे लागते. या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार करूनच आयुर्वेदाने आहारासंबंधीचे विवेचन केले आहे. म्हणूनच आहार करताना आहारद्रव्यांमध्ये भूक वाढविणे, अन्न पचविणे, धात्वाग्नींचे कार्य वाढविणे, स्रोतसांचे कार्य सुधारणे यासाठी अन्नातील प्रमुख घटकांवर हिंग, तेल, मोहरी, धने, दालचिनी, लवंग, वेलदोडे इत्यादी अनेक औषधी द्रव्यांचा अंतर्भाव आहारद्रव्यांवर संस्कार करण्यासाठी करून घेतलेला आहे.

आहार – दोष – धातू – मल विचार ः-
आहार घटकांचे शरीर घटकांमध्ये रूपांतर होत असताना त्यातून दोष-धातू-मल या सर्वच भावपदार्थांची निर्मिती होत असते. विविध आहारघटक विशिष्ट दोषांची वाढ किंवा कमतरता निर्माण करत असतात. तसेच विशिष्ट आहारघटकांपासून विशिष्ट धातू प्रामुख्याने निर्माण होतात. काही घटक मलभागाचे पोषण करतात. मग अशावेळी आहार घटकांची निवड करताना दोष-धातू-मल क्षयवृद्धी लक्षात घेऊन त्यांचे सात्म्य प्रस्थापित होईल अशाच आहारघटकांची निवड करावी लागते. उदा.- तूर, मूग, उडीद यांमध्ये प्रथिने इत्यादी प्रॉक्झिमल प्रिन्सिपल्स जवळजवळ सारखीच असतात. परंतु तूर पित्तकर आहे, मूग फारसा कोणताच दोषप्रकोप करीत नाही व म्हणून पथ्यकर आहे, तर उडीद मलवर्धक, तसेच शुक्रधातूपर्यंत सर्वच धातूंची उत्पत्ती करण्याला समर्थ परंतु पचनाला अत्यंत जड आहे. म्हणजेच डाळी खाताना फक्त ‘प्रोटीन’ व्हॅल्यूचा विचार करणे उपयोगाचे नाही तर आपली प्रकृती, अग्निविचार, वय, पचनशक्ती, बल यांचा विचारही ध्यानात घ्यावा लागतो.
त्याचप्रमाणे ज्वारी, बाजरी, गहू यांच्याबाबतही तेच सांगता येईल. ज्वारी थंड परंतु पचनाला हलकी, गहूही थंड परंतु रक्त व मांसवर्धक व पचायला जड तर बाजरी हलकी परंतु उष्ण.

आहार-विचार
आहारीय द्रव्ये बाह्य सृष्टीत ज्या प्रकारचे अस्तित्व टिकवतात त्याचसारखे परिणाम ती शरीरावर करतात.
* वनस्पतीच्या उत्पत्तीपासून फळ व बीजनिर्मितीपर्यंतचा काळ अल्प असेल तर त्यापासून शरीरात उत्पन्न होणारे घटक अल्पकाळ टिकणारे व केवळ रसरक्तादी पूर्व धातूच उत्पन्न करणारे असतात.
* उदा. तृणधान्ये (नाचणी, वरी इत्यादी) लघू व अल्प पोषण करणारी तर गहू उत्तम पोषण करणारा आहे. अहळीव हे धान्य लवकर तयार होते परंतु त्याचबरोबर ते स्निग्ध मधुर असल्याने गरजेच्या वेळी (प्रसूतीनंतर) स्तन्यजनन करण्याला उत्तम आहे. मात्र रसाचा उपधातू स्तन्य निर्माण करण्यापलीकडे धातूत्पत्ती अहळीव करू शकत नाही.
* केळे हे फळ पिकू लागल्यानंतर दीर्घकाळ टिकू शकत नाही. ते लवकर खराब होऊ लागते. तसेच त्याची रचना विळविळीत, त्याचे झाडही फलोत्पत्तीनंतर नष्ट होते. त्यामुळे शरीरात ते मेदादी उत्तरधातू उत्पन्न करू शकत नाही.
* याउलट आंबा घ्या. त्याचा वृक्ष मोठा वाढतो. अनेक वर्षे कणखरपणे जगतो. फळाला चिवट साल, आत कठीण कवच, सघन गर, पिकू लागल्यापासून टिकण्याची क्षमता यामुळे तो मांसादी उत्तरधातूही उत्पन्न करू शकतो.
* सुकामेवा या सदरात मोडणारे बदाम, पिस्ते, अक्रोड इत्यादी फळे मोठ्या वृक्षांवर धरतात. कठीण कवचामध्ये बनतात. भरपूर स्निग्धांश त्यात असतात. त्यामुळे ती मज्जा शुक्रापर्यंतच्या धातूंचे पोषण करण्यास समर्थ असतात.
* मश्रुम ही क्षुद्र वनस्पती प्रथिनयुक्त आहे… म्हणून सध्या मोठा प्रचार चालू आहे. परंतु ती फळे, पाने, फुले इत्यादी विविधता न दाखवणारी, अल्पजीवी, क्षुद्र वनस्पती असल्याने शरीरात टिकाऊ धातू उत्पन्न करू शकतात का?
* मासे हेसुद्धा शेवाळासारखी क्षुद्र वनस्पती खाऊन जगणारे, खारट पाण्यात वाढल्याने ते स्रोतोरोध, क्लेद उत्पन्न करणारे आहेत.
शरीरघटकांबरोबर आहारद्रव्ये मनावरही परिणाम करीत असतात व त्यादृष्टीने आहार व त्रिगुणविचारही महत्त्वाचा ठरतो.
आहार व त्रिगुणविचार
सात्त्विक आहार –
आयुष्य, मनोधैर्य, बल, आरोग्य, सुख व प्रीती यांची वाढ करणारी रसाळ, स्निग्ध, स्थिर, मनाला आल्हाद देणारा, सौम्य, फारसा तिखट, आंबट, खारट नसणारा आणि अल्प मधुररस प्रधान आहार हा सात्त्विक आहार होय. गायीचे दूध, कंदमुळं, फळं, शाकाहार हा सात्त्विक आहार आहे.
राजस आहार –
अतितिखट, खारट, तळलेला, अतिगरम, तीक्ष्ण, रूक्ष, विदाही, पित्तवर्धक असा आहार राजस आहे. त्याने रोग उद्भवतात.
तामस आहार –
मांसाहार, शिळे अन्न, आंबू लागलेले, सडू लागलेले अन्न, संधानक्रिया होणारे मद्यासारखे पदार्थ, अस्वच्छ, बुद्धिमांद्य आणणारे अन्न हे तामस आहे. त्याने बुद्धीची विवेकशक्ती नष्ट होते.
म्हणूनच आहार सेवन करताना फक्त प्रोटीन्स, फॅट्‌स, कॅलरीज, व्हिटामिन्स यांचाच विचार न करता आयुर्वेदाने सांगितलेल्या व्यापक दृष्टी ध्यानात ठेवून आहाराची निवड केल्यास हा आहार स्वास्थ्यरक्षणार्थ उपयोगी येईल. आहारामध्ये त्रिदोषांचा, त्रिगुणांचा, लोकपुरुष सिद्धांताचाही विचार व्हायला पाहिजे.