आव्हान पेलताना

0
75

गोव्याच्या राजकीय क्षितिजावरून मनोहर पर्रीकर हे वादळी व्यक्तिमत्त्व तूर्त तरी नजरेआड झाले आहे आणि आता ती महाकाय पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान नवे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पेलावे लागणार आहे. पार्सेकर हेही एक अनुभवी व ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणातील खाचखळगे त्यांनाही ठाऊक आहेत. त्यामुळे विद्यमान राजकीय परिस्थितीचे पूर्ण भान त्यांना आहे. त्यामुळे हे भान कायम राखत आणि सर्वांना एकत्र ठेवून, सोबत घेऊन त्यांना आपल्या सरकारचे गाडे हाकावे लागणार आहे. पर्रीकर यांनी आपल्या दमदार प्रशासकीय कौशल्याच्या बळावर संपूर्ण सरकारवर स्वतःची मुद्रा उमटवली होती. इतर मंत्र्यांना त्यात फारसा वाव नव्हता अशी तक्रारही त्यामुळे असे. पार्सेकर यांची कार्यशैली मात्र वेगळी असेल याचे संकेत त्यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या दिलेले आहेत. महत्त्वाचे निर्णय घेताना मंत्रिगटाशी सल्लामसलत करून सामूहिकपणे ते निर्णय घेतले जातील असे पार्सेकर म्हणाले आहेत. या अशा सामूहिक निर्णयप्रक्रियेचे जसे काही फायदे असतात तसे तोटेही. सर्वांशी चर्चा करून, विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतला जात असल्याने त्याचे अनेकविध पैलू आधीच नजरेस येत असतात आणि त्या निर्णयाची जबाबदारीही सर्वांवर येत असल्याने धुसफुशीला जागा उरत नाही. मात्र, अशा सामूहिक निर्णयप्रक्रियेमुळे मुख्यमंत्र्याचा आपल्या मंत्रिमंडळावरील वचक आणि प्रभाव कमी होण्याचाही धोका असतो. आपल्यावरील जबाबदारी इतरांवर ढकलल्यासारखे चित्र त्यातून निर्माण होऊ शकते. त्यामुळे या फायद्या – तोट्यांचा विचार नव्या मुख्यमंत्र्यांना करून आपली कार्यशैली घडवावी लागेल. एखाद्या मोठ्या वटवृक्षाला अचानक हटवल्यानंतर उघड्याबोडक्या पडलेल्या जागेवर पुन्हा सावली धरणे सोपे नसते. त्यासाठी ती उंची गाठणे जरूरीचे असते. पार्सेकर यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला ही अपेक्षित उंची मिळवून द्यावी लागेल. त्यांच्या पक्षाचे त्यांना पूर्ण समर्थन आहे ही जमेची बाब आहे. पण वादग्रस्त विषय हाताळताना आपल्या पक्षसंघटनेचे त्यासंबंधीचे निर्णय धसास लावण्यासाठी त्यांना आपल्या नेतृत्वक्षमतेचा कस लावावा लागेल. ज्यांनी त्यांच्या हाती कार्यभार सोपवला, ते केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पाठबळ त्यांना सदैव उपयोगी ठरणार आहे. पेचप्रसंगांच्या सोडवणुकीत असो, अथवा केंद्रात गोव्याची बाजू मांडून मोदी सरकारचे पाठबळ सरकारच्या मागे उभे करण्यात असो, पर्रीकर यांची मोठी मदत पार्सेकर यांना वेळोवेळी नक्कीच मिळेल. परंतु दैनंदिन राज्यकारभाराकडे पर्रीकर लक्ष देतील अशी अपेक्षा बाळगता येत नाही आणि त्यांना तशी गरज भासणे हे नूतन मुख्यमंत्र्यांचे अपयश मानले जाईल. त्यामुळे दैनंदिन निर्णय नूतन मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या प्रज्ञेने व स्वतःच्या जबाबदारीवर घेणे हे नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधोरेखित करण्यासाठी अधिक आवश्यक असेल. तेवढी कुवत व नेतृत्वक्षमता निश्‍चितपणे पार्सेकर यांच्यामध्ये आहे. राज्याची बिकट आर्थिक परिस्थिती, खाण प्रश्न, मोपा विमानतळ, प्रादेशिक आराखडा, असे अनेक प्रश्न समोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यांना आत्मविश्वासपूर्वक सामोरे जात पर्रीकरांसारखाच अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे. पर्रीकरांनी घेतलेले अनेक निर्णय त्यांना बाह्य दबावांपोटी फिरवावे लागले. त्यावर ‘यू टर्न’ अशी टीका होत राहिली, तरीही या निर्णयांची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली होती. आपल्याजवळ पर्रीकर यांच्याएवढी बुद्धिमत्ता नसेल, परंतु अभ्यास करून आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपण काम करीन असे पार्सेकर यांनी सांगितले आहे. हीच नम्र वृत्ती त्यांच्या यापुढील कारकिर्दीत दिसावी अशी अपेक्षा आहे. एका अनपेक्षित क्षणी त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आलेली आहे. या संधीचे सोने करून दाखवायचे आता त्यांच्याच हाती आहे. गोव्याच्या जनतेला एक चांगले भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे आहे. गेल्या निवडणुकीवेळी जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी बहुतेकांची पूर्तता पर्रीकर यांनी आपल्या गेल्या दोन वर्षांत केल्याने या सरकारप्रती जो विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपल्या कारकिर्दीची छाप उमटवण्यात पार्सेकर किती यशस्वी ठरतात हे येणारा काळच सांगू शकेल.