आला श्रावण…

0
473

– मीना समुद्र

या रसरंगनादगंधाच्या दुनियेत चराचर गुंगून गेले आहे. मखमली हिरवाईवर पाय रोवीत, इंद्रधनूच्या कमानीखालून येताना तृणपात्यांना आंजारीत अन् डोळे उघडून टुकूटुकू बघणार्‍या रंगीबेरंगी असंख्य रानफुलांना गोंजारीत आता श्रावण आला आहे. क्षणात येणारे सरसर शिरवे अन् क्षणात पडणारे ऊन मिरवीत श्रावण आला आहे…

ग्रीष्म ऋतूच्या अंती आकाशाचे घनव्याप्त आभाळ झाले आणि बराच काळ ओठंगून, ओथंबून राहिलेले आषाढघन धरणीच्या अनावर ओढीने बरसू लागले की-
आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने, प्यावा वर्षाऋतू तरी-
कविश्रेष्ठ बा. सी. मर्ढेकरांच्या ओळी मनात पिंगा घालू लागतात. गरजत बरसत येणार्‍या आषाढघनांसारख्या त्या मनाच्या गाभार्‍यात घुमू लागतात. चातकाच्या असोशीने धरणी ते जल प्राशन करते आणि आषाढधारांना आत आत जिरवत, मुरवत राहाते. मृद्गंधाचे पहिले अर्घ्य त्या दयाघनाला! आणि नंतर तो गंध नवसृजनाच्या कार्यात दंग झालेल्या झाडावेलींच्या, कळ्यांच्या अत्तरकुप्यात ती साठवून ठेवते.
सावळ्या आषाढघनांनी लुटून आणलेल्या धनसंपदेचा वर्षाव धरणीवर झाला आहे. तिला अभ्यंगस्नान घडले आहे. आणि आता श्रावणात आकाश थोडे शांतावले आहे, निळावले आहे. सरीवर सरीत सचैल स्नान केलेल्या गोपींचा रास रंगला आहे. मधूनच सोनेरी उन्हाची बासरी अनवट सूर वाजवीत घुमते आहे. त्या धारानृत्यात, त्या रासात, त्या बासरीच्या मधुर सुरावटीत सारे विश्‍व कसे नादावले आहे, धुंदावले आहे. नद्या, ओढे, झर्‍यांनाही पैंजण, घुंगरू, वाळे लाभले आहेत; आणि तेही खळखळ, छन्‌छन्, घुम्‌घुम् करीत निनादत वाहात आहेत. रानेवने, माळ, राया हिरवाईत उन्हाची कलाबतू गुंफत आनंदाने गात आहेत. वृक्षवल्लरी, पाने डोल डोल डोलत आहेत. त्यांच्या अंगावरून फुलांचा बहर ओसंडत आहे. पक्ष्यांची, बगळ्यांची माळ अंबरातून खुलत आहे. मधूनच वाहणार्‍या मंद मंद वार्‍याच्या झुळकीवर फुलपाखरे आंदोळत आहेत. ‘हवेचिया डहाळीला फुटे पाखराचा झुला’ या ओळी ओठांवर झुलत आहेत. या रसरंगनादगंधाच्या दुनियेत चराचर गुंगून गेले आहे.

मखमली हिरवाईवर पाय रोवीत, इंद्रधनूच्या कमानीखालून येताना तृणपात्यांना आंजारीत अन् डोळे उघडून टुकूटुकू बघणार्‍या रंगीबेरंगी असंख्य रानफुलांना गोंजारीत आता श्रावण आला आहे. क्षणात येणारे सरसर शिरवे अन् क्षणात पडणारे ऊन मिरवीत श्रावण आला आहे. भिजल्या मातीवर शुभ्र पारिजाताची सुकोमल पदचिन्हे उमटवीत श्रावण आला आहे. झाडांच्या उंच उंच शेंड्यावर आणि डहाळीच्या टोकावरच्या प्रत्येक बेचक्यात स्वर्णफूल खोचत, अनोख्या गंधाने बेहोष करत श्रावण आला आहे. चिटकीमिटकी अटलसुगंधी मोतिया बकुळीची फुले ढाळीत श्रावण आला आहे. दर्याकिनारी, रानावनांत, केतकीबन उठवीत; ताडामाडांच्या, सुपार्‍यांच्या चवर्‍या ढाळीत श्रावण आला आहे. जायाजुयांचे मिटले ओठ उघडून गंध जागवीत श्रावण आला आहे. सुस्नात तुळसमंजिर्‍यांना हाताचा हलकासा स्पर्श करीत श्रावण आला आहे. सुखसमृद्धीची ग्वाही देत ‘हासरा, नाचरा, जरासा लाजरा श्रावण’ आला आहे आणि मनमोर पिसारा फुलवून थिरकत आहे.

