आलिया रोगासी असावे सादर!

0
431
  •  डॉ.अनुजा जोशी

सर्वत्र सर्वांचा मनसोक्त मुक्तसंचार सुरू असल्याने यापुढे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल तसतशी सरकारी यंत्रणा पुरी पडणार नाही असेच यातून स्पष्ट दिसते आहे. गांभीर्य, जबाबदारी व कमालीचा धोका नीट ओळखून समंजसपणे आलिया रोगासी असावे सादर… असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे व त्यासाठी शरीर व मनाची तयारी करून ठेवणे हाच आता आपल्या प्रत्येकाच्या हाती असलेला एकमेव हिताचा मार्ग आहे हे खरे!

एक मुलगा, त्याचा बाप आणि त्यांचं गाढव यांची गोष्ट तुम्हाला माहितेय ना? नक्कीच माहीत असेल; फक्त मी ती एका नव्या संदर्भात इथे सांगते आहे. फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एक मुलगा आणि त्याचा बाप दोघे बाजाराला जायला निघतात. दूरगावच्या बाजारातून सामान आणण्यासाठी ते त्यांच्या गाढवालाही सोबत घेतात. काही अंतर चालत जाऊन दुसर्‍या गावी पोचतात. रस्त्यात एका पारावर काहीजण बोलत बसलेले असतात. या तिघांना चालताना पाहून ते मोठ्याने हसू लागतात व म्हणतात, ‘अरे काय गंमत आहे पहा! दोघे बापलेक गाढवासोबत नुसतेच चालत जातायत. निदान मुलाने तरी मजेत गाढवावर बसून जायचं ना?’ हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटतं आणि तो लगेचच गाढवावर बसून टाकतो.आता ते पुढे चालू लागतात. थोडं अंतर गेल्यावर त्यांना एका तळ्याजवळ बायका कपडे धुताना काही कुजबुजतात, ते ऐकू येतं. ‘अगं बाई गं, काय कमाल आहे ही..मुलगा एवढा दांडगा न् तो गाढवावर बसलाय आणि बाप बिचारा चाल चाल चालतोय!’ हे ऐकल्याबरोब्बर मुलाला शरम वाटते. तो खाली उतरतो आणि बापाला गाढवावर बसवतो. पुन्हा ते चालू लागतात. पुढे जातात. वाटेत एक शेत लागतं, शेतकरी म्हणत असतो, ‘अरेच्च्या, हा काय प्रकार! बाप खुशाल गाढवावर बसलाय आणि पोर बिचारा चालत जातोय, या बापाला काही लाज बिज आहे की नाही?’ पुन्हा बापलेक गडबडतात. बाप म्हणतो, ‘आता आपण दोघेही गाढवावर बसुया’… म्हणून तो मुलालाही गाढवावर घेतो.

आता बापलेक दोघेही गाढवावर बसून जाऊ लागतात. एका नाक्यावर ही वरात पोचते, तर रस्त्यावरचे लोक म्हणतात, ‘अरे बघा बघा, काय गंमत आहे ती! बिचारं गाढव इतकं मरतुकडं आहे आणि हे दोघेही पठ्ठे त्याच्यावर बसलेत. गाढवाचं काही खरं नाही’. आता बापलेक भलतेच विचारात पडतात. त्यांना एक युक्ती सुचते. ते एका मोठ्या काठीला गाढवाचे पाय बांधतात आणि त्याला उलटं करून काठी आपल्या खांद्यावर घेऊन चालू लागतात. वाटेत त्या गावाची नदी लागते. नदीवर छोटा पूल असतो. ते पुलावर पोचतात तेव्हा नेमकी दुसर्‍या बाजूने काही मुलं शिट्‌‌‌ट्या वाजवत येत असतात. काठीला उलटं लटकवलेलं गाढव खांद्यावर घेतलेले बापलेक चालताना बघून मुलं खो खो हसत सुटतात. टवाळी करतात. ओरडू, नाचू लागतात. बापलेकांना काहीच कळेनासं होतं. ते विचारात पडतात, घाबरतात आणि गाढव उलटं लटकवलेली खांद्यावरची काठी गाढवासकट नदीत टाकून मोकळे होतात!

