आव्हानं पेलताना…

0
198

म. कृ. पाटील (मुळगाव-अस्नोडा)

 

प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याच्या खरेदी मूल्यात ५ ते १०% वाढ होतेच. या सर्व खर्चाची आणि घरखर्चाची तोंडमिळवणी करताना पालकाची तारांबळ उडते. सर्वच मुलांचे पालक सधन असत नाहीत. साहित्य खरेदी करण्यात थोडी चालढकल होते. त्याचा परिणाम पाल्याच्या अभ्यासावर होईल म्हणून उधारीवर किंवा इतरांकडून उसनवारी करत पाल्याची मागणी पूर्ण करतात. आर्थिक आव्हान पेलताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

आपल्या मुलांच्या बाबतीत सगळेच पालक भावनाप्रधान आणि हळवे. आपल्या मुला विरोधात कोणत्याही सूचना ऐकण्यात त्यांच्या मनाची अजिबात तयारी नसते. आपले मूल लाखात एक असे सर्वगुणसंपन्न आहे, अशीच सर्व पालक वर्गाची समजूत आणि खात्री असते. यामध्ये गैरवाजवी असे काहीच नाही. मुलांच्या वर्तनाबद्दल कोणती तक्रार ऐकून घ्यायला पालक वर्ग तयार नसतो. मात्र आपल्या पाल्याच्या वर्तनाबद्दल ते ठामपणे बोलू शकतात. मुलाच्या शिक्षणासाठी हवे ते कष्ट, त्रास सोसायला आणि जिद्दीने मेहनत करायला एका पायावर तयार असतात. आपली मुलगी, मुलगा हुशार, चुणचुणीत हजरजबाबी, आज्ञाधारक आहे याची त्यांना खात्री असते. आपली मुलं (मुलगी/मुलगा) १४ विद्या आणि ६४ कलांमध्ये पारंगत, तरबेज व्हायला हवीत. कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य संपादनात सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम असावीत हाच ध्यास आणि अपेक्षा पालकांची असते. प्रत्येक कला-संगीत क्षेत्रात ती सर्वोच्च असावीत अशी मनोकामना असते. त्याकरिता कष्टाची तमा त्यांना नसते. उत्तुंग ध्येयासक्ती आणि कष्ट उचलण्याची तयारी, निश्‍चय, आत्मविश्‍वासानेच यशाचे शिखर पादाक्रांत करता येते. शिक्षणाने आपली मुलगी किंवा मुलगा सुसंस्कृत, सुजाण नागरिक व्हावा हीच त्यांची आंतरिक इच्छा, कामना अंतःकरणात विराजमान झालेली असते.
‘‘नेमेचि येतो मग पावसाळा
सृष्टीचे कौतुक जाण बाळा’’
या उक्तीप्रमाणे प्रतिवर्षी शालेय, शैक्षणिक वर्षाची सुरुवात, जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. परंतु पालकांच्या घरी मात्र येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ४/५ महिने अगोदरच म्हणजे जानेवारीतच होते. कोणत्या बालवाडीत, शिशुवर्गात, किंडरगार्डनमध्ये आपल्या ३ वर्षाच्या अपत्याची शिक्षणासाठी नावनोंदणी करावी याची चर्चा सुरू झालेली असते. नामांकित विद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळविण्याकरता अनेक खटपटी-लटपटी करत प्रवेश मिळविण्यासाठी पालक वर्ग धडपड करतो. त्याच विद्यालयात पाल्याचं विद्यार्जनाचं आव्हान स्वीकारतो. मग ते विद्यालय घरापासून जवळ आहे की दूर आहे याचा विचारही मनात नसतो. एकदा त्या विद्यालयाच्या शिशुवर्गात प्रवेश मिळाला म्हणजे पाल्याच्या १२वी पर्यंतच्या शिक्षणाची चिंता मिटली म्हणून निःश्‍वास सोडतो. या आव्हानाला कसे सामोरे गेलो त्याचे रसभरीत वर्णन मित्रांना, सहकार्‍यांना सांगताना त्याचा चेहरा आनंदाने खुलतो.