श्रावणाच्या सुंदर दर्शनाने नेत्र तृप्त होत आहेत. निसर्गगानातल्या नादनिनादाने श्रवण सार्थक होत आहेत. हात फुले-पत्री खुडण्यासाठी सरसावत आहेत, गंध दरवळाने अंग मोहरून जात आहे. आपला हा आनंद मानवाला ईश्‍वरचरणी वाहायचा आहे म्हणून या मंगलमय पवित्र वातावरणात पूजासमयी मनोमय कृतज्ञतेच्या ओंजळी भरभरून फुलेपत्री वाहिली जात आहे. धूपदीपकर्पूराच्या सुगंधांची त्यात भर पडत आहे. मनात जागे होणारे गाणे उत्फुल्लपणे ओठांवर येत आहे.

आवडता पाहुणा घरी यावा आणि घरातल्यांना आता काय करू नि काय नको असे व्हावे- तसे होते या श्रावणाचे! सण-उत्सव, पूजाअर्चा, व्रतवैकल्यांची अगदी धामधूम होते. रिमझिम झरणार्‍या श्रावणधारा आणि मधूनच हसवणारे ऊन, रम्य निसर्ग अशा या प्रसन्न वातावरणात झाडांना हिंदोळे बांधले जातात. शरीराबरोबरच मनही मग झुलू लागते. तजेलदार मेंदीनं हात रंगतात. देवळारावळांच्या जत्रांमुळे हे दिवस पर्वकाळ होऊन जातात. श्रावणमास ही संपन्नता आणि स्वास्थ्यामुळे येणारी आनंदपर्वणी आहे. श्रीदामोदर सप्ताहाच्या आनंदपर्वणीत आता वास्को आणि इतर ठिकाणचे भाविक सहभागी होतील. भजन-गायनात रंगतील. इथे भावभक्तीचा मळा फुलेल. अष्टसात्त्विक भाव जागृत होतील. श्रावणसोमवारी शिवपूजा; शिवाला बिल्वपत्रे वा पारिजातासारख्या फुलांचा लक्ष वाहण्याचा संकल्प; श्रीगणेशाला दुर्वांचा लक्ष वाहणे हे श्रावणातील मुबलकतेची साक्ष देतात. मंगळवारी सोळा प्रकारच्या पवित्र पत्री व फुलांनी मंगळागौरीची पूजा होते. गाणी, उखाणे, फुगड्या, झिम्मासारख्या खेळांनी रात्र जागवताना घर दुमदुमून जाते. बुध-गुरुवारी बुधबृहस्पतीची पूजा होते. श्रावणशुक्रवार गृहिणींच्या अगदी जिवाभावाचा. जिवतीदेवीला पुरणपोळीचा नैवेद्य आणि सवाष्णीसहित घरच्या मुलाबाळांचे औक्षण करून सर्वांचे साग्रसंगीत भोजन या दिवशी होते. शनिवारी हनुमानासाठी रूईचा हार, खडीसाखरेचा नैवेद्य किंवा नारळ फोडला जातो. रविवार सूर्यपूजन. आणि सर्व दिवशी विशिष्ट प्रकारची वाणं दिली जातात. उपासतापास केला जातो. वारांच्या अद्भुत कहाण्या वाचल्या जातात. देवरावळांतून कीर्तन, भजन रंगते. बर्‍याच ठिकाणी सत्यनारायण पूजा होते. आणि श्रावणमास कसा भावभक्तिमय होऊन जातो. ‘बाइशे श्रावण’ म्हणजे श्रावण महिन्याची २२ तारीख. या दिवशी रवींद्रनाथांची पुण्यतिथी श्रावण महिन्यात अनेक कार्यक्रमांनी साजरी केली जाते. बंगाली लोक या तिथीला अतिशय महत्त्व देतात. भारतीय संस्कृती निसर्गात अंकुरली, फुलली, फळली आणि वाढली. निसर्गपुत्र रवींद्रनाथांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बालतरू’ची पालखी काढली जाते आणि वृक्षारोपण केले जाते. ही श्रावणपरंपरा, संस्कृती आज फक्त ‘शांतिनिकेतना’तच नाही तर सर्वत्र, सर्वांनी जपायला, जोपासायला हवी.

