आसामात पोलीस गोळीबारात ३ ठार

0
114

>> नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला असून यात ३ जण ठार झाले आहेत. गुवाहाटी क्लबच्या बाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली असून आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करतानाच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी तीन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

आसाममध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून काल गुरूवारी दुसर्‍या दिवशीही तणाव होता. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करत या विधेयकाला विरोध दर्शविला. तसेच काहींनी भाजपचे आमदार विनोद हजारिका यांचे घर पेटवून दिले. तसेच तसेच त्यांच्या इमारतीखाली असलेल्या वाहनांनाही आगी लावून देण्यात आल्या. गुवाहाटी क्लबच्या बाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करतानाच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण आसाममध्ये अजूनही तणावाची स्थिती आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही आंदोलकांनी आंदोलन केले. काही ठिकाणी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करणार्‍या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तरीही आंदोलकांनी ठिकठिकाणी जाळपोळ सुरूच ठेवली आहे. अनेक ठिकाणी दुकाने आणि इमारतीत घुसून तोडफोड केली.