तदनंतर ही पालकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मुलांच्या जाण्यायेण्याची तजवीज करणे, शालेय डबा, गणवेश, पावसापासून संरक्षणाची सोय, छत्री इत्यादी वस्तू खरेदीची लगबग एप्रिल महिन्यात सुरू होते. शालेय वर्षाचा पहिला दिवस उगवला की पालक आपल्या लहान मुलाला झोपेतूनच उठवतात. आळस-जांभया देत मूल नाइलाजास्तव तयार होते. गणवेश घालतानाही मुलाला धरून अनेक अमिषे दाखवून तयार करताना आईवडिलांच्या नाकी नऊ येतात. कसेबसे मुलाला शाळेत नेले जाते. तेही त्याचा आईवडलांना सोडून शाळेच जायला नकार असतो. शालेय व्यवस्थापन नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करून, सर्वांचे हसत मुखाने स्वागत करतात. आपली मुले इथे आनंदी मनाने सुखरूप राहतील अशी हमी मिळताच पालकांची चिंता, काळजी, हूरहूर थोडीशी कमी होते. हर्षोल्लासात-नवोत्मेषात विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यावर, पहिल्याच दिवशी अत्यावश्यक वह्या, पुस्तके याची यादी पालकांच्या हाती सुपूर्द केली जाते.
एप्रिल/मे महिन्यातील सहली, लग्न समारंभ, नातेवाईकांच्या घरी जाणे-येणे, त्यामुळे पालकांवर आर्थिक भार झालेला असतो. तरीसुद्धा पाल्याच्या भवितव्याच्या विचाराने आर्थिक आव्हान पेलण्यास आनंदाने तयार होतो. सर्व वस्तू आपल्या पाल्याला मिळाल्याच पाहिजेत ही अहम्‌हमिकाही असते. शिशुमंदिरात जाणार्‍या मुलांची व पालकांची तारेवरची कसरत सुरू होते. शिशुवर्ग सकाळी ९ ते १२ या वेळेत भरतो. काही मुलांच्या मातोश्रीच मुलासोबत येतात. ९ ते १२ हे तीन तास शाळेच्या बाहेर बसून असतात. प्रत्येक शिशुमंदिराच्या बाहेर अशा २५/३० मातोश्री असतात. त्यांच्या बोलण्यात मुलेमुली, पती, सासुसासरे, महागाई, नातलग, शेजारी-पाजारी यांच्या बर्‍यावाईट चर्चा होतात. निष्फळ गप्पागोष्टींना दाद दिली जाते. प्रत्येक मातोश्रीचे कामाचे ती/चार तास वाया जातात, असे त्यांना न वाटता मुलांच्या भवितव्यासाठी तीन तास खर्ची घातल्याचे मानसिक समाधान लाभते. हेही एक प्रकारचे आव्हान आनंदाने स्वीकारतात. प्रत्येक माता आपल्या पाल्याचे गुणगान करताना कुठेही कमी पडत नाही. आजच्या वाढत्या महागाईवर तर जबरदस्त चर्चा होते. महागाईवर आपण कशाप्रकारे मात केली याचे आदान-प्रदान बरेच रंजक व खुमासदारपणे रंगवून सांगितले जाते. पाल्याच्या तीन वर्षापासून ते ९ वर्षांपर्यंत स्वतःला या आव्हानाला जखडून ठेवतात. मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक पालक स्वखुशीने आव्हान स्वीकारतो.