मित्रांनो, आज गोव्यातली आपल्याभोवतीची परिस्थिती या गोष्टीसारखी झाली आहे आणि या गोष्टीतलं ‘हकनाक मरणारं गाढव’ म्हणजे आपण सगळे गोवेकर आहोत की काय अशी धास्ती वाटावी असंच एकूण सगळं चित्र दिसतं आहे! बापलेकांच्या या गोष्टीतली अशी निर्णयहीन डळमळीत परिस्थिती निर्माण झालेली उघड्या डोळ्यांनी नुसती बघत राहण्यावाचून आपल्याकडे दुसरा मार्ग नाही असेही वाटते आहे! सरकारी किंवा इतर यंत्रणांना आपल्यावर बसवणारे आपणच. लोकांच्या वेगवेगळ्या आरडाओरडीला बळी पडून एकदा एक निर्णय, दुसर्‍या दिवशी दुसरा निर्णय अशी बापलेकांची आपल्या पाठीवर अदलाबदल करू देणारेही आपणच. योग्य, हिताचा व ठाम निर्णय न घेता आल्यामुळे कोरोनासकट सगळेच ओझे आपल्या पाठीवर लादून घेणारे आपणच आणि आता कोरोनाचा कहर होऊन परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर खांद्यावरचं काठीला उलटं लटकवलेलं गाढव नदीत कधी टाकून दिलं जाईल याची भिती मनात निर्माण झालेले आपणच!

कोरोना ‘लॉक् डाऊन’च्या गेल्या तीन चार महिन्यात ही गोष्ट गोव्यात सतत आपल्याभोवती घडताना दिसते आहे. अख्खं जग कोविड-१९ ने व्यापलं असताना गोवा मात्र सुदैवाने ‘ग्रीन झोन’ मधे होता. पण बघता बघता वास्कोच्या बंदरातल्या बोटीला पडलेल्या बारीकशा छिद्रामुळे पाणी आत शिरलं. हा हा म्हणता भराभर वरवर चढत गेलं. आता अगदी गळ्यापर्यंत येऊन प्रत्येकाच्या नाकातोंडात जायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचं गांभीर्य या गोष्टीतून आपल्याला कळू शकतं.

तर मित्रहो, या गोष्टीतला विनोदाचा भाग थोडं हसून सोडून देऊ आणि कोरोनाच्या तावडीतून सुटण्यासाठी आपण प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक पातळीवर व मनापासून काय काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करू, हे इष्ट! कारण आपण आज कितीही हसलो, ओरडलो, चिडलो, सोशल मिडियावर अचूक व टोकदार विनोद केले, परखड मते व्यक्त केली, समंजसपणा दाखवला, सहकार्य केले किंवा विरोध केला, सूचना केल्या, सल्ले दिले, असे काहीही केले तरी कोणतीही सरकारी किंवा अन्य यंत्रणा यापुढे आपलं आयुष्य सुरक्षित ठेवू शकणार नाही हे आता लखलखीत सत्य आहे! कोरोनाचा ‘ग्रीन झोन’ असलेल्या आपल्या राज्यावर ओढवलेल्या या परिस्थितीला राज्यसरकार किंवा अन्य कुणीही जबाबदार असले नसले तरी आता दोष कुणाचा हे न बघत राहता यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आपल्यालाच करावा लागणार आहे. ‘ग्रीन झोन’ झाल्याबरोब्बर आपल्याकडे लग्गेच घाईने सगळे ‘अनलॉक’ करण्यात आले आणि आता देशभरातील ‘अनलॉक’मधे ते बेमालूमपणे मिसळूनही गेले आहे. त्यामुळे परिस्थिती खूप घातक झाली आहे. आज रुग्णसंख्या चार-पाच हजारांच्या घरात पोचलेली असताना आत्ता खरे तर कडकडीत ‘लॉक् डाऊन’ करण्याची गरज आहे. पण ते घडले नाही तर आपण प्रत्येकाने स्वत:ला सर्व मोह टाळून ‘लॉक् डाऊन’ करून घेणे हे आत्यंतिक गरजेचे आहे हे मी एक डॉक्टर या नात्याने ठामपणे सांगू इच्छिते.

अजूनही वेळ आपल्या हातात आहे. आत्ता हा लेख लिहिणारी मी आणि तो वाचणारे तुम्ही याक्षणाला तरी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ नाही आहोत. म्हणून तोवर आपण आपल्या पातळीवर काय काय करू शकतो याची चर्चा करू. आयुर्वेदाच्या जीवनविषयक तत्त्वांचा व सिद्धांतांचा विचार प्रत्येक गोष्टीमधे होऊ शकला तरी बरेच सुरक्षित राहता येऊ शकेल. एका विषाणूमुळे उद्भवलेल्या या रोगावर अजून तरी नेमके औषध किंवा लस निर्माण होऊ न शकल्याने सध्यातरी आपल्याकडे केवळ आपली रोगप्रतिकारक्षमता वाढवून त्याच्याशी लढणे एवढाच उपाय आहे.
आहार, विहार व औषध अशा तीन पातळ्यांवर आपण आपल्या आत्ताच्या संकटग्रस्त जगण्याचा विचार करू.
नेहमीचा पावसाळा, श्रावण आणि यंदाचा हा कोविडग्रस्त पावसाचा सीझन खूपच वेगळा आहे.

