आषाढी एकादशीची वारी धन्य जाहली पंढरपूरी…!

0
322

रमेश सावईकर

श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीत त्यांचे गोजिरे-साजिरे रुप पाहून, देव-भक्त भेटीचा आनंद लुटत धन्य-धन्य होऊन जातात. सुखमय, आनंदी जीवन जगण्याची नवी उर्मी, उमेद, सामर्थ्य हा साक्षात्कारी अनुभवांतून भक्तांना प्राप्त होतो. पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊन भक्तांचे नैराश्य लोप पावते. पापाचे क्षालन होते आणि या वारीसेवेच्या व्रत आचरणांतून मोक्ष प्राप्ती मिळेल, असा दृढ श्रद्धाभाव भक्तांचे ठायी

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यांतील सोलापूर जिल्ह्यांत भीमातीरी वसलेल्या पंढरपूर नगरी वार्षिक जत्रा भरते. श्री विठ्ठलाचे भक्त आणि उपासक लाखोंच्या संख्येने पंढरपूरची वारी करतात. संतांच्या पालख्या घेऊन हजारो दिंड्यांसहित भक्तांची जनसागर पंढरपूरला लोटतो.
आषाढी एकादशीला पंढरपूरी जाऊन भक्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन पावन-धन्य होतो. आषाढ महिना सुरू झाला की, भक्तांना वारीला जाण्याची तळमळ लागते. कधी एकदा विठ्ठलाचे दर्शन घेतो असे होते. मनाची इच्छा, जिवाची तगमग पुढील शब्दांत व्यक्त करतात.
‘भेटी लागे जीवा, लागलीसे आस’
पंढरपूर नगरी भीमा नदीच्या तीरावर वसली आहे. येथे भीमाचा प्रवाह चंद्रकोरीसारखा असल्याने तिला ‘चंद्रभागा’ म्हणून संबोधले जाते. भीमा आणि चंद्रभागा, तिच्या चरणासी गंगा अशी महती संत नामदेव व्यक्त करताना म्हणतात.
‘जेव्हा नव्हती गोदा-गंगा| तेव्हा होती चंद्रभागा॥
चंद्रभागेची तटी| धन्य पंढरी गोमटी॥
पंडरहे हे पंढरपूरचे मूळ कानडी नाव आहे. याच नावावरून पांडुरंग क्षेत्र, पांडुरंगपूर व पंढरपूर ही क्षेत्रनामे आली. या तीर्थक्षेत्रांची महती फार मोठी आहे. त्याचा अनुभव घेऊन श्रीविठ्ठलाशी एकरूप झालेले संत नामदेव म्हणतात,
‘पृथ्वीवरी तीर्थ आहेत अपारा
परी पंढरीची सर एका नाही॥
आधी रचिली पंढरी
मग वैकुंठ नगरी॥
जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे तो विठ्ठल. संत ज्ञानेश्‍वरांनी ‘कानडाऊ विठ्ठले’ असे म्हटले आहे. तर संत एकनाथ,
‘तीर्थ कानडे, देव कानडे,
क्षेत्र कानडे पंढरीये|’
असा पंढरीचा नामोल्लेख करताना म्हणतात,
अठ्ठावीस युगे विठ्ठल पंढरपूरी वीटेवर उभा आहे. वैकुंठीचा देव विष्णू पितृभक्त पुंडलिका भेटी पंढरपूरा आला, त्यावेळी पुंडलिकाने त्याच्यासाठी वीट भिरकावून दिली. त्या विटेवर देव विष्णू म्हणजेच विठ्ठल कटी कर ठेवून उभा आहे.
‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा’ असा अनुभव संतांना आला. म्हणूनच संत तुकाराम
‘धन्य पुंडलिका बहु बरे केले|
निधान आणिले पंढरीये॥ असे म्हणतात.
पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरी देवाचे दर्शन घेण्याअगोदर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील ‘नामदेवांची पायरी’ ही त्यांची समाधी म्हणून ओळखली जाते.
वारकरी संप्रदाय हा विठ्ठलभक्त पुंडलिकाने स्थानप केला असावा. वैष्णव भक्तांना वारकरी म्हणून ओळखले जात असताना सहा ते दहाव्या शतकापर्यंत शैव भक्त दक्षिण भारतात होऊन गेला. पंढरी हे वारकर्‍यांचे भक्तीपीठ आणि संतांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. संत ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी वैष्णव-शैव असा भेदाभाद मानला नाही. इ.स.च्या बाराव्या शतकात वारकरी पंथात शैवांना सामावून घेण्यात आले. भागवत धर्माचा प्रचार-प्रचाराच्या कार्यात संतांनी झोकून दिले. ज्ञानदेवांनी या धर्माचा पाया रचिला. एकनाथांनी त्यावरती मंदिर उभारले तर संत तुकारामांनी भागवत धर्माच्या मंदिरावर कळस चढविला. म्हणूनच ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस|’ असे म्हटले आहे.