पाल्याच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे आव्हान…

‘‘चारित्र्य संवर्धन आणि संरक्षण हेच खरे शिक्षण’’ या संबंधी आपण निसर्गातील वृक्षाचे उदाहरण घेऊ. प्रत्येक झाडाची पानं आणि मूळं यांचा आंतरिक घनिष्ठ संबंध आहे. तोच संबंध चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्वाचा आहे. मानवाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्व बाह्य गोष्टी. दिसतो कसा, वागतो कसे, देहबोली कशी, काम करण्याची तत्परता आणि तादात्मता, बोलतो तसे वर्तन असते का? हा सर्व बाह्य पसारा म्हणजे वृक्षाची पानं! मानवी मनातील शांती, प्रेम, माया, आपुलकी, समाधान, संयम, सहभावना आणि संवेदना, विचारांची प्रगल्भता आणि सर्जनशीलता आदि गुण व्यक्तिमत्त्व ठरविण्यास कारणीभूत असतात. व्यक्तिमत्त्व म्हणजेच त्या व्यक्तीचा मूळ स्थायी स्वभाव. शिक्षण प्रक्रियेचा हेतूच विद्यार्थ्याचा (पाल्याचा) शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकास करणं हा आहे. पालकांना आणि अध्यापकांना हे आव्हान आणि दायित्व स्वीकारावेच लागते. मुलांचा आत्मविश्‍वास वाढवायला हवा. अंगी प्रगल्भता, संवेदना आणि सहभावना भिनायला हवी. मुलं स्वावलंबी, सर्जनशील व्हायला हवीत. याचे दायित्व स्वीकारायला हवे. त्याकरिता पालकांनी विशेष प्रयत्न, उपक्रम आणि संधी पाल्यांना प्राप्त करून द्यायला हवी. आपल्या पाल्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होण्याचे आव्हान स्वीकारावेच लागते.

बोलावे… परि जपून!

शिशू, किशोरवयीन मुलांची शब्दसंग्रह वाढविण्याची श्रवण आणि आकलन क्षमता अफाट असते. त्याच्या कानावर पडलेला नवनवीन शब्द, त्याचा मेंदू टिपकागदासम टिपून घेऊन संग्रहित करत असतो. घरी, विद्यालयात, बाजारी, शेजारी-पाजारी, रस्त्यावर येता जाता काही अपशब्द त्यांनी ऐकलेले असतात. त्यात त्या मुलांचा काही दोष नसतो. ते ऐकतात आणि मुळातच तो अपशब्द उच्चारण्यास योग्य की अयोग्य हेही माहीत नसते. कळत नकळत, अनावधानाने, उतावळेपणाने त्या अपशब्दाचा उपयोग करतात. मोठी माणसं, पालक जेव्हा आपल्या मुला-नातवंडांच्या तोंडी असे शब्द ऐकतात, तेव्हा हबकून जातात. पालकांच्या तळपायाची आग मस्तकी भिनते. मुलाने, पाल्याने अक्षम्य गुन्हा केला आहे असं समजून गहजब करतात. तो शब्द उच्चारायचा नाही अशी तंबी देतात. याचा परिणाम उलटा होतो. आपले काय चुकले हे न उमजल्याने, भोळ्याभाबड्या चेहर्‍याने भयचकित होऊन मुलं भोकाड पसरतात. अशावेळी पालकांनी अतिशय समंजसपणे, समयसूचकतेने परिस्थिती हाताळायला हवी. यापुढे असे शब्द मुलांच्या कानावर पडणार नाहीत याची खबरदारी घेणे म्हणजेच जपून व योग्य शब्दांचा वापर करण्याचे आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा हा पैलू आहे. तेव्हा बोला… पण जरा जपून हं! हे दायित्व आपण स्वखुशीने स्वीकारायला हवे. उद्भवलेल्या प्रसंगाला सुसंधीमध्ये परिवर्तीत करून आपल्या पाल्याचा सर्वांगीण आणि सर्वंकष विकास करावयाचा आहे. यामध्ये ‘शॉर्टकट’ला मुळीच वाव नाही. कष्ट, मेहनत व दक्ष असल्याचे फळ आपोआप गवसेल यावर आपला विश्‍वास असायला हवा. आपले मनोबल एकदा तयार झाले की कोणतेही कार्य आव्हानात्मक न वाटता सुसंधी मिळाल्याचा आनंद होईल. आपल्या निरागस भोळ्या-भाबड्या पाल्यांनी मोकळ्या निरभ्र आकाशात उत्तुंग भरारी मारण्यासाठी कष्ट, मेहनत, चिकाटी व जिद्दीने व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभूत तयारी करायलाच हवी. प्रगत समाजात गुणवत्ता सर्वोत्तम मानली जाते. सर्जनशीलता आणि गुणवत्तेच्या भक्कम पायाभूत आधारावरच क्षमताधिष्ठित व कौशल्याधिष्ठित शिखर गाठणे सहज शक्य होईल.