आहार : नेहमीच्या पावसाळ्यातला हितकर असाच आहार, पण या पावसाळ्यात तो नीट लक्षपूर्वक घेतला जावा.
* पचायला हलका पडेल असा आहार घेणे या दिवसात खूप श्रेयस्कर ठरेल. ज्याला शिजायला जास्त वेळ लागतो ते अन्न जड व जे पटकन शिजते ते अन्न पचायला हलके असं सोपेपणी समजून घ्यायला हरकत नाही. बटाटा, साबुदाणा, शेंगदाणा तसंच हरभरा, वाटाणा, चवळी, उडीद अशी कडधान्ये; गोड मिष्ट पदार्थ, पक्वान्ने, तळलेले पदार्थ, मांसाहार, मैदा, फ्रीजमधले पदार्थ अशा गोष्टी पचायला जड पडतात. तर मूग, तूर, तांदूळ, वरी, नाचणी, जोंधळा, दोडकी, पडवळ, कारली, वाल फरसबी, अशा फळभाज्या, शेंगाभाज्या
लाह्या, विविध सूप्स्, गरम पाणी हे सर्व पचायला हलकं पडतं. पोटाच्या तक्रारी नसणं हे अर्ध आरोग्य आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे पहिल्या प्राधान्याने आपण हलका आहार घेत आहोत ना, याकडे लक्ष असू द्यावे.

* सध्या सगळेच काम-धंदे- व्यवहार थंडावलेले असल्यामुळे घरात बसूनच जास्त वेळ जात असेल तर आहार थोडा कमी घेतलेला उत्तम! तिन्हीत्रिकाळ भरपेट जेवणखाण न घेता ते दुवक्त म्हणजे दोनदाच घ्यावे.
* सध्या फार चोचले न करता जे काही उपलब्ध असेल ते शिजवून खाण्यात समाधान मानावं. उदा. हा गावठी अळंब्यांचा सीझन आहे. आपल्याला अळंबी जीव की प्राण प्यारी आहे. कितीही महाग आणि कशीही कुठूनही ती आपण मिळवून खातोच! पण यावर्षी विचार करा, अळंबी घ्यायला बाजारात चार ठिकाणी फिरणं किती घातकी आहे. एकवर्ष ती नाही खाल्ली तरी काही बिघडणार नाही. कारण अळंबीपेक्षा जीव नक्कीच मोलाचा आहे ना? असा विचार प्रत्येक प्रलोभनाच्या ठिकाणी करून त्यासाठी बाहेर फिरणं, माणसांच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे.
* जेवणाच्या वेळा नियमित असू द्याव्यात. रात्रौ शक्यतो ८वा.च्या दरम्यान जेवण आटपावे.
* रात्री दूध, फळं, दही, ताक तसेच शिळे अन्न, आंबवलेले अन्न खाऊ नये. फ्रीजमधले पाणी, शीतपेये, आइस्क्रीम, इ.खाणे पूर्णपणे टाळावे.
* जेवणाखाणात साजूक तूप अवश्य वापरावे.
* जेवणामधे मिरी, लवंग, दालचिनी, जिरे, मोहरी, मेथी, हिंग, कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं अशा मसाल्याच्या पदार्थांचा अवश्य समावेश असावा ज्यामुळे जाठराग्नी चांगला प्रदीप्त राहतो. अन्नाचे चांगले पचन घडवून आणतो व शरीर अर्थातच निरोगी राखतो.
* पावसाळी रानभाज्या उदा. तेरे (अळू) टायकिळा, कोंब, आकूर, फागलं, आंबाडे, नीरफणस तसंच काकडी, दोडकी, पडवळ, कारली, कोकणदुधी, भेंडी, आंबाडे त्याचप्रमाणे व्हाळातले नदीतले मासे, चढणीचे मासे, खुबे, तिसर्‍या व अन्य रुचकर मासळी व मांसाहार दरवर्षी पावसाची रंगत वाढवतात, पण यंदा सारंच वेगळं आणि कोरोनापायी धोक्यात असताना बाहेर फिरून यासाठी आटापिटा करणं हे शहाणपणाचं नाही!
* केळी, चिकू, पेरू, पपई, अननस, लिंबू ही फळं इथल्या बागांमधे पिकतात. ती अवश्य खावीत. मोसंबी, संत्री, डाळिंब, सीताफळ, सफरचंद, आंबा व ओले खजूर, किवी, लिची, नासपती, पेर यांसारखी विदेशी फळंही आत्ता मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. पण ही आंबट व बरेचदा कृत्रिमरीत्या पिकवलेली असतात. (बरेचदा सफरचंद, संत्री, नासपती, पेर हे संकरित, वेगळ्या वासाचं व विचित्र गोड चवीचं निघतं. ते खाऊ नये) सगळीच फळं आत्ता अगदी माफक प्रमाणात व मीठ, मिरीपूड किंवा चाट मसाला टाकून खावीत. आंबा, फणस तर आता मिळत असले तरी खायचे बंदच करावे! शक्यतो घशाला त्रास करणारी, सर्दी- खोकला- कफ होण्याची सर्व कारणे कटाक्षाने टाळावीत.