माणसाचा स्वभाव उत्सवी असतो. मन प्रसन्न असेल तर अशावेळी उत्साहाला उधाण येते आणि नित्यकर्मांनाच सौंदर्य आणि कलेची, श्रद्धा-भक्तीची जोड मिळते. निसर्ग- श्रावणातला निसर्ग हे काम करतो. त्याच्याच कृपाशीर्वादानं भूमी सुजलाम्, सुफलाम्, सस्यश्यामलाम् होते. अर्थातच या संपन्नतेमागून सुख आणि स्वास्थ्य येते आणि सणा-उत्सवांची प्रेरणा स्फुरते. या भूमीशी एकरूप झालेला शेतकरी आकाशाच्या पर्जन्यकृपेनं आनंदतो. श्रावणापर्यंत मनासारखा पाऊस झाल्यानं धनधान्यानं समृद्धता येते. आपले कष्ट उंदीर-घुशींसारख्या उपद्रवी शत्रूंनी वाया घालवू नयेत म्हणून त्यांना ग्रासणार्‍या नागाची तो पूजा-उपासना करतो. नागपंचमीच्या सणाने बदलत्या ऋतुमानाप्रमाणे साजरे होणार्‍या सणांना सुरुवात होते. पूर्वी लहान वयात लग्ने होत. त्या नववधू या निमित्ताने माहेरी यायच्या आणि मैत्रिणींसमवेत ‘चल गं सये वारुळाला’ म्हणत वारूळ आणि नागदेवतेची पूजा करायच्या. नारळी पौर्णिमेला मासेमारीसाठी जाणारे कोळी आणि अन्य व्यापारासाठी नौकानयन करणारे व्यापारी दर्याचा कोप होऊ नये म्हणून त्याच्या सांत्वनासाठी त्याला नारळ अर्पण करून त्याची प्रार्थना करतात. जलदेवता संतुष्ट असेल तर व्यापारउदीम चांगला होईल ही त्यांची धारणा असते. हीच पौर्णिमा म्हणजे भाऊबहिणींचे प्रेम वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण! आभाळाच्या हाताला जणू धरणी इंद्रधनुष्याची राखी बांधते. बहीण भावाला राखी बांधून प्रेम व्यक्त करते. कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवणारा, शिकविणारा हा सण! या श्रावण-सणांच्या मांदियाळीत कृष्णाष्टमी किंवा कृष्णजन्माष्टमीचा सण लोभसपणे शोभून दिसतो. बाळसेदार बाळकृष्णासाठी दह्यादुधाची, लोण्याची मडकी जणू उंच आकाशात टांगलेली. बाळकृष्ण ती सवंगड्यांसह फोडतो आणि दह्यादुधाचे पाट वाहू लागतात. मायेत, कौतुकात न्हाणारं ते निरोगी, खट्याळ, खोडकर, खेळकर मुक्त बालपण आपल्या पोटी जन्म घेणार्‍या बाळाला लाभावं अशीच मातामाऊल्यांची इच्छा असते. गोपाळकाल्याच्या निमित्तानं भारताला समृद्ध परंपरा पुन्हा प्राप्त व्हावी अशी इच्छाच जणू श्रावण व्यक्त करतो. श्रावण अमावस्येला बैलपोळा साजरा होतो आणि बळीराजा आपल्या सख्या-सवंगड्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याला सजवून-धजवून मिरवतो.

इथपासून इतिपर्यंत श्रावण असा जनमानसात रांगत-रेंगाळत राहतो. मनात हिरवळीसारखा हर्ष दाटून राहतो. जीवनाला नवचैतन्य, नवी उभारी, नवा उल्हास, नवी तकाकी, नवी लकाकी माखून जातो.