पाल्याच्या उतावळेपणावर – संयमाचा उपाय

एकविसाव्या शतकातील मुलांना धीर धरवत नाही. संयम आणि सबुरी तर मुळीच राखता येत नाही. पाल्याला काहीही हवं असेल तर त्याची पालकापाशी सतत भुणभुण सुरू असते. काळ-वेळ-जागा याचं भान नसल्यामुळं, आत्ता मला हवं, इथंच हवं हा हेका आणि रडणं सुरू असतं. घरीदारी, बाजारी, रस्त्यात, नातलगाच्या घरी, समारंभात पाल्याचा घोषा सुरू असतो- मला ती वस्तू आत्ता हवी आहे. पालकही संभ्रमात पडतात – आज असा का वागतो? पालकांची पंचाईत होते. रसभंग होतो. रागावता येत नाही. यामुळे पालक हतबल होतात. आपल्या लाडक्या मुलाला कसं शांत करायचं, हे आव्हान पेलताना तारांबळ उडते. मुलांच्या बालहट्टाची आणि हेकेखोरपणाची परिसीमा पाहताना, सारवासारव करत पांघरूण घालावे लागते. सुजाण पालक मुलावर न रागावता शांतपणे अत्यंत कौशल्याने ती परिस्थिती सांभाळतात.
एक पालक रोज कार्यालयात जात असत. आई किंवा बाबा केव्हा येतात आणि मला माझा आवडता खाऊ किंवा वस्तू केव्हा मिळते.. याची चातकासम मुले वाट पाहतात. पालक रोज खाऊचे पाकिट घेऊन येतात आणि पाल्याच्या हातात देताना सांगतात, ‘‘हा खाऊ स्वयंपाकघरातील कपाटात नीट जपून ठेव. उद्या सकाळी खा. खाताना इतरांनाही थोडा थोडा द्यायला विसरू नकोस’’. मुलगा आज्ञाधारक होता. त्याने त्याप्रमाणे केले. पालकांनी मायेने जवळ घेत कुरवाळले. या घटनेतून उतावळेपणावर संयम, धीर धरायला शिकविले. घरामध्ये मुले कधी कधी- मी हे करणार, मला करायला दे.. असे सारखे म्हणत असतात. पण त्याकडे सतत दुर्लक्ष केले जाते. पालकांनी आपल्या देखरेखीखाली कोणतेही कार्य करण्यास न रागावता मदत करावी. अनुभवाधारित शिक्षण मुलांच्या मेंदू विकासासाठी पोषक आणि अत्यावश्यक असतं. आपल्या आईवडिलांसारखं काम करता येतं असा आत्मविश्‍वास निर्माण होतो. मुलांचा मेंदू सतत अनुभवाच्या शोधात असतो. ती एका ठिकाणी स्वस्थ न बसता काही ना काही करत असतात. ते फक्त अनुभव मिळविण्यासाठी.. याचे भान पालकांनी अवश्य ठेवावे.