विहार : यामधे आचार-विचारांची पथ्ये-अपथ्ये म्हणजे थोडक्यात ‘डूज अँड डोन्ट्‌स’ यांचा विचार करू. आत्ता यातून आपण वाचलो तर पुढे सगळी मजा करायची आहेच. त्यामुळे बाकी लोभ व मोहाच्या गोष्टींना नजरेआड करायची सवय लावून घ्यायला हवी आहे.
* मास्क व सॅनिटायझरचा वापर. वेळोवेळी साबणाने हात धुणे व स्वच्छतेचे सर्व नियम तर पाळावेच लागतील.
* कमीतकमी वेळा व अतिआवश्यक असेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच घराबाहेर पडावे.
* सणवार, उपवास, व्रतं-वैकल्ये, धार्मिक कृत्ये, देवदर्शन, सोहळे यांचे नेहमीप्रमाणे अवडंबर न माजवता ते सर्व अतिशय साध्या पद्धतीने व घरातच साजरे करावे.
* खरेदी, फिरणं, पावसात भिजणं, जलपर्यटन, प्रवास, सहली, लैंगिक संबंधांचा मोह, जागरण, आळस, संगणक मोबाईलचा अतिवापर, व्यसने इ.गोष्टी कठोरपणे टाळाव्या. प्रत्येक गोष्टीतली हाव- हौस- लालसा लोभ कमी करावा.
* परिस्थितीमुळे गांजून व खचून न जाता, न कंटाळता, चिडचिड राग त्रागा न करता, निराश न होता पूर्ण सकारात्मक, समाधानी व आनंदी राहावे. अतिचिंता व बेफिकिरी दोन्ही करू नये. विविध छंद जोपासावे.

औषधोपचार : आपल्याला प्रामुख्याने रोगप्रतिकारक्षमता वाढवणारी औषधे घ्यावी लागत आहेत. पण हेही खरे की उगीचच घाबरून जाऊन एकसारखा विविध औषधांचा भडिमार करत राहणेही हानिकारक ठरू शकते.

* आयुष मंत्रालय, आयुर्वेद व्यासपीठ किंवा तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांकडून योग्य ते काढे घेणे उचित ठरते. गुडुची (गुळवेल), आमलकी (आवळा) व मुस्ता (नागरमोथा) या तीन औषधांचा ग्रंथोक्त काढा शिजताना त्यात मिरी- लवंग- दालचिनी- हळद व सुंठ घालून दररोज पिण्याने खूप चांगला फायदा होईल.
* गुळवेल आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या वृक्षांवरुन जमिनीकडे खाली मुळं सुटलेली गोल हदयाकार जाड पानांची ही वेल असते. आडवी तोडल्यावर सायकलच्या चाकासारखी रचना आत दिसते. तज्ञाकडून नीट ओळख पटवून ओल्या गुळवेलीचा बोटाएवढा तुकडा ठेचून व प्राजक्त, अडुळसा, तुळशीची पानं, गंजन, धने, आलं घालून सर्दीचा काढा घ्यायलाही हरकत नाही
* गुडुची घनवटी या गुळवेलीच्या गोळ्याही घेता येऊ शकतात. सोने पाण्यात उकळवून ते पाणी पिण्यानेही बराच फायदा होतो.
* च्यवनप्राश, लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन डोस व नियमित देण्याचे सुवर्णप्राशन औषध यांचा आवर्जून वापर करावा.
* सकाळ- सायंकाळ दोनदा घरात धूप घालावा. तो हवा शुद्ध ठेवायला मदत करतो.
* रोज सकाळी किंवा सायंकाळी नाकात शुद्ध साजूक तुपाचे दोन- दोन थेंब टाकून नस्य करावे. हळद व मीठ घालून गरम पाण्याने गुळण्या कराव्या. गरम पाणी, काढा पीत रहावा. गरम पाण्याची वाफ घ्यावी. हळद व सुंठ घालून दूध प्यावे.
* होमिओपॅथीच्या गोळ्याही दिल्या जात आहेत. मधुमेह, हृदय व किडनीविकारग्रस्तांची, वयस्कर, बाल व गर्भवतींची विशेष काळजी घेतली जावी.
* जाहिराती, अफवा किंवा गैरप्रकारांना बळी पडून औषधं घेऊ नये.
* सोशल मिडियावर बघून व वाचून वेगवेगळे प्रयोग शरीरावर एकसारखे करीत राहू नये. त्यातली सत्यासत्यता नीट पडताळून पाहावी.
* सर्दी- खोकल्याचा इलाज ताबडतोब करावा.
* केवळ आपल्याला काहीही होणार नाही असा विचार करत राहणे म्हणजे सकारात्मकता नव्हे. तर आता सध्याच्या खूप धोकादायक स्थितीत आपण यापुढच्या कोणत्याही क्षणी पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि तसे आलो तरी न डगमगता आपण त्याच्याशी लढू हे गृहीत धरूनच चालावं म्हणजे वेळ आलीच तर गडबडून जाण्याची वेळ येणार नाही! संकटाची पूर्ण मानसिक तयारी केलेली असली की त्याच्याशी सामना करणं सोपं होतं. आता हळूहळू ‘लिव्ह विथ कोरोना’ म्हणता येईल इतका तो सामान्य होऊन जाईल अशीही शक्यता आहे. तर समजा उद्या आपण पॉझिटिव्ह आलोच तर काय नि कसं लढता येईल व नियोजनपूर्वक आहार व औषधे घेत संकटावर कशी मात करता येईल याचा विचार आधीच करून ठेवावा. गोंधळून व घाबरून जाऊ नये व घाबरवूनही सोडू नये!

शेवटी एक वाइटात चांगली व खूप महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात आणून द्यावीशी वाटते ती म्हणजे जगभरात थैमान घालणारा कोविड्-१९ व आपल्याकडे भारतात पसरलेला कोविड्-१९ यात एक मोठा फरक आहे… असे दिसून आले आहे. आपली भारतीय संस्कृती व अन्य विदेशी किंवा पाश्चिमात्य संस्कृती यांच्या आहार- विहार- औषधांत मुळापासून फरक आहे. भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती पिढ्यान् पिढ्यांच्या सशक्त संस्कारांमुळे जगाच्या तुलनेत खूपच चांगली आहे हे तज्ञांनीही मान्य केले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मृत्यूदरही तुलनेने आपल्याकडे कमी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमधे लक्षणविरहित असण्याचे प्रमाणही बरेच आहे.आणि कोरोनामुक्त होऊन घरी परत येण्याचे प्रमाणही वाढते आहे ही चांगली गोष्ट. सरकार आता हळूहळू लक्षणविरहीत रुग्णांना घरीच क्वारंटाईन राहून काळजी घेत राहण्याची मुभा देतंय. ही एका बाजूने चांगली गोष्टही म्हणता येऊ शकते. किंवा इतका फैलाव होऊन परिस्थिती इतकी हाताबाहेर गेल्यावर नाइलाजाने हे खांद्यावरचे गाढव नदीत फेकून देण्यासारखेही ठरू शकते!! सर्वत्र सर्वांचा मनसोक्त मुक्तसंचार सुरू असल्याने यापुढे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल तसतशी सरकारी यंत्रणा पुरी पडणार नाही असेच यातून स्पष्ट दिसते आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीची गरज लागल्यासच रुग्णालयात दाखल व्हावे, अन्यथा आपल्या घरीच राहावे असा नवीन नियमही येऊ शकतो. यामधली चांगली गोष्ट, गांभीर्य, जबाबदारी व कमालीचा धोका नीट ओळखून समंजसपणे ‘आलिया रोगासी असावे सादर!’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे व त्यासाठी शरीर व मनाची तयारी करून ठेवणे हाच आता आपल्या प्रत्येकाच्या हाती असलेला एकमेव हिताचा मार्ग आहे हे खरे!