आवाज ऽऽ!

0
171

– शैला राव, फोंडा
‘ममाई ऽ ऽ ऽ सिंपली वंडरफूल! आजचा बँड सूपर्ब! तू असतीस ना तिथं, तर तुला देखील…’ आमचा कैवल्य रात्री दहाला घरात शिरता शिरता माझ्याकडे पाहत तारस्वरात आपला आनंद व्यक्त करीत म्हणाला. दमयंतीने मुलाला दटावीत म्हटले, ‘अरे! किती मोठ्याने बोलतोयस्! शेजारच्यांना सुद्धा दचकायला होईल. आणि काय रे…’ तिच्या पुढच्या बोलण्याची कल्पना येऊन मी म्हटले, ‘तुझा बँड तुलाच लखलाभ होवो. आताशा तुझ्या एकट्याचा आवाजदेखील सहन होत नाही मला.’
अजूनही बँडच्या धुंदीत असलेल्या कैवल्याचा बाहेरचा आवाज कानठळ्या बसवणारा असला तरी त्याचा आतला आवाज तोंडावर आलेल्या बोर्डाच्या परीक्षेची आठवण करून देत असणार. तो लगेच तेथून सटकला.उघडलेल्या दाराला कडी लावताना दमयंती म्हणाली, ‘आई, तुम्हालाच नाही आम्हालादेखील मोठ्या आवाजातलं बोलणं ऐकवत नाही. पण आताशा जेवढा मोठा आवाज तेवढं बोलणं पटवल्यासारखं वाटतं काहींना!’
दमयंतीचं म्हणणं बरोबर असावं. मुलीचा वाढदिवस. त्याला इव्हेंट मॅनेजर, कर्कश आवाजातलं पार्श्‍व संगीत आणि त्याहून वरच्या पट्टीतलं त्या इव्हेंट मॅनेजरचं खेळ समजावून देणं! कार्यक्रम मुलांचा म्हटल्यानंतर त्यांच्या नाचगाण्याला ऊत आला होता. शुभेच्छा-भेट देण्यासाठीसुद्धा जवळ जाववत नव्हतं.
नंतर काही दिवसांनी भेटलो तेव्हा वाढदिवस धूमधडाक्यात झाल्याची चर्चा रंगवून-रंगवून सांगितली जात होती.
टीव्हीवरच्या मालिका आणि चित्रपटातील पार्श्‍वसंगीत वाजवीपेक्षा मोेठ्या आवाजात दिल्याने आणि प्रत्यक्ष घटना, बोलणे व्हायच्या जरा आधीच दिल्याने परिणाम सुरस होण्याऐवजी विरसच होतो.
‘हा आवाज कुणाचा?’ असे कानीकपाळी ओरडत निवडणुकीचा प्रचार चालतो तो आताशा बर्‍याच प्रमाणात कमी करायला लागला असला तरी त्या ‘गर्जना’ आणि ‘डरकाळ्या’नी कानातले पडदे फाटताहेत की काय असे वाटून या डरकाळ्या पुढे वल्गनाच ठरल्या की आतल्या आत कुठेतरी हायसं वाटतं.
छोट्या गावातील लोकनृत्याच्या वेळी लावलेला, घरगुती होत असलेल्या सत्यनारायणाच्या पूजेच्या कथेसाठी लावलेलं ध्वनिक्षेपक त्याच जागी असलेल्या लोकांना पुण्य देतो पण पन्नास मीटर अंतरावरच्या लोकांना डोकेदुखी देतो.
विशिष्ट दिवशी पहाटे काकड आरतीपासून रात्री शेजारतीपर्यंत कोणकोणत्या भक्तांच्या नावाने भक्तिगीतांच्या कॅसेट्‌स लावायच्या अर्थातच ध्वनिक्षेपकावर! का तर, ही एक प्रकारची देवाची सेवा! देवाधर्माचा प्रश्‍न आला की भावना संवेदनशील झाल्याच म्हणून समजा.
राजाश्रयाने चालणार्‍या तथाकथित मनोरंजन-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रात्री ध्वनिक्षेपक वापरायची वेळेची मर्यादा या ना त्या निमित्ताने वाढवत जाऊ दिली आहे. पोलीसच जिथे खिशात हात घालून स्वस्थ पाहत उभे राहतात तिथे ज्येष्ठ नागरिक – आजारी माणसांनी अस्वस्थ होऊन काय उपयोग?
‘स्वरनाद’ या शाळेत जाणार्‍या मुलांच्या पालकांना त्या मुलांच्या कानावर आवाज पडायला हवा, आवाजातले चढ-उतार ओळखता यावेत म्हणून आवाजाची ओळख करून द्यायला सांगतात. आमच्यासारख्यांना आवाज असह्य होतो आहे हे पटवून न देता आल्याने मूकपणे सगळे खपवून घ्यावे लागते आहे. हा दैवदुर्विलास!
समाजाची आणखी एक गंमत आहे. कोणतेही शारीरिक वैगुण्य नसूनही त्याला ऐकू न आल्याचं भासवतो तेव्हा ‘सांगतो ‘ऐका!’ असा पुकारा एखादीला करावा लागतो.
कैवल्याचा आतला आवाज त्याला सावरो न सावरो पण सगळ्यांचे आतले आवाज त्या त्या मालकाला नेहमीच योग्य सल्ला देतात का, असा प्रश्‍न मला पडतो.
धट्‌ट्याकट्‌ट्या शरीराचे आणि दुबळ्या मनाचे, एखाद्या व्यसनाच्या आहारी जातात, भ्रष्टाचाराच्या कर्दमात रुतत जातात तेव्हा होडी जशी बुडताना तिच्या वजनाचे भोवतालचे पाणी खेचून घेत बुडते तसे हे धट्टेकट्टे आपल्या कुटुंबीयांना, परिसरातल्यांनाही खेचून नेतात. सभोवतालचे शहाणेसुरते खूप समजावतात पण तो व्यसनी आपला आतला आवाज काय सांगतो, तेच करतो.
आपल्या आतल्या आवाजाचे ऐकून एखाद्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष करून क्रीडा किंवा कलेच्या क्षेत्रात झोकून दिले आणि आजच्या व्यवहारी जगात पुढे तो चमकू शकला नाही तर ‘तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं’ अशी अवस्था होणं शक्य आहे.
निर्ढावलेल्या गुन्हेगाराला त्याचा आतला आवाज गुन्हे करायला प्रवृत्त करीत असेल आणि परिणामाची त्याला फिकीर नसेल तर?
सत्ता, प्रसिद्धी आणि पैसा सहज मिळवण्याचा राजमार्ग म्हणून एखाद्याचा आतला आवाज राजकारणात उतरायला सांगतो. इतरांचा सल्ला किंवा स्वानुभव, त्याच्या अपयशावर इलाज करू शकत नाही. त्याच्या आतल्या आवाजाने त्याला चकवले की काय?
सभोवताल, सद्यपरिस्थिती आणि संस्कार या परिप्रेक्ष्यात आतल्या आवाजाच्या सल्ल्याचे यश-अपयश अवलंबून असते का?