आषाढी-कार्तिकी एकादशींना पंढरपूरची वारी करण्याची परंपरा पुंडलिकाने सुरू केली. वारकरी पंथ मूळातच भेदातीत आहे. वैष्णव आणि शैव हे दोन्ही पंथ एकरुप झाले. संत ज्ञानेश्‍वरांनी एका ओवीत, ‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा’ असे म्हटले आहे.
वारकरी भक्त जसे विठ्ठलाच्या-पांडुरंगाच्या दर्शनासाठी अपेक्षा न ठेवता देव त्याला भेटतो. ‘ऐसी चाल नाही कोठे| नमस्कारा आधी भेटे’ असा अनुभव संत नामदेव विषद करतात.
वारकरी पंथाने देव आणि भक्त यांच्यात सौहार्द स्थापन केले. साधकाला स्वावलंबी करणारा हा पंथ आहे. हा पंथ संतांना देवापेक्षाही श्रेष्ठ मानतो. कारण ते चालते, बोलते समाजात राहणारे देवच असतात.
‘ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले|
उद्धरावया आलें दीन जगा॥
अशा शब्दांत संत नामदेवांनी संतांचा गौरव केला आहे.
‘संतापायी माथा धरिता सद्भावे|
तेणे भेटे देव आपोआप|’
असेही एका अभंगात नामदेव म्हणतात. वारकरी पंथाने आपला आचारधर्म सर्वजन सुलभ आमि सुटसुटित ठेवला आहे. ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती या चार परमार्थ-मार्गांपैकी भक्तीचा मार्ग त्यांनी निवडला आहे. वारकरी पंथाची बाह्याचार निरपेक्ष दृष्टीच त्यातून व्यक्त होते.
आषाढी एकादशीला देव विष्णू शयनी शेष फण्यावर विसावतो. त्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो. म्हणूनच या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्तिकी एकादशीला श्रीविष्णू निद्रेतून जाग येऊन तो पुनश्‍च कार्यमग्न होतो. म्हणून दरवर्षी पंढरपूरची वारी करून या तीर्थक्षेत्री श्री विठ्ठलाचे म्हणा किंवा श्री पांडुरंगाचे म्हणा दर्शन घेऊन वारकरी भक्तांचे मन तृप्त होते. तो स्वतःला धन्य समजतो. देव-भक्त यांच्यामध्ये एकचित्र-एकभाव निर्माण होऊन भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या भक्तांना समाधीचा अनुभव प्राप्त होतो. पंढरपूर नगरी, विठ्ठलाच्या भक्तीसंगे विठ्ठलमय होऊन जातो.
‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल|
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल॥
अशा श्रद्धाभावाचे विहंगम दृष्य मन्‌चक्षूंना अनुभवास येते. विठ्ठलभक्तीसाठी आपले जीवन वेचणार्‍या संत नामदेवांना अवघ्या ब्रह्मांडाचे दर्शन पंढरपूरीत झाले. वारकरी आणि भक्तजन आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने पंढरपूरी एकत्र येतात. या यात्रेत विविध पंथीय भक्त-भाविक असतात. देवभक्ती, मानवता, समता, बंधुभाव आदी सद्गुणांचे मनोज्ञ दर्शन याठिकाणी अनुभवाला येते. शेकडो पालख्या येथे येतात. हजारो दिंड्यांसह वारकरी, हरिदास, भक्त भजन-किर्तनात दंग होऊन देहभान विसरून जातात. श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीत त्यांचे गोजिरे-साजिरे रुप पाहून, देव-भक्त भेटीचा आनंद लुटत धन्य-धन्य होऊन जातात. सुखमय, आनंदी जीवन जगण्याची नवी उर्मी, उमेद, सामर्थ्य हा साक्षात्कारी अनुभवांतून भक्तांना प्राप्त होतो. पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊन भक्तांचे नैराश्य लोप पावते. पापाचे क्षालन होते आणि या वारीसेवेच्या व्रत आचरणांतून मोक्ष प्राप्ती मिळेल, असा दृढ श्रद्धाभाव भक्तांचे ठायी निर्माण होतो. संत नामदेव म्हणतात,
‘विष्णूदास नामा म्हणे, एकवेळ पंढरीये जाणे|
विठ्ठल धन्यावरी पाहणे| नाही येणे संसारा॥
असा पंढरपूर यात्रेचा अगाध महिमा संतांनी सांगितलेला आहे.