भ्रमणध्वनीपासून अलिप्त ठेवण्याचं आव्हान

आजच्या विज्ञान तंत्रज्ञान माहिती युगात प्रत्येक पालकाकडे उच्च दर्जाचा स्पर्श-भ्रमणध्वनी आहे. त्याची क्षणोक्षणी गरज, आवश्यकता वाढता-वाढता वाढतच आहे. पालकांना भ्रमणध्वनीशिवाय करमत नाही… हे पाल्यांनी दिवस-रात्र पाहिले आहे. पालकांना विनंती करूनच मुले पालकांच्या भ्रमणध्वनिवर विविध प्रकारचे खेळ डाऊनलोड करायला सांगतात. मुलांचा हट्ट आणि हेका पाहून पालकही तसे करतात. या माहिती युगातील मुले अत्यंत तल्लख, चलाख आणि चंचल झालेली आहेत. अभ्यासात ती एकाग्र होत नाहीत पण भ्रमणध्वनिवर खेळताना तहान-भूक विसरतात. स्थळ-काळाचेही त्यांना भान असत नाही. हाक मारली तरी त्यांना ती ऐकू जात नाही. अशी परिस्थिती घरोघरी आहे. वडलांनी किंवा आईने ऍप्स डाऊनलोड करताना त्यांनी पाहिलेले असते. भ्रमणध्वनी वापरण्याचे तंत्र आणि कौशल्य त्यांनी आत्मसात केलेले आहे. पालकांपेक्षाही जास्त कौशल्याने भ्रमणध्वनी मुले हाताळतात. त्यांची एकाग्रता आणि आकलनक्षमता वाखाणण्यासारखी असते. याचे कौतुक करावे तितके थोडेच. याच एकाग्रतेचा आणि आकलनक्षमतेचा उपयोग अभ्यासात करावा ही अपेक्षा पालकांची असते. याकरिता खेळातून शिक्षणावर आधारित अनेक ऍप्स आहेत. ते डाऊनलोड करून पाल्यासमवेत पालकांनी खेळावे. खेळताना त्या त्या विषयातील खेळाबद्दल प्रश्‍न विचारून त्याची चौकस वृत्ती, जिज्ञासा, कुतुहल जागृत करावे. जिज्ञासा, कुतुहल वृत्तींचा विकास होईल आणि भ्रमणध्वनीवरील खेळाऐवजी अभ्यासातील रुची, आवड वाढविण्यासाठी प्रयत्न जरूर करण्याचे आव्हान स्वीकारावे.
१०/१२ वर्षांच्या मुलांना आज वेगाचे फारच कौतुक वाटते. त्याकरिता ती दुचाकी वाहनासाठी हट्ट करतात. पालकही त्यांचा हट्ट पुरवतात. दुचाकी चालवायला शिकला तर बरीच मदत होईल. पण याचा विपरीत परिणाम होताना दिसून येतो. वेगावर नियंत्रण ठेवण्याचे भान मुलांना येत नाही. पौगंडावस्थेतील मुलांना दुसर्‍यांवर इम्प्रेशन मारण्याकरता दुचाकी हवी असते. खरंच दुचाकीची गरज आहे का याची शहानिशा करावी. कारण आजकाल दुचाकी चालविणार्‍यांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शाळा, विद्यालयात दुचाकी व भ्रमणध्वनी न्यायला मनाई आहे. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधून योग्य तो निर्णय घ्यावा. पण वेगावर नियंत्रण, मोटार वाहन कायद्याचे पालन करण्याची समज द्यावी.

शैक्षणिक आर्थिक भार पेलताना…

महागाईचे थैमान सर्वच क्षेत्रात चालू आहे. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रही येते. बालवाडी, शिशुमंदिर, किंडरगार्डनमध्ये शिकणार्‍या मुलांच्यावर मे/जून महिन्यात कमीत कमी अडीच ते तीन हजार खर्च करावे लागतात. काही शिशुमंदिरातील फी कमी तर काहीमध्ये भरमसाठ मासिक फी असते. या व्यतिरिक्तही अनेक माध्यमातून पालकांकडून रक्कम घेतात. त्याशिवाय ठराविक पद्धतीच्या वह्या, पाठ्यपुस्तके, वर्कबुक इत्यादीवरचा खर्च असतोच. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत आहे. पाठ्यपुस्तके शासन पुरविते परंतु प्रत्येक विषयासाठी ३/४ वह्या घेणे क्रमप्राप्त असते. अकरावीत प्रवेश घेतलेल्या एका मुलाला शालेय फी, वह्या, रेनकोट/छत्री, गणवेशाकरिता रु.५०००/- करावेच लागतात. त्याशिवाय पालकांना आपल्या पाल्याला दररोज पॉकेटमनी द्यावाच लागतो. प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याच्या खरेदी मूल्यात ५ ते १०% वाढ होतेच. या सर्व खर्चाची आणि घरखर्चाची तोंडमिळवणी करताना पालकाची तारांबळ उडते. सर्वच मुलांचे पालक सधन असत नाहीत. साहित्य खरेदी करण्यात थोडी चालढकल होते. त्याचा परिणाम पाल्याच्या अभ्यासावर होईल म्हणून उधारीवर किंवा इतरांकडून उसनवारी करत पाल्याची मागणी पूर्ण करतात. आर्थिक आव्हान पेलताